भालचंद्र कुबल
संयुक्त या शब्दाबद्दल मला विलक्षण आकर्षण आहे. आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत कोकणातल्या गावी जेव्हा जात असू तेव्हा दशावतारी नाटके आमचा विक पॉइंट असायचा. रात्री नाटकाला (आमच्याकडे दशावताराला नाटक असेच संबोधन आहे.) जायचे म्हटले की दुपारी जेवणानंतर कम्पलसरी झोपावे लागे, कारण रात्री जागणे आवश्यक असे. आमचे जाणे वडिलधाऱ्यांवर अवलंबून असे आणि त्यांचे पंचक्रोशीत झळकलेल्या जाहिरातींवर. मे महिन्यातली ही नाटके संयुक्त शब्दाला मध्यवर्ती ठेऊन नाटकातील आख्यान (कथानक) आणि पात्रांवर गर्दी खेचत असत. आज कोकणात पारंपरिक दशावतार सादर करणाऱ्या सात कंपन्या अस्तित्वात आहेत. विविध कथानकांतून लोकप्रिय झालेले राजपार्ट, स्त्रीपार्टी, राक्षसपार्टी, नारद एवढेच नव्हे तर संकासुर, पखवाजी, चक्कीवादक यांचा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग तेव्हाही होता आणि आजही आहे. कोकणात सुट्टी निमित्त आलेल्या मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी, या सात कंपन्या आपापसात कोलॅब्रेशन करून जो संयुक्त दशावतार सादर करीत त्याला आजही हाऊसफुल्ल स्टेटस प्राप्त आहे. संयुक्त शब्दातला थरार आजच्या मल्टीस्टारर सिनेमासारखा असतो. प्रत्येक कलाकाराच्या एण्ट्रीने मैदान दणाणून जाते. तोच साधारण काहीसा प्रकार “गोष्ट संयुक्त संगीत मानापनाची” या नाटकातून सादर केला गेला असावा हा अंदाज खरा ठरला.
बालगंधर्व आणि केशवराव भोसले हे संगीत रंगभूमीवरील तळपते कलाकार! त्यांच्या स्वतःच्या नाटक कंपन्याही बेहतरीन अदाकारीने रसिकांच्या मनात फार वरचे स्थान मिळवून होत्या. स्वातंत्र्याचे वादळ अखिल महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांच्या रूपाने घोंघावत होते. मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळात ‘संगीत मानापमान’ हे नाटक गंधर्व नाटक मंडळी आणि ललित कलादर्श या दोन प्रतिष्ठित नाट्यसंस्थांद्वारे सादर केले जात असे. या दोन्ही संस्थांचे मालक, बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी एकत्र येऊन लोकमान्य टिळकांना आर्थिक मदत लाभावी यासाठी एक ऐतिहासिक प्रयोग सादर केला, जो पुढे ‘संयुक्त संगीत मानापमान’ या नावाने अजरामर झाला. ही ऐतिहासिक घटना आणि त्यामागील कथा प्रेक्षकांसमोर उलगडणारे ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे नाटक प्रेक्षकांना एका वेगळ्याच जादुई रंगभूमीच्या प्रवासाला घेऊन जाते. दोन्ही संचातील सर्वोत्कृष्ट भूमिका बजावणारे नाट्यकर्मी पाहायला आणि ऐकायला मिळणार या उत्कंठेपायीच पहिला प्रयोग हाऊसफुल्ल होतो. चार आणे ते पाच रुपये कमाल तिकीट असणारे नाट्यप्रयोगांसाठी शंभर रुपयांचे कमाल तिकीट म्हणजे त्याकाळी मती गुंगविणारा धक्काच होता. सोळा रुपये सोन्याच्या तोळ्याचा भाव असलेल्या काळात शंभर रुपयाचे पहिले तिकीट म्हणजे त्याकाळच्या लक्ष्मीधरांनाही आव्हान होते. उंची दराची तिकिटे असल्याने प्रसंगी कर्ज काढूनही हा प्रयोग बघितल्याचे नाट्यरसिकांचे संदर्भ तात्कालिक लेखातूनही आज उपलब्ध आहेत. तर अशा या अद्वितिय, अद्भुत नाट्यप्रयोगाची गोष्ट बघताना भावनावश न होणारा मराठी नाट्यरसिक विरळाच. या नाट्यप्रयोगा दरम्यान अनेक बऱ्यावाईट घटना घडत गेल्यामुळे या गोष्टीस रंजकता प्राप्त झाली आहे. उदाहरणार्थ नाटककार खाडीलकरांनी गंधर्व नाटक कंपनीस प्रयोग करण्यास परवानगी न देण्याचा प्रसंग, टिकिटांच्या किमतींवरून निर्माण झालेले काही प्रसंग, बक्षिसादाखल देण्यात आलेले एक तोळा सोने हे प्रसंग गोष्ट सशक्त बनवतात.
एखाद्या नाटकाच्या आयुष्यात असा ऐतिहासिक प्रसंग येणे म्हणजे आजच्या नाट्यअभ्यासकांसाठी महत्त्वाचा तपशील ठरतो. अभिराम भडकमकरांकडे असे अनेक तपशिल असू शकतात कारण त्या रूपाने त्याचे विपुल लेखन विविध रूपांनी आपल्यापर्यंत पोहोचले आहेच. त्या तपशिलाचे गोष्टींमधे रूपांतर करून हृषिकेश जोशींसारख्या कसदार दिग्दर्शकाकडे सोपविल्यावर त्याचा फायनल आऊटपूट कसा रंगतदार होतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. श्यामराज पाटील आणि अनंत वसंत पणशीकर यांनी निर्मिलेली ही नाट्याकती लवकरच रौप्य महोत्सवी पंचवीसावा प्रयोग सादर करील. ‘संगीत मानापमान’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची तिसरी घंटा मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी दिली होती. याच परंपरेनुसार, ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ नाटकाच्या तिसऱ्या घंटेसाठी वंदना गुप्ते, सुप्रिया पिळगांवकर, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये आणि अशा अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. आतापर्यंत ४८ मान्यवरांनी ही परंपरा पुढे नेली असून, २५ व्या प्रयोगासाठी कोण तिसरी घंटा वाजवणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.