कोकणातील बाजारपेठेतील अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद करून बाजारपेठेतील जागा भाड्याने दिलेल्या दिसतील हे सत्य चित्र सर्वत्रच दिसेल. कदाचित महाराष्ट्रातीलही वास्तव चित्र असू शकेल. कोकणात उद्योग नाही म्हणून तरुणांना काम नाही हे जसे सत्य आहे तसेच यात आणखीही एक सत्य समोर येताना दिसते. शेती, काही व्यवसायात मोठे काम करता येणे शक्य आहे; परंतु कामाला माणसेच नाहीत…
माझे कोकण – संतोष वायंगणकर
महाराष्ट्रातील कोकण प्रांत हा खरंतर निसर्गसंपन्न कोकणातला समुद्र, नारळी, पोफळीच्या बागा, आमराई आणि काजूच्या बागा, जांभळाची वडिलोपार्जित झाडं, बीटकी गावठी आंब्याची, घराच्या परिसरातील झाडं, शेताच्या बांधावर उभ्या असलेल्या चिवारीची बेटं, कोकणातील किनारपट्टीवर मासेमारीचा व्यवसाय करणारे मच्छीमार बांधव हे सर्व निसर्ग देणगीचं ऐश्वर्य सोबत असतानाही कोकणातील ‘समाधानी’ वृत्तीने जगणारी माणसं पालघरपासून सापडतील, पाहायला मिळतील. एकीकडे कोकणातील माणसं उद्योग व्यवसायासाठी गाव सोडून पुणे-मुंबईकडे जात आहेत. म्हणजे पूर्वी गावाकडे दहावी-बारावी पास, नापास झालेले, घरच्या कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक गरज म्हणून गाव सोडून मुंबई गाठण्याची वेळ कोकणातील त्याकाळच्या तरुणांवर आली. आजही या परिस्थितीमध्ये फार काही बदल झाला नाही. फरक इतकाच आहे आजही कोकणात काही उद्योग उभारणी होऊ शकली नाही. कोकणात कोणताही छोटा-मोठा उद्योग उभारणी होऊ न शकण्याचे कारण परत आपल्याकडेच येऊन थांबते. कोकणात कोणताही उद्योग यायचा झाला, तर त्याला विरोध करणारे ठरावीक ठरलेले आहेतच. कोकणात विरोध करणारे जे कोणी आहेत किंवा असतील तर ते कधीही हा उद्योग नको तर दुसरा हा आणतो, आणू या असा सकारात्मक विचार आजवर कधीही चर्चेत समोर आला नाही. यामुळे कोकणात काय हवे यावर फारशी चर्चा कधी होऊ शकली नाही. तर काहीसा हा विचारच अधिक लोकांमध्ये रुजला आणि मग कोकणातील कोणत्याही उद्योगाची चर्चा सुरू झाली की कोकणबाह्य स्वयंसेवी संस्था विकासाला विरोध करत उभ्या राहतात. या सर्वांमुळे आजपर्यंत कोकणातील तरुणाला रोजगाराच्या कोणत्याही संधी नाहीत. याचा राजकीय इच्छाशक्तीशी काही संबंध नाही. फक्त नकारात्मकतेच्या विचाराने प्रेरित होऊन वाढणारी संख्या या सर्वांमुळे आतापर्यंत कोकणाचेच नुकसान झाले आहे.
कोकणात नोकरीची कोणतीही संधी उपलब्ध नाही. यामुळे कोकणातील तरुण पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसारख्या शहरांचा रस्ता धरतात. तिकडे जाऊन नाईलाजाने नोकरी करतात. इच्छा असूनही कोकणात ते रोजगारासाठी थांबू शकत नाहीत. जे कोकणात तरुण आहेत त्यांची कोणतेही काम करून पैसे कमावण्याची मानसिकता नाही. कोकणात विविध व्यवसायात परप्रांतीय स्थिरावत आहेत; परंतु रस्त्यावर उभं राहून व्यवसाय करण्याची आमची तयारी नाही. ‘ये भैया दो कटिंग दो, अरे यार तीन गीलास ज्युस दो म्हणून मिजास मारून ऑर्डर करण्यात आपण धन्यता मानतो. कोकणातील महामार्गाच्या दुतर्फा उसाचा रस विकणारे जे दिसतात ते गेल्या दहा वर्षांतलेच आहेत. त्या सर्वांशी बोलल्यावर कळतं की त्यांचा व्यवसायातील संयमीतपणा गेल्या दोन-तीन वर्षांत त्यांना आर्थिक स्थिरता देऊन गेला. भय्याने दुकान उघडलं म्हणून नाक मुरडण्यापेक्षा आपल्या कोकणातील कोणीही तरुण हा विचार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या कोकणातील कोणी तसा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केलाच तर मात्र त्याच्या शेजारच्या घरात चर्चा होऊन तो देखील तोच व्यवसाय करण्यासाठी पुढे येतो हेच खरंतर कोकणच दुर्दैव आहे. व्यवसायातही विविधता आणता येऊ शकते; परंतु तसं दुर्दैवाने फार क्वचित घडतं यामुळे कोकणातील माणसांमधील स्वत:तील दोष समजून घेतले पाहिजेत.
जसे की, आम्हीच शहाणे आहोत, आम्हाला कोण काय शिकवणार असं वाटणारे, स्वत:ला समजणारे कधीही पुढे जाण्याच्या विचार करू शकत नाहीत. कोकणातील सर्वच शहरांमधील बहुतांश व्यापार हा परप्रांतीयांच्या हाती कधीचाच गेला आहे. शहरातील बाजारपेठेत पूर्वी आपल्या कोकणातील व्यावसायिक दिसायचा; परंतु दुर्दैवाने आज किराणा, कापड यांसारख्या व्यवसायात गुजराती, माखाडी स्थिरावलेले दिसतात. कोकणातील बाजारपेठेतील अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद करून बाजारपेठेतील जागा भाड्याने दिलेल्या दिसतील हे सत्य चित्र कोकणात सर्वत्रच दिसेल. कदाचित महाराष्ट्रातीलही वास्तव चित्र असू शकेल. कोकणात उद्योग नाही म्हणून तरुणांना काम नाही हे जसं सत्य आहे तसेच यात आणखीही एक सत्य समोर येताना दिसते. शेती, काही व्यवसायात मोठे काम करता येणे शक्य आहे; परंतु कामाला माणसेच नाहीत. शेती, बागायतीत काम करणाऱ्यांना दिवसा रोजंदारी ६०० रुपये रोखीने दिले जातात; परंतु तरीही कोकणात या कामांसाठी माणसंच मिळत नाहीत. कदाचित ग्रामीण भागातील काही गावातून काम न करताच असेच फिरणारे दिसतील. पण आम्ही तसला काम करूचव नाय. आमका या काम जमणारा नाय असं सांगणारेही कमी नाहीत. यामुळे कोकणातील जनतेने विशेषत: तरुणांनीच या सर्वांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. कोकणात नवीन उद्योग, व्यवसाय येण्यासाठी तसे वातावरण तयार करावं लागेल. तरच कोकणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि गावोगावी, वाडीवस्तीत बंद घराचे जे वाढते प्रमाण आहे ते रोखता येऊ शकेल. हे सर्व आपल्याच कोकणवासीयांच्याच हाती आहे. उगाचच कोणी काय केले नाही या राजकीय हिशोबांची मांडणी न करता फक्त सकारात्मकतेने विचार आणि प्रयत्न केले तर चित्र नक्की बदलेल.