 
                            मुंबई : हृदय विकाराशी संबंधित अतिशय जटील चाचण्यांमध्ये निदान करण्यासाठी महापालिकेच्या शीव रुग्णालयात (Sion Hospital) अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त ‘टू डी कार्डियोग्राफी अँड कलर डॉप्लर मशीन’सह ‘ट्रान्स इसोफेजिअल इको प्रोब’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे हृदयाच्या मागील बाजूने चाचणी करणे शक्य आहे. थ्रीडी इको, ट्रान्स इसोफेजिअल इको आदी चाचण्या माफक दरात करणे शक्य होणार आहे. यामुळे रूग्णांचा चाचणी करण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधीही कमी होणार आहे.
मुंबई महानगरपालिका संचालित लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हृदय विकाराशी संबंधित चाचणीसाठी येणाऱ्या रूग्णांना ‘टू डी कार्डियोग्राफी अँड कलर डॉप्लर मशीन’च्या उपलब्धतेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. माजी खासदार (राज्यसभा) डॉ. कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून ‘टू डी कार्डियोग्राफी अँड कलर डॉप्लर दोन मशीन’ उपलब्ध झाल्या आहेत. मशीनच्या उपलब्धततेमुळे हृदयरोगाशी संबंधित रूग्णांच्या चाचणीसाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे. कार्डिओलॉजी विभागातील संयंत्रांचे लोकार्पण डॉ. कुमार केतकर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.  याप्रसंगी उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य)  संजय कुऱ्हाडे, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रताप नाथानी आदी उपस्थित होते.
शीव रूग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागात दररोज सरासरी १०० ते १५० रुग्णांच्या टू डी इको चाचणी करण्यात येतात. नव्याने उपलब्ध झालेल्या संयंत्रांमुळे दिवसापोटी अधिकच्या टू डी इको चाचण्या करणे शक्य होणार आहे. हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, हृदयाशी संबंधित व्हॉल्व्हचे आजार, कॕथलॕब येथे होणाऱ्या चाचणीसाठी ही संयंत्रे उपयुक्त ठरणार आहेत.
उपलब्ध टू डी कार्डियोग्राफी अँड कलर डॉप्लर संयंत्रांपैकी एक संयंत्र अतिदक्षता विभाग (आयसीयू) करिता ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आपत्कालीन कक्षात येणाऱ्या रूग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. या संयंत्रांच्या उपलब्धततेमुळे हृदय विकारासाठी दाखल होणाऱ्या रूग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्य होईल.
लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात कार्डिओलॉजी विषयाचे शिक्षण घेणार्याह निवासी डॉक्टरांसाठी ही संयंत्रे शैक्षणिक अभ्यासक्रमात महत्वाची ठरणार आहे. रूग्णसेवेसोबतच वैद्यकीय शिक्षणातही या संयंत्रांचा वापर उपयुक्त ठरणार आहे.
                            
 
     
    




