मुंबई: मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासाला आज पहाटे भीषण आग लागण्याची घटना घडली. मंत्रालयाच्या मागील बाजूस असलेल्या या इमारतीतील हिंगोली जिल्ह्याचे आमदार संतोष बांगर यांच्या खोली क्रमांक ३१३ मध्ये ही आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, खोलीतील एसीमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच ही आग लक्षात आल्याने आणि अग्निशामक दलाने तातडीने कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला. सकाळी आग लागल्याचे समजताच सुरक्षारक्षकांनी खोलीतील सर्वांना सुरक्षित स्थळी हलवले आणि तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
Mahakumbh Mela Fire : महाकुंभ मेळ्यात पुन्हा अग्नितांडव! अनेक तंबू जळून खाक
या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका करताना आमदार निवासातील सुरक्षा व्यवस्थेच्या दुर्लक्षावर आक्षेप घेतला. “आग लागण्याची घटना अनपेक्षित असते, मात्र आमदार निवासात अग्निशमन यंत्रणा असूनही ती निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आले आहे. इमारतीचे फायर ऑडिट झालेले नाही, यावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
ही घटना इमारतीतील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करणारी असून, यावर प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.