Tuesday, March 18, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सरथसप्तमीनिमित्त १४४ सांघिक सूर्यनमस्कार

रथसप्तमीनिमित्त १४४ सांघिक सूर्यनमस्कार

मेघना साने

रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवसही मानला जातो. दर वर्षी या दिवसापासून आपला देश अंधारातून प्रकाशाकडे जातो असे म्हणतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रथसप्तमीला अंगणात सूर्यप्रतिमा काढून त्याची पूजा करतात. दुधाचा, खिरीचा नैवेद्य दाखवतात. सूर्याला नैवेद्य दाखवताना दूध उतू जाऊ देतात. भारतात अनेक ठिकाणी सूर्याचा जन्मोत्सव साजरा होत असतो. कोणार्क येथील सूर्यमंदिरात या दिवशी सूर्यनारायणाचा जन्मोत्सव साजरा होतो तर दक्षिण भारतात समुद्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये या दिवशी ब्रह्मोत्सव साजरा होतो. रथयात्रा काढली जाते. तिरुपती येथील बालाजी मंदिरात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो. ते या दिवसाला सूर्यजयंती उत्सव म्हणतात. सूर्यामुळेच तर सृष्टी निर्माण होते, आपल्याला जीवन मिळते. मग तो देवच नाही का, पण इतर देवांप्रमाणे तो अदृश्य नाही. आपण त्याला रोज पाहू शकतो. दर्शन घेऊन नमस्कार करू शकतो. महाराष्ट्रात सकाळच्या प्रहरी सूर्यनमस्कार घालण्याची प्रथा जुनीच आहे. त्यामुळे शरीर कणखर होतं.

योगसाधनेचा अविरत प्रचार आणि प्रसार करणाऱ्या जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाने ४ फेब्रुवारी २०२५ रोजी, रथसप्तमीला सांघिक सूर्यनमस्काराचा उपक्रम आखला होता. १९५१ साली स्थापन झालेल्या जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाला २०२५ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. २०२५ साल हे त्यांचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त त्यांनी वेगवेगळे उपक्रम योजिले आहेत. रथसप्तमीचा कार्यक्रम हा देखील त्यातलाच एक आहे. हा सांघिक सूर्यनमस्काराचा कार्यक्रम अनेक वर्षांपासून साजरा होत आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासून त्याला भव्य सार्वजनिक रूप देण्यात आले आहे. सूर्योदयाच्या वेळी त्यांच्या १४४ साधकांनी प्रत्येकी १४४ सूर्यनमस्कार घालण्याचा एक मोठा उपक्रम यशस्वी करून दाखवला. अर्थात ही त्यांची साधना अनेक महिन्यांची होती. साधारण योगशिक्षण घ्यायला आलेली माणसे सरावाने काही आठवड्यातच बारा सूर्यनमस्कार घालू शकतात. पण पुढे सराव करीत गेल्यास आणि योग्य तऱ्हेने सूर्यनमस्काराचे तंत्र शिकून घेतल्यास ती संख्या वाढवू शकतात. मग पंचवीस, पन्नास आणि काही साधकांना १०८ ते १४४ पर्यंत सूर्यनमस्कार घालणे शक्य होते. ते काही तरुणांनाच शक्य होते असे नाही. ४ फेब्रुवारीच्या योगाभ्यासी मंडळाच्या रथसप्तमीच्या कार्यक्रमात साधकांमध्ये तरुण मुले, स्त्रियाच काय पण वृद्ध माणसांनी सुद्धा १४४ सूर्यनमस्कार घालून दाखवले. सराव आणि मनाचा निश्चय यानेच ते साध्य होते. हा उपक्रम नागपुरातील धरमपेठ येथील ‘चिल्ड्रेन ट्राफिक पार्क’मधील खुल्या सभागृहात योजिला होता. नागपूर, अकोला, अमरावती येथून योगविद्येतील कुशल साधक येथे कार्यक्रमासाठी जमले होते. योगाभ्यासी मंडळाचे शिक्षक राहुल कानिटकर यांच्या सूचनेनुसार सूर्योदयाचे वेळी ६.४२ मिनिटांनी बारा सामंत्र सांघिक सूर्यनमस्कारांना सुरुवात झाली. जवळजवळ एक हजार साधकांनी सांघिक सूर्यनमस्काराचा उपक्रम केल्यावर प्रत्येकाला नवी शक्ती प्राप्त झाली. सूर्यनमस्काराने शरीर, मन, बुद्धी शुद्ध होऊन शरीर निरोगी व शक्तिशाली बनते.

जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह मिलिंद वझलवार यांची संकल्पना अशी होती की, सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी त्याची प्रतिमा कशाला तयार करायला हवी, हा भवताल म्हणजेच एक मंदिर आहे आणि सूर्य हा त्यात देव आहे. ही जीवसृष्टी निर्माण करणारा सूर्य आपल्याला नित्यनेमाने दर्शनही देतो. मग सूर्यनमस्कार घालूनच त्याला अभिवादन करूया. श्रद्धेय रामभाऊ खांडवे गुरुजींच्या प्रोत्साहनाने अनेक साधकांनी आपला सहभाग नोंदवला. वयाची ८० वर्षे पार केलेले खांडवे गुरुजी रथसप्तमीच्या या कार्यक्रमात स्वतः देखील सूर्यनमस्कार घालत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी ‘प्रहार जागृती संस्थे’च्या संचालक फ्लाईट लेफ्टनंट शिवानी देशपांडे उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार करण्यात आला. एक निरोगी व सुदृढ राष्ट्र बनविण्याच्या सदिच्छेने जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाने नागपुरातील शाळाशाळांमधे योगशिक्षक पाठवून विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रशिक्षण दिले. शाळांच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी या उपक्रमाला चांगला पाठिंबा दिल्याने एकावेळी दोनशे ते चारशे विद्यार्थ्यांना पटांगणामध्ये ओळीने बसवून हे प्रशिक्षण देण्यात येत होते. योगाभ्यासी मंडळाचे साधक ही सेवा विनामूल्य देत होते. विद्यार्थ्यांना योगासने आवडू लागली. पुढे मंडळाने १८ जानेवारी २०२५ला नागपुरातील सर्व शाळांची योगासन स्पर्धा आयोजित केली.

माननीय नितीन गडकरी यांच्या मातोश्री भानुताई गडकरी या जनार्दनस्वामींच्या योगशिक्षण प्रचारातील एक साधक होत्या. त्यामुळे माननीय नितीन गडकरी यांनी या स्पर्धेला काही अर्थसहाय्य केले. नागपुरातील भव्य स्टेडियममध्ये भानुताई गडकरी आंतरशालेय योगस्पर्धा आयोजित केली. तेव्हा १०५ शाळांनी भाग घेतला. स्क्रीनवर पाऊण तासांचे योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून साधकांनी प्रत्येक शाळेला प्रोग्रॅम आखून दिला होता. त्याप्रमाणे बारा हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी योगासने सादर केली. नागपूरला हा उपक्रम यशस्वी झाल्यामुळे आजूबाजूच्या शहरांमध्येही जागृती झाली आहे. वर्गांमधे एरवी गडबड करणारे विद्यार्थी योगासने करताना शांतपणे सहकार्य देत असल्याचे पाहून इतर शाळांमधील शिक्षकांचाही उत्साह वाढला आहे. अधिकाधिक शाळांमध्ये योग लोकप्रिय होण्याची शक्यता दिसत आहे.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -