Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यCyber Article : ब्लोटवेअर आणि सायबर सुरक्षितता

Cyber Article : ब्लोटवेअर आणि सायबर सुरक्षितता

मंगला गाडगीळ

बंगळूरुमध्ये राहणाऱ्या तंत्रज्ञ माधवला सोशल मीडियावर मेसेज आला की, तुम्हाला लॉटरी लागली आहे. त्यात तुम्ही नवीन मोबाईल फोन जिंकलेला आहे. तो पूर्णपणे विनामूल्य असून तो तुमच्याकडे लवकरच पोहोचेल. माधव बुचकळ्यात पडला. मी? कोणत्या लॉटरीचे? कधी तिकीट काढले होते? हा मेसेज भंपक असून त्याकडे लक्ष देता कामा नये असे त्याने मनोमन ठरवले. पण खरंच काही दिवसांत त्याच्या घरी त्याच्या नावाने पार्सल आले. त्यात नवा कोरा मोबाईल फोन होता. माधव खूश होऊन तो नवीन कोरा फोन वापरू लागला. काही दिवस वापरल्यानंतर एक दिवस मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या मोबाईलवर काही बँक ट्रान्स्फर झाल्याचे मेसेज आले होते. त्यात २.८ कोटी रुपये अवैध रीतीने काढून घेण्यात आले होते. ही टान्सफर्स त्याने स्वतः केलेली नसल्याने त्याने लगेचच पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी चौकशी सुरू केली. फोन किती दिवस वापरत आहात? कोणत्या दुकानातून विकत घेतला होता? लॉटरीत जिंकलेला फोन म्हटल्यावर त्यांनी मोबाईलमधील निरनिराळे ॲप्सची माहिती काढायला सुरुवात केली. त्यात त्यांना असे आढळले की, मोबाईलमध्ये काही विशिष्ट ॲप्स आहेत. त्याबद्दल चौकशी करता माधवने ते डाऊनलोड केलेले नव्हते. ते अगोदरपासूनच त्यात घातलेले होते. यालाच प्री-इंस्टॉल्ड ॲप्स किंवा ब्लोटवेअर म्हणतात. या ॲप्सच्या मदतीने मोबाईलमधील सर्व माहिती, प्रत्यक्ष त्यावेळी चालणारे काम यावर लक्ष ठेवता येते. थोडक्यात मोबाईलचा ताबा सायबर भामट्यांकडे जातो. बँकेची गोपनीय माहिती, पासवर्ड, अकाऊंट नंबर सर्व काही त्यांना कळते.
एवढी सर्व माहिती समजल्यावर बँक अकाऊंट साफ व्हायला कितीसा वेळ लागणार? माधवच्या बाबतीत हेच घडले होते.
स्मार्ट डिव्हाइसेसच्या युगात, मोबाईल फोनवर आपण फारच अवलंबून राहायला लागलो आहोत. आपल्या मोबाईलमध्ये आपण आपल्या आवश्यकतेनुसार अनेक ॲप्स डाऊनलोड करून ठेवतो. हे ॲप्स डाऊनलोड करण्याअगोदर आपण ज्या स्टोअरवरून डाऊनलोड करतो त्याची तसेच ॲप्सची सुरक्षितता तपासतो. इथे अत्यंत महत्त्वाचा आणि क्वचित धोकादायक असणारा मुद्दा म्हणजे प्री-इंस्टॉल केलेले ॲप्स. क्वचित अशासाठी की, सर्वच प्री-इंस्टॉल केलेले ॲप्स धोकादायक किंवा हानिकारक असतात असे नव्हे. धोकादायक नसले तरी बहुतेक वेळा हे ॲप्स अनावश्यक असतात. हे ॲप्स वापरा अगर वापरू नका तरी ते मोबाईलमधील स्टोरेज स्पेस अडवून ठेवतात. ही स्टोरेज स्पेस मर्यादित असल्याने खरं तर ती मौल्यवान असते. ती उगीचच दवडली जाते. तसेच फोन वापरात नसताना एरव्ही आपल्या नकळत, त्यांचे मात्र काम चालू असते. त्यामुळेच बॅटरीचे चार्जिंग, प्रोसेसिंग पॉवर आणि अर्थातच आपला डेटाही वापरणे चालू असते. ब्लोटवेअर ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे आपल्या मोबाईलमधील ॲप्स उघडण्यास लागणार उशीर. हे ॲप्स हळू उघडतात आणि संथपणे काम करतात.
ब्लोटवेअर विविध प्रकाराने डाऊनलोड होते किंवा केले जाते. उदाहरणार्थ सॉफ्टवेअरचे ट्रायल व्हर्जन, डुप्लिकेट अॅप्स (उदा., वापरकर्त्यांना आधीच स्ट्रीमिंग सेवांमध्ये असताना मालकीचे संगीत प्लेअर) किंवा भागीदार कंपन्यांचे प्रमोशनल ॲप्स इ. यातील अनेक ॲप्स अनइंस्टॉलही करता येत नाहीत. त्यामुळे मोबाईलधारकांची गैरसोय होते. मोबाइल उत्पादक आणि अॅप डेव्हलपर्स त्यांचे ॲप्स डिव्हाइसेसवर समाविष्ट करण्यासाठी करार करतात. हाच करार उत्पादकांसाठी उत्पन्नाचा एक फायदेशीर स्रोत बनतो. याशिवाय इतर उत्पादकांहून स्वतःसाठी वेगळे अस्तित्व तयार करण्यासाठीही स्वतःच्या ॲप्सचा संच मोबाईलमध्ये आधीच घालून ठेवतात. यामुळे उत्पादकांचा फायदा झाला तरी वापरकर्त्यांची गैरसोय किंवा नुकसान होऊ शकते आणि वापरकर्त्यांना माधवसारखे गर्तेत ढकलू शकते. ब्लोटवेअर ही काही केवळ किरकोळ गैरसोय नाही, तर त्यामुळे मोबाईलच्या कार्यक्षमतेवर लक्षणीय परिणाम होतो. स्पष्ट संमतीशिवाय वापरकर्त्यांचा डेटा गोळा केला गेल्यामुळे गोपनीयतेशी तडजोड होते. जुने किंवा खराब डिझाइन केलेले ब्लोटवेअर हे मालवेअर किंवा हॅकर्ससाठी आमंत्रण ठरू शकते.

मोबाईलचे ग्राहक म्हणून आपण अनेक मार्गांनी या त्रासास थांबवू शकतो

1. डिव्हाइस काळजीपूर्वक निवडा. म्हणजेच नवीन स्मार्टफोन खरेदी करताना, निर्माता आणि मॉडेलचा शोध घेऊनच निवड करा.
2. अनलॉक केलेल्या डिव्हाइसेस निवडा.
3. निर्मात्यांकडून किंवा अधिकृत किरकोळ विक्रेत्यांकडून थेट खरेदी केलेल्या डिव्हाइसेसमध्ये (मोबाइल सेवा प्रदात्यांद्वारे ऐवजी) बहुतेकदा कमी ब्लोटवेअर असते. मोबाइल नेटवर्क-ब्रँडेड फोनमध्ये अतिरिक्त ॲप्स आणि कस्टमायझेशन समाविष्ट असतात. अनलॉक केलेले डिव्हाइस निवडून ही कटकट टाळता
येऊ शकते.
4. नको असलेले ॲप्स अक्षम करा किंवा अनइंस्टॉल करा. अनइंस्टॉल करता येत नसलेल्या ॲप्ससाठी, वापरकर्ते अनेकदा फोनच्या सेटिंग्जद्वारे ते अक्षम करू शकतात. ॲप्स अक्षम केल्याने ते बॅकग्राऊंडमध्ये चालू होण्यापासून किंवा ॲप ड्रॉवरमध्ये दिसण्यापासून प्रतिबंधित होते. त्यामुळे ते पूर्णपणे निष्क्रिय होते. सेटिंग्ज > ॲप्स किंवा ॲप्लिकेशन्स > नको असलेले ॲप निवडा > अक्षम करा किंवा अनइंस्टॉल करा यावर टॅप करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -