सध्याच्या बंधाऱ्याची उंची पालघरमधील कवडासाच्या धर्तीवर नवीन पंपिंग स्टेशनमुळे उचलता येईल अधिक पाणी
मुंबई(सचिन धानजी) – मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैंकी भातसा धरणातून सोडलेले पाणी पिसे येथे अडवून जलशुध्दीकरण केंद्राद्वारे मुंबईकरांना वितरण केले जाते आहे. त्यामुळे या पिसे येथील बंधाऱ्याची उंची वाढवून बांधकाम केले जाणार आहे. पालघरमधील कवडासच्या धर्तीवर हा पिसे येथील बंधारा बांधला जाणार असून सध्याच्या नवीन पंपिंग स्टेशनचे बांधकामही केले जाणार आहे. बंधाऱ्याची उंची आणि नवीन ४५५ दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंपिंग स्टेशन बनण्यात येत असल्याने भातसा धरणांतून अधिक पाणी उचलता येणार असल्याने मुंबईकरांना भविष्यात अधिक पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.
मुंबईला एकूण ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असून त्यापैंकी भातसा धरणातून महापालिकेला २१२० दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते. भातसा नदीतून हे पाणी पिसे गावापर्यंत नदीद्वारे होतो आणि या नदीवर पिसे येथे बंधारा बांधण्यात आला आहे. या पिसे बंधाऱ्यातून पंपिंग करून या पाण्याचा पुरवठा केला जातो. या बंधाऱ्याची सुरुवातीला ३१ मीटर टी. एच.डी. या पातळीपर्यंत पाणी साठविण्याची क्षमता होती, त्यानंतर पाण्याची पातळी वाढविण्यासाठी बंधा-याच्या माथ्यावर रबरी बलून बसवून पाण्याची साठवण पातळी २ मीटरने वाढविण्यात आली. या बंधारा व रबरी बलूनच्या देखभाल दुरुस्तीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने तसेच पावसाळ्यात पाणी वाहून जात असल्याने या बंधाऱ्याच्या बांधकामांचे लेखापरिक्षण आणि नवीन बंधाऱ्याच्या बांधकामाचे विश्लेषण सल्लागारामार्फत करण्यात आले होते.
त्यानुसार महापालिकेने या बंधाऱ्याचे नवीन बांधकाम करून अधिक क्षमतेने पाणी मिळणार असल्याने त्यासाठी पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेता सध्याच्या अस्तित्वात असलेल्या बंधा-याच्या खालील बाजूस नविन बंधारा बांधून त्यावर नवीन दरवाजे बसविण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील कवडास येथे केलेले कामाच्या धर्तीवर या बंधाऱ्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कमर्शियल झोपड्यांना मालमत्ता कर लावण्याबाबत आयुक्त काय म्हणाले..
आणखी एक बांधले जाणार ४५५ दशलक्ष लिटरचे पंपिंग स्टेशन
भातसा धरणातून उपलब्ध होणारे पाणी भातसा नदीतून पिसे येथे वाहत येते व पिसे बंधा-याद्वारे ते अडविले जाते. पिसे बंधा-यातून अडविलेले सुमारे २००० दशलक्ष लिटर पाणी टप्प्याटप्प्याने विकसीत केलेल्या उदंचन केंद्राद्वारे पांजरापूर येथे पुढील प्रक्रियेसाठी पाठविले जाते. पिसे पांजरापूर संकुल १९७९ मध्ये भातसा योजनेतंगर्त बांधून कार्यान्वित करण्यात आले आहे. तेव्हापासून टप्पा एक अंतर्गत ४५५ दशलक्ष लिटर, टप्पा दोन अंतर्गत ४५५ दशलक्ष लिटर, टप्पा ३ अंतर्गत ४५५ दशलक्ष लिटर आणि टप्पा ३ अ अंतर्गत ६४० दशलक्ष लिटर क्षमतेचे अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने पंपिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे.
जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यासर्व पंपिंग स्टेशनद्वारे सातत्याने पाणीपुरवठा सुरु असतो. दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत असल्याकारणाने या पंपाची देखभाल करणे जिकीरीचे झाले आहे. वारंवार घडणा-या बिघाडांमुळे पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊन जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. या वारंवार उद्भवणा-या तांत्रिक बिघाडांवर उपाययोजना म्हणून ४५५ दशलक्ष क्षमतेचे नवीन
पंपिंग स्टेशन केंद्र बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन पंपिंग स्टेशनच्या उभारणीनंतर सध्या कार्यरत असलेल्या पंपिंग स्टेशनमधील पंपांची नियमित दुरुस्ती ही मुंबईच्या पाणीपुरवठ्यात अडथळा न आणता करणे शक्य होईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पंपिंग स्टेशनच्या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून मेसर्स टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स ( टीसीई) यांची तर बंधाऱ्याच्या बांधकामासाठी मेसर्स वॅपकॉस लिमिटेड यांची सल्लागार म्हणून सेवा घेण्यात येत आहे. या कामांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या बंधाऱ्याच्या कामासाठी महालक्ष्मी इन्फ्राप्रोजेट्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही कामांसाठी ११४८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
पिसे येथील बंधाऱ्याची आणि पंपिंग स्टेशनची वैशिष्ट्ये
पिसे (भिवंडी) येथे दरवाजा असलेले बंधारा
एकूण २३० मीटर लांबीचा बंधारा
बंधाऱ्याची उंची १३.५ मीटर उंच
तब्बल १४.५ मीटर लांबीचे नॉन ओव्हरफ्लो विभागाचे बांधकाम
बंधा-यासाठी स्वयंचलित दरवाजांचे
बंधा-यांसाठी इतर सुरक्षा प्रणाली
बंधा-याच्या बांधकामासाठी कठीण खडकामध्ये डायमंड कटींग तंत्रज्ञानाचा वापर
सध्या असलेल्या बंधा-याच्या रबरी फुग्यांचे दरवाजे काढून टाकून बंधा-याच्या माथ्यावर कॉंक्रिट केले जाणार
पिसे येथे कशाप्रकारे उभारली गेली पंपिंग स्टेशन
पिसे पांजरापूर संकुल १९७९ मध्ये भातसा योजनेतंगर्त बांधून कार्यान्वित करण्यात आले..
सन १९७९ मध्ये टप्पा १ (४५५ दशलक्ष लिटर),
सन १९८६मध्ये टप्पा २ (४५५दशलक्ष लिटर)
सन १९९६ टप्पा ३ (४५५ दशलक्ष लिटर)
सन २००७ टप्पा-३ अ (६४० दशलक्ष लिटर)
सन २०२५ टप्पा प्रस्तावित ४५५ दशलक्ष लिटर