गिल, अय्यर आणि अक्षरची जबरदस्त अर्धशतकी खेळी
नागपूर: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने सहज विजय मिळवला आहे. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षऱ पटेल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने विजयासाठी मिळालेले २४९ धावांचे आव्हान ४ विकेट आणि ६८ बॉल राखत पूर्ण केले.
भारताच्या या विजयात गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनी महत्त्वाची भागीदारी केली. आधी गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. हर्षित राणा आणि रवींद्र जडेजा या जोडीने प्रत्येकी तीन विकेट घेत इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले. त्यांनी इंग्लंडला २४८ धावांवर रोखले.
इंग्लंडकडून सलाीमीवीर फिल सॉल्टने ४३ धावा केल्या. तर कर्णधार जोस बटलरने ५२ धावा करत संघाला अडीचशेच्या जवळपास नेण्याचा प्रयत्न केला. त्याला जॅकॉब बेथेलनेही चांगली साथ दिली. त्याने ५१ धावांची खेळी केली.
इंग्लंडच्या डावानंतर भारताने खेळायला सुरूवात केली. भारताचे पहिले दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. १९ धावसंख्या असताना यशस्वी जायसवाल बाद झाला. त्यानंतर लगेचच रोहित शर्मा बाद झाला. रोहितला केवळ २ धावाच करता आल्या. रोहितची बॅट अद्याप धावा काढण्याच्या प्रतीक्षेत आहे.
दोन सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी मोर्चा सांभाळला. त्यांनी खेळपट्टीवर टिकून राहत भारताला शंभरीपार नेले. श्रेयस अय्यर ३६ बॉलमध्ये ५९ धावा करून बाद झाला. त्यानंतर गिल अक्षर पटेलच्या साथीने खेळू लागला. अक्षरनेही ५२ धावांची खेळी करत भारताला विजय सहज करून दिला. शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलेल्या शुभमन गिलने ८७ धावांची खेळी केली. यासोबतच भारताने हा सामना जिंकला.या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.