मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्ताराचे काम सुरू आहे. हे काम आणखी काही दिवस चालणार असल्यामुळे मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) जनशताब्दी आणि मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) तेजस एक्स्प्रेस या दोन लांब पल्ल्याच्या गाड्या २८ फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. फलाट विस्ताराचे काम सुरू असल्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत दक्षिण मुंबईत राहणाऱ्या आणि मध्य-कोकण रेल्वेच्या गाडीने प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत. त्यांना लांब पल्ल्याच्या गाडीतून उतरुन लोकल अथवा इतर पर्यायाचा वापर करुन पुढे प्रवास करावा लागणार आहे.
मुंबईच्या प्रवेशद्वारावर डबलडेकर इंटरचेंज उभारणार, वाहतूक कोंडी फोडणार
सीएसएमटी स्थानकातील मेल-एक्स्प्रेस फलाटांची लांबी २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस चालवण्याच्या दृष्टीने वाढवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५मध्ये निधीची तरतूद करण्यात आली होती. निधी उपलब्ध झाल्यावर मध्य रेल्वेने हे काम सुरू केले असून सध्या विस्तारीकरण अंतिम टप्यात आहे. काम सुरू असल्यामुळे निवडक गाड्यांसाठी सध्या फलाट उपलब्ध नाही. फलाटाच्या अनुपलब्धतेमुळे काही मेल-एक्स्प्रेस ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर मेल-एक्स्प्रेस पुन्हा सीएसएमटीपर्यंत धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
- १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत
- १२१३४ मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे स्थानकापर्यंत
- २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत