सध्या समाजव्यवस्थेमध्ये लहान-सहान कारणावरून तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. महाराष्ट्राची सांस्कृतिक व सुशिक्षितांची नगरी म्हणून पुणे शहराची ओळख कालपरवापर्यंत होती. पण आज त्या ओळखीचा उल्लेख कितपत करावा, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर, पुणे तिथे काय उणे असा आदरपूर्वक एकेकाळी पुणे शहराचा उल्लेख केला जात होता. आजच्या काळात गुन्हेगारीच्या वाढत्या घटना, कोयता गँग, चड्डी गँग, गोळीबाराच्या घटना, राजरोसपणे होणाऱ्या हत्या, अपहरणाच्या घटना, महिला अत्याचारात झालेली वाढ, महिला शोषण, व्याभिचार, वाहनांची मोडतोड, उद्योजकांना धमक्या असे चित्र पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहे. हे चित्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला नक्कीच भूषणावह नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक कार्यक्रमात या शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त करताना वाहनांची मोडतोड करणाऱ्यांना तसेच उद्योजकांना धमक्या देणाऱ्यांना थेट ‘मोक्का’ लावण्याचे निर्देश त्यांनी स्थानिक पोलिसांना दिले नाही. राज्य सरकार पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहे, पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही. गुन्हेगारीचा बिमोड करा, गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत दयामाया दाखविली जाणार नाही, असे स्पष्ट ग्वाही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान दिली आहे.
ठाणे वागळे इस्टेट येथील औद्योगिक पट्ट्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड येथील औद्योगिक वसाहत महाराष्ट्रात मोठी तसेच प्रसिद्ध आहे. येथील एमआयडीसीतील उद्योगाने, कारखान्यांनी हजारो-लाखो लोकांना रोजगार दिलेला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील औद्योगिक पट्टा आज अस्तित्वासाठी संघर्ष करत असताना पिंपरी-चिंचवड येथील औद्योगिक विकास विस्तारत चालला आहे. एकेकाळी तळेगाव येथील एचपी गॅसचा प्लॉन्ट आणि अॅटलास सायकल या उद्योग समूहापुरतीच या भागाची ओळख होती; पंरतु आता येथील कंपन्या-कारखान्यात वाढ होत चालली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक भागातील युवकांना मोठ्या संख्येने येथील एमआयडीसीमध्ये रोजगार उपलब्ध झालेला आहे. एकेकाळी येथील कंपन्या-कारखान्यांची वाहने खेड-चाकणपर्यंत कामगारांना ने-आण करण्यासाठी ये-जा करत होती, ती वाहने आता अलीकडच्या काळात मंचरपासून कर्मचाऱ्यांना ने-आण करू लागली आहेत. केवळ औद्योगिक परिसराचाच विकास झाला अशातला भाग नाही, तर येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासी वास्तव्यासाठी येथे नागरीकरणाचीही प्रक्रिया वाढत गेली. पुणे पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्याही वाढत गेली. शहरीकरण वाढत गेले. एकीकडे कंपन्या, कारखान्याची धडधड यापाठोपाठ कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या निवासी वास्तव्यासाठी इमारतींची संख्या वाढून सिमेंटचे जंगल वाढत गेले. पुढे कालपरत्वे या भागात आयटी कंपन्यांच्या संख्येतही विलक्षण वाढ झाली. हिंजवडीसारखा परिसर त्यातूनच विकसित झाला व नावारूपाला आला देखील. हिंजवडीमधील आयटी कंपन्यांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेले युवक व युवती काम करत आहेत. पुण्यातील औंधसारख्या आयटीआयमध्ये येथील बजाज, टेल्को कंपन्यांना वर्षानुवर्षे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत गेले आहे.
जिथे चंद्र सूर्याला ग्रहण लागते, तिथे पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या परिसरात सर्वच काही सुजलाम सुफलाम बराच काळ विनासायास चालणे शक्यच नव्हते. जिथे छापा आहे, तिथे काटा हा असतोच. जिथे चांगले असते, तिथे वाईटही सावलीप्रमाणे पाठराखण करत असतेच. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज गुन्हेगारीचा आलेख वाढत गेल्याने या शहरांच्या नावलौकिकाला काळिमा फासला गेला आहे. चोऱ्या, दरोडे, खून, व्याभिचार, गोळीबार, धमक्या, अपहरण, महिला अत्याचार या घटना आता नित्याच्याच घडू लागल्या आहेत. सिनेमामध्ये कथानक शोभावे, तसे या ठिकाणी कोयता गँग, चड्डी गँग नावारूपाला आल्या आहेत. कोयता गँगचे धाडस इतके म्हणावे की, दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी पाठलाग करून कोयत्याने हत्या करणे, दहशत पसरविणे या शहरात नित्याचेच प्रकार घडले आहेत. काहीही घटना घडल्या की, सोसायटी आवारामध्ये अथवा रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची मोडतोड करणे, जाळपोळ करणे या घटनांमध्ये देखील अलीकडच्या काळात वाढ होत चालली आहे. एमआयडीसीतील उद्योजकांना धमकावणे, खंडणी मागणे असे प्रकारही अलीकडच्या काळात वाढीस लागल्याने काही कारखानदारांनी, उद्योजकांनी आपला गाशा गुंडाळण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या भागातून उद्योज व कारखानदारांनी काढता पाय घेतल्यास पुणे, पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसराची ठाण्याच्या वागळे इस्टेटसारख्या परिसरासारखी अवस्था होण्यास फारसा वेळ लागणार नाही. नेमकी तीच बाब हेरून राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना, धमक्या देणाऱ्यांना आता मोक्का लावण्यास मागे-पुढे पाहू नका, सरकार पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगत पोलिसांना या प्रकारांना आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत.
कारखाने, उद्योग राहिले तर येथील भरभराट कायम राहिली तरच या शहरामध्ये आर्थिक सुबत्ता कायम राहणार आहे. निवासी परिसरात वर्दळ राहणार आहे. रोजगारच येथून गेले तर निवासी वास्तव्यासाठी येथे थांबणार तरी कोण? यामुळेच उद्योजकांना, कारखानदारांना निर्धास्तपणे त्यांचे व्यवसाय करता यावेत यासाठी कारखानदार, उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना धडा शिकविण्याचे, वेळ पडल्यास मोक्का लावण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहेत. सोसायटी आवारात असलेल्या वाहनांची मोडतोड व जाळपोळ करण्यास समाजकंटकांना कोणाचीही भीती वाटत नाही. याही गोष्टींना आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना वाहनांची मोडतोड व जाळपोळ करणाऱ्यांना मोक्का लावण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकार गुन्हेगारीचा बिमोड करण्यास सज्ज झाले आहे. गुन्हेगारांना मोक्का लावण्याचे निर्देश देवून संबंधित गुन्हेगारीचा कणा मोडण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे.