मुंबई : मुंबई महानगरपालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँके’ने उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ‘बँको व अविज पब्लिकेश’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘१ हजार ५०० कोटी व अधिक ठेवी संकलन’ गटामध्ये देण्यात येणारा प्रथम पुरस्कार दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेला प्राप्त झाला आहे. लोणावळा येथे सहकारी बँक क्षेत्रातील पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतीय रिझर्व्ह बँकेचे निवृत्त सरव्यवस्थापक भार्गेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष तथा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, उपाध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार बँकेने मोठ्या प्रमाणात कामकाजाचा विस्तार केला आहे. बँकेचे कार्याध्यक्षे तथा महानगरपालिका सहआयुक्त (परिमंडळ ४) विश्वास शंकरवार, उप कार्याध्यक्षय तथा उप आयुक्त (परिमंडळ- ५) देविदास क्षीरसागर तसेच संचालक मंडळाचे उत्तम व्यवस्थापन आणि नियोजन यामुळे बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत आहे.
अरे देवा! महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका, पण का?
सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील बँकांचा बँको व अविज पब्लिकेश यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव केला जातो. यामध्ये १ हजार ५०० कोटी व अधिक ठेव संकलन गटामध्ये दिला जाणारा मानाचा प्रथम पुरस्कार दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेला प्राप्त झाला आहे.
बँकेचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांच्यासह बँकेचे संचालक श्री. राजेंद्र कराडे, कर्मचारी प्रतिनिधी अनंत धनावडे, जालंधर चकोर, मुकेश घुमरे, किरण आव्हाड, महावीर बनगर, सर्वसाधारण कामकाज, संगणक सल्लागार व विधी समितीचे अध्यक्ष प्रदीप सावंत, कर्जव्यवहार समितीच्या अध्यक्षा वर्षा माळी, उपाध्यक्ष अभिजीत बागूल, विष्णू घुमरे, महेश ठाकरे, भानुदास भोईर, संजय जाधव, बिपीन बोरिचा, कर्मचारी प्रतिनिधी संदीप साळवी आदी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या हितार्थ काम करणाऱ्या दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेचे ३१ मार्च २०२४ अखेरीस महानगरपालिकेचे ७१ हजार ०१३ अधिकारी – कर्मचारी सभासद आहेत. कोअर बँकींग, आर.टी.जी.एस., एन.ई.एफ.टी., ई-कॉमर्स, पॉस इत्यादी सुविधा देणा-या दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेची मुंबई शहर व उपनगरात विविध ठिकाणी स्वमालकीची ११ ए.टी.एम. केंद्र आहेत. बँकेने मोबाईल बँकींग सेवा सुरू केली असून अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांना सुविधा पुरविल्या जात असल्याचे बँकेचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांनी सांगितले.
उत्कृष्ट नियोजन आणि उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करिता बँकेला मानाचे एकूण चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने, दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड यांच्यावतीने पगारदार नोकरांच्या गटात सर्वोत्कृष्ट बँक म्हणून प्रथम पुरस्कार तर, दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक असोसिएशन लि. मुंबई यांच्याद्वारे ‘पगारदार सहकारी बँक‘ गटात प्रथम पुरस्कार मिळाला आहे. तसेच बँकींग फ्रंटिअर्स या संस्थेमार्फत बेस्ट ऑडिट इनिशिएटिव्ह, बेस्ट सायबर सिक्युरिटी इनिशिएटिव्ह व बेस्ट एच. आर. इनोव्हेशन या पुरस्कारांचा समावेश आहे.