स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
सव्वादोन महिन्यांपूर्वी म्हणजेच दि. ४ डिसेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे दि. ५ डिसेंबरपासून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर आले. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले. अशा बदलाचा स्वीकार करणे खूप अवघड असते. हा अनुभव स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी घेतला आहे. त्यांना पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात व सत्ताकारणात जी जबाबदारी दिली ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. आता तशीच पाळी एकनाथ शिंदेंवर आली आहे.
देवेंद्र फडणवीस हे देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे महाराष्ट्रातील नंबर १ नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा त्यांना भक्कम पाठिंबा आहे. पक्ष संघटना आणि सरकारवर त्यांची पूर्ण पकड आहे. महायुतीत त्यांचा शब्द अंतिम आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेना या प्रादेशिक पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. राजकारणात चढ-उतार नेहमीच असतात. राजकारण हे कधीच कायम स्थिर नसते. याचा अनुभव शिंदे यांना वेळोवेळी आला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आपणच मुख्यमंत्री होऊ असे त्यांना वाटत होते. आपण महायुतीला मिळवून दिलेल्या प्रचंड यशामुळे मोदी-शहा आपल्यावरच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देतील अशी त्यांची अटकळ होती. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत महायुतीला जो जबर फटका बसला त्यानंतर निवडणूक प्रचारात शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून महायुतीच्या विजयासाठी जे परिश्रम केले, मेहनत घेतली, अहोरात्र अखंड प्रचार केला त्याला तोड नव्हती. लाडकी बहीण योजना आणून राज्यातील दोन कोटी बहिणींची व्होट बँक महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभी केली. विधानसभेत महायुतीचे २३७ आमदार निवडून आले व महाआघाडीचे पानीपत झाले. शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले हे सुद्धा त्यांच्या नेतृत्वाचे व संघटन कौशल्याचे मोठे यश आहे. तरीही पुन्हा मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळे अजूनही ते नाराज आहेत, अशी त्यांची देहबोली दिसते आहे. मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळायला हवे होते, अशी इच्छा किंवा महत्त्वाकांक्षा असणे यात गैर काहीच नाही. राज्याच्या राजकारणातील ते अंतिम शिखर असते. त्या शिखरावर बसायला मिळावे अशी प्रत्येक धडाडीने काम करणाऱ्या नेत्यांची अपेक्षा असते. नव्या सरकारच्या रचनेत मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून शिंदे यांनी आजवर उघडपणे नाराजी व्यक्त केली नाही किंवा थयथयाटही केला नाही. विधानसभा निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली महायुतीने लढवली, पण महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून त्यांनी आक्रोश केला नाही. नंबर एकचे पद मिळाले नाही म्हणून त्यांनी कोणाला दोषही दिला नाही. सुरुवातीला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला ते राजी नव्हते. पण स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच त्यांचे मन वळवले. राजकारणात सक्रिय राहण्यासाठी व पक्ष चालविण्यासाठी सरकारमध्ये सहभाग असणे महत्त्वाचे आहे हे त्यांना पटवून दिले.
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना (शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) या तीनही पक्षांचे मिळून २३७ आमदार विजयी झाले. त्यातही भाजपाचे सर्वाधिक १३२ आमदार विजयी झाले. राज्यातील जनतेने जसा महायुतीला सरकार स्थापन करण्याचा जनादेश दिला तसाच राज्याचा मुख्यमंत्री आता भाजपाचाच असेल असाही त्या जनादेशाचा अर्थ होता. सन २०१४ ते २०१९ अशी सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अडीच वर्षे उपमुख्यमंत्रीपदावर काम केले. तेव्हा त्यांनी कोणतीही कुरकूर केली नव्हती. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा-शिवसेनेचे युतीचे सरकार स्थापन झाले असते, तर फडणवीसच मुख्यमंत्री झाले असते पण उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली व स्वत:च्या पदरात मुख्यमंत्रीपद पाडून घेतले. जून २०२२ मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत उठाव झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हाही फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे सर्वांनीच गृहीत धरले होते. पण भाजपा श्रेष्ठींनी महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केली. २०१९ ते २०२४ राज्यात भाजपा राज्यात नंबर १ चा पक्ष असूनही फडणवीस यांना पहिली अडीच वर्षे विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून व नंतरची अडीच वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून काम करावे लागले. पक्षाने जी जबाबदारी दिली त्याला त्यांनी १०० टक्के न्याय दिला. विधानसभा निवडणुकीत भाजपाने १४९ जागा लढवल्या व १३२ आमदार निवडून आले. हे भाजपाचे विक्रमी यश आहे, याची जाणीव एकनाथ शिंदे यांनाही आहे म्हणूनच त्यांनी सत्तावाटपातील बदल स्वीकारला.
अजित पवारांनी निवडणुकीचा जनादेश ओळखून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला खुल्या मनाने क्षणाचाही विलंब न लावता समर्थन दिले. पण एकनाथ शिंदे बराच काळ एकांतात विचार करीत राहिले. उपमुख्यमंत्री पदासाठी होकार द्यायलाही त्यांनी बराच विलंब लावला. मनोहर जोशी व नारायण राणे हे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्रीपद व गृहमंत्रीपद भाजपाकडे होते, तसे आपल्याला मिळावे अशी शिंदे यांची इच्छा असणे यात गैर काही नव्हते. पण भाजपाने गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवले. मुख्यमंत्री, गृहमंत्री व विधानसभा अध्यक्ष ही पदे सरकार चालवताना अत्यंत महत्त्वाची असतात हे भाजपाला चांगले ठाऊक आहे.
राज्यात प्रचंड बहुमताचे सरकार असूनही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, पालकमंत्र्यांची घोषणा या सर्वांना विलंब, तर झालाच पण त्यानंतरही एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी हे समाधानी आहेत असे दिसत नाही. आपल्याला गृहखाते मिळाले नाही, याची त्यांना बोच आहे. आरोग्य, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, सांडपाणी, ही खाती शिवसेनेकडे आहेत. खात्याच्या योजना, आढावा व शंभर दिवसांच्या कामाचा आराखडा अशा बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राहिले. त्यातून त्यांची नाराजी कायम आहे, असाच संदेश मीडियातून सर्वत्र गेला. मुख्यमंत्र्यांनी ३६ जिल्ह्यांसाठी पालकमंत्री जाहीर केले. रायगडसाठी आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) व नाशिकसाठी गिरीश महाजन (भाजपा) यांची नावे जाहीर झाली. पण या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळाले पाहिजे अशी ठाम भूमिका शिंदे यांनी घेतली. नाशिकसाठी दादा भुसे व रायगडसाठी भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावे असा शिंदे यांचा आजही आग्रह आहे. मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परत येऊन दोन आठवडे होत आले पण निर्णयात कुठे बदल झालेला नाही. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय. ठाणेकर. एसटी महामंडळासंबंधी व परिवहन खात्याविषयी त्यांनी धडाधड निर्णय घेणे सुरू केले. परिवहनमंत्री म्हणून एसटी महामंडळाचे अध्यक्षपद प्रताप सरनाईक यांना मिळावे असा प्रस्तावही मुख्यमंत्र्यांकडे गेला पण अचानक अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याचे आदेश जारी झाले. अध्यक्ष म्हणून सनदी अधिकारी नेमले गेल्यामुळे परिवहन मंत्र्यांच्या अधिकारावर आपोआपच मर्यादा आल्या आहेत. सन २०१४ ते २०२४ या काळात परिवहन मंत्रीच हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी भरतशेठ गोगावले यांची नेमणूक अध्यक्ष म्हणून केली होती. पण गोगावले हे नव्या सरकारमध्ये मंत्री झाल्याने त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले. १९८५ पर्यंत एसटी महामंडळावर सनदी अधिकारी अध्यक्ष असत. नंतर अशासकीय राजकीय नेमणुका सुरू झाल्या. आता पुन्हा सनदी अधिकारी नेमल्याने शिवसेनेला शॉक ट्रीटमेंट मिळाली आहे. एसटीसाठी १३१० बसेस खरेदी करण्याचा एकनाथ शिंदे यांचा निर्णयही फडणवीस यांनी रद्द केला. एसटीच्या जागा विकसित करून एका संस्थेला देण्याच्या प्रयत्नालाही आता लगाम बसणार आहे. शिवभोजन व आनंदाचा शिधाही बंद होणार आहे. लाडक्या बहिणींची निकषाप्रमाणे छाननी चालू असून ५ लाख बहिणींना अपात्र ठरविण्यात आले आहे.
भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वाक्षरीने जिथे भाजपाचे पालकमंत्री नाहीत तिथे भाजपाच्या मंत्र्यांची जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नेमणूक करण्याचे आदेश निघाले. जनसंपर्क वाढविणे, पक्ष विस्तार करणे व जनतेचे प्रश्न सोडविणे ही कामे पक्षाने जिल्हा संपर्क मंत्र्यांना दिली आहेत. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे व गणेश नाईक यांच्यात फारसे सख्य नाही हे सर्वश्रुत आहे. भाजपाने नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे व पालघर जिल्हा पालकमंत्री नेमले आहे. आता ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या गडावर आपण जनता दरबार घेणार असे नाईकांनी जाहीर करून टाकले. नाईकांचे ठाण्यात काम काय? असा प्रश्न जेव्हा शिवसेना नेत्यांनी विचारला तेव्हा नाईकांनी त्यांना तुम्हीही नवी मुंबईत येऊन जनता दरबार घ्या, असे सांगितले.
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड केले तेव्हा त्यांच्या धाडसाचे कौतुक झाले. ठाकरे व उबाठा सेनेने त्यांच्यावर गद्दार, खोके, मिंधे अशी संभावना केली. निवडणूक आयोगाने शिवसेना व धनुष्यबाण शिंदे यांच्या पक्षाला दिले. जोपर्यंत शिंदे मुख्यमंत्री होते तोपर्यंत त्यांच्या मनासारखे सारे घडत होते. मोदी-शहांचे त्यांना समर्थन व आशीर्वाद होते. आता मात्र भाजपाने २०२९ शतप्रतिशत अशी घोषणा दिली असून त्या दिशेने वाटचाल चालू आहे. शिवाय या वर्षी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. भाजपाची ताकद प्रचंड आहे. भाजपाशी सुसंवाद राखून पक्ष संघटन मजबूत करणे हे फार मोठे आव्हान आहे. मंत्र्यांचे पीएसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतरच नेमले जात आहेत. जी शिस्त दिल्लीत आहे तशी आता मुंबईत येत आहे. याचे भान ठेऊनच महायुतीत काम करावे लागणार आहे. एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या मन:पू्र्वक शुभेच्छा…!!