विद्यार्थ्यांच्या जीवनात दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा अतिशय महत्त्वाची असते. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे काम बोर्डाच्या परीक्षा करीत असतात. त्यामुळे बोर्डाची परीक्षा देताना नक्कीच विद्यार्थ्यांना परीक्षेची चिंता वाटत असते. जशा बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जवळ येतात तशा काही विद्यार्थ्यांच्या मनात चिंता निर्माण होत असतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची चिंता मनात घेऊ नये. आतापर्यंत हायस्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम शिकवून झालेला असून परीक्षांची रंगीत तालीम सुद्धा झालेली आहे. त्याप्रमाणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेची चिंता करू नये.
रवींद्र तांबे
विद्यार्थ्यांच्या जीवनात दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा अतिशय महत्त्वाची असते. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाला नवी दिशा देण्याचे काम बोर्डाच्या परीक्षा करीत असतात. त्यामुळे बोर्डाची परीक्षा देताना नक्कीच विद्यार्थ्यांना परीक्षेची चिंता वाटत असते. याची प्रमुख कारणे म्हणजे अभ्यासाचा ताण, पूर्ण अभ्यासक्रम, मनातील भीती, अभ्यास अपूर्ण, अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे, अभ्यासातील अनियमितपणा, गणित आणि इंग्रजी विषयाची भीती आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास डळमळीत होणे अशी अनेक कारणे बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांची चिंता वाढविणारी असतात. त्याचप्रमाणे आई-वडिलांनी खूप जास्त गुणांची अपेक्षा ठेवल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेची चिंता वाटू लागते. म्हणजे त्यांच्या मनात जर तरचा प्रश्न निमाण झाल्याने अगदी परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेच्या चिंतेत वाढू होते. तेव्हा विद्यार्थ्यांनी अशा कारणांवर मात करून अधिक उत्साहाने परीक्षेला गेले पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मनातील भीती दूर करून परीक्षा कालावधीत मिळणाऱ्या वेळेचे नियोजन करून बोर्डाच्या परीक्षेला मोठ्या ध्येयाने सामोरे जायला हवे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे या स्वायत्त संस्थेमार्फत १० वीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर १२ वीची परीक्षा ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. यामध्ये आपल्या राज्यात पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नाशिक, अमरावती, लातूर नागपूर कोल्हापूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात येतात. बऱ्याच वेळा चुकीचे मार्गदर्शन मिळाले असेल किंवा मनामध्ये चलबिचल होत असेल तरी विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेविषयी चिंता निर्माण होऊ शकतात. जे विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करतात त्यांना परीक्षेविषयी चिंता निर्माण होत नाही. तेव्हा फेब्रुवारी महिना सुरू होऊन आजचा आठवा दिवस आहे. पुढील आठवड्यामध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरु होत आहेत. तेव्हा आपणच आपले समुपदेशक बनून अभ्यास व परीक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अधिक मदत वाटल्यास आपल्या जवळच्या शिक्षक समुपदेशकाचा सल्ला घ्यावा. त्याप्रमाणे अभ्यासाचा ताण वाढणार नाही याची काळजी विद्यार्थी तसेच मुलांच्या पालकांनी घ्यावी.
जास्त परीक्षेविषयी चिंता वाटत असेल तर बोर्डाने जे नियंत्रण केंद्र स्थापन केलेले असेल त्यांच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करावे. ०२२-२७८९३७५६ किंवा ०२२-२७८८१०७५ या क्रमांकावर सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळात संपर्क साधावा. यासाठी नियंत्रण कक्षासाठी चार कक्ष अधिकारी व १३ समुपदेशक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वरील नंबर हा बोर्डाच्या वाशी कार्यालयातील आहे. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. त्याप्रमाणे मार्गदर्शन घ्यावे. बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनो, आता वेळ कमी आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यायला हवी. आता कमी वेळात परीक्षेच्या वेळी आपला मनावरील ताण वाढणार नाही हे गृहीत धरून निर्णय घ्या. आतापर्यंत किती टक्के गुण मिळाले आहेत याचा विचार करू नये. शेवटी बोर्डाची परीक्षा आहे. पूर्व परीक्षेला नापास झालेले विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत पास झालेले आहेत. तेव्हा एकच लक्ष बोर्डाची परीक्षा हे गृहीत धरून आपल्याला ज्या सूचना विषय शिक्षकांनी दिलेल्या असतील त्याचे काटेकोरपणे पालन करावे. त्याचप्रमाणे दिलेल्या वेळेत विचारलेल्या सर्व प्रश्नांची मुद्देसुद उत्तरे लिहावीत हा आहे. त्यासाठी त्या प्रश्नाला किती गुण आहेत याचा विचार व्हावा.
तेव्हा बोर्डाची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची रंगीत तालीम किंवा सराव परीक्षा नव्हे, तर पुढील भविष्य घडविण्यासाठी या परीक्षा अतिशय महत्त्वाच्या आहेत. एकदा वेळ गेली की परत येत नाही. त्यामुळे वर्षभर जो अभ्यास प्रत्येक विषयाचा केलेला असेल तो त्या त्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील विचारलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर देऊन जास्तीत जास्त गुण संपादन करणे होय. यासाठी आता विद्यार्थ्यांनी आपले शांत डोके ठेवून परीक्षेची तयारी करून घ्यावी.