Tuesday, March 18, 2025

आनंदाचे अनुकार

श्री गुरुगाथा – अरविन्द दोडे

ते आनंदाचे अनुकार |
सुखाचे अंकुर |
की महाबोधे विहार |
केले जैसे ॥ ५.१३८ ॥

ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंब आहेत किंवा जणू महाबोधानं आपल्याला राहायला मंदिर केले आहे, ते विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत. अशा गुरूला प्रणाम!

आपल्या स्वरूपाचं सौंदर्य दाखवतो तो गुरू. आपल्या आक्षेपांना उत्तरं देतो तो गुरू… कल्पनेच्या आभाळातून सत्याच्या भूमीवर आणतो तो गुरू… निमिषा-निमिषाचे अर्थ सांगतो तो गुरू… फळहेतूचा अव्हेर करतो तो गुरू… सात्त्विकतेचा उन्मेष ज्याच्या अमृतवाणीत असतो तो गुरू… विनाशाची उत्तरावस्था किती भयानक असते, हे पटवून देतो तो गुरू… ज्याचं निर्भर मानस सदैव आनंदवर्षा करतो तो गुरू… तो आत्महिताचा अनुवाद करतो. तो नवनीचा नित्यनूतन झरा असतो. तोच सकल संकटांचा परिहार करतो. त्याच्याशिवाय ध्यान कुणाचं करणार? त्याच्याशिवाय अक्षराचा अधिकार दुसऱ्या कुणाला असणार?

पाषाण फुटावेत तसं आपलं दुर्दैव आणि दु:ख! अवगुण, अविचारानं वाट चुकणारे आपण. ‌‘द्रव्य हे पाषाणाहूनी हीन’ हे कळतच नाही कधी. प्रपंचाचा वीट आला तरी ‌‘जाग’ येत नाही. गुरू हेच एक औषध!
गुरो: पादोतकं पीत्वा |
गुरोरुच्छिष्ट भोजनम्‌‍॥
गुरुमूर्ते: सदा ध्यानं |
गुरुमंत्रं सदा जपेत्‌‍॥

त्या औषधानं वैराग्य दृढ होतं. विवेक झोपत नाही. गुरुचरणांचं महत्त्व कळतं. गुरुआज्ञा पाळण्याची नम्रता रक्तात भिनते. गुरुतीर्थ प्राशन करून त्यांचं उष्टं अन्न – एक घास किंवा एक शित – खाण्यास मिळालं तरी अंगात दैवी शक्ती संचारते. गुरुमूर्तीचं ध्यान सतत केल्यानं साधना पूर्णत्वाकडे होत राहते. त्यानं दिलेला मंत्र सदा जपल्यानं आत्मसामर्थ्य वाढतं. निर्भयतेनं जगता येतं.

सर्वांत साधं, सोपं आणि सुलभ साधन म्हणजे ध्यान. सगुण ध्यान निर्गुणाचा अनुभव देतं. आपल्या वागण्याबोलण्यात गुरूप्रेमाने, गुरूसाठी प्रेरित होऊन दैनंदिन व्यवहार गुरुस्मरणानं करावेत, हे मूर्तिध्यान. नोकरदार असो, दुकानदार असो किंवा उद्योगपती असो ध्यानयोगानं चित्तशुद्धी होते. वासनाक्षय होतो. यावर साधकांनी चिंतन करावं.

गुरुमूर्तिं स्मरेन्नित्यं |
गुरुनाम सदा जपेत्‌‍॥
हे शब्द आहेत प्रस्तुत ‌‘श्रीगुरुगाथे’चं तात्पर्य.
आता ध्यानाबाबत संक्षिप्त खुलासा.
आतून जागं होणं म्हणजे ध्यान… निर्विचार होणं म्हणजे ध्यान… योगानं चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे ध्यान… साक्षीभावानं सुखदु:खांकडे तटस्थपणे पाहणं म्हणजे ध्यान… हेच एकमात्र असं साधनतत्त्व आहे की, आत आणि बाहेरच्या विश्वाच्या सीमारेषेवर साधक दृष्टाभावानं उभा राहून निरीक्षण करतो. गुरुरहस्य समजू शकतो.

ध्यानसाधना ही योगशास्त्रात सांगितलीय, सत्यानं कर्मफललाभ होतो. जसं आहे, तसं सांगणं यालाच सत्य म्हणतात. दुसऱ्याची वस्तू चोरून किंवा बळजबरीनं न घेणे म्हणजे अस्तेय. कामसुख न घेणं म्हणजे ब्रह्मचर्य. मनानेही निर्वासन होणं. कुठल्याही परिस्थितीत कुणाकडून काही न घेणं म्हणजे साठा न करणं म्हणजे अपरिग्रह. घेतल्यास माणूस गुलाम किंवा परतंत्र होतो. बांधला जातो. शिवाय आसक्त होतो. योग साधनेत हे झालेत यम आणि नियम. ते असे – (नियमित सवयी लावणे) तप, स्वाध्याय, संतोष, शौच आणि ईश्वरप्रणिधान. नियमित/मीतहार/उपवास हे शारीरिक तप. नित्यपाठानं मंत्र, स्तोत्रानं सत्त्वशुद्धी होते. अशा पाठास म्हणतात स्वाध्याय. वाचिक, मानसिक आणि उपांशू या तीन पद्धती नामजपाच्या आहेत. इतरांना ऐकू जातो तो वाचिक जप. ज्या तपात ओठ हलताना दिसतात, पण ऐकू येत नाही तो उपांशू जप. जो मनातल्या मनात करतात तो मानसजप होय! यात अर्थाचं चिंतन अपेक्षित असतं. हा सर्वांत श्रेष्ठ जपप्रकार. शरीरस्नान करणं हे बाह्यशौच. सत्याद्वारा मन शुद्ध करणं हे अभ्यंतर शौच. ईश्वराचं स्तवन, चिंतन आणि भक्तीलाच ईश्वरप्रणिधान म्हणतात.
यानंतर योगाची पुढील पायरी आहे ‌‘आसना’ची. माणसाला पाच-दहा मिनिटं गप्प बसता येत नाही. हात, पाय, मान हलवतच राहतो. शिवाय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड (आणि बाष्कळ!) बडबड करतच राहतो.

खाण्यासाठी तोंड चालवतोच! निश्चल बसण्याची सवय लागावी म्हणून ‌‘आसना’चा नियम आहे. (प्राणायामात गुरू हवा.) त्याचे तीन भाग. रेचक, पूरक आणि कुंभक. रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणं. पूरक म्हणजे श्वास आत घेणं आणि कुंभक म्हणजे श्वास आत धारण करणं. इतर बाह्य गोष्टी आपल्या इच्छेच्या ताब्यात आणणं म्हणजे प्रत्याहार. स्वत:कडे ओढून घेणं. हृदयकमळावर, मस्तकाच्या मध्यभागावर किंवा देहान्तर्गत अन्य एखाद्या स्थानावर मन केंद्रित करणं म्हणजे धारणा.

आता ध्यानाचा गूढार्थ असा आहे की, मन एका स्थानाशी संलग्न करून, त्याच एका स्थानाचा अवलंब करून विशिष्ट वृत्तीचा प्रवाह सुरू केला, अन्य प्रवाह आधीच्या प्रवाहाला नष्ट न करता एकच एक सात्त्विक चित्तवृत्ती राहते. अन्य प्रवाह क्षीण होऊन संपतात. यालाच म्हणतात ‌‘ध्यान’!

मनाला एकाच वृतीत गुंतवल्यानं एकाग्रता साधते. त्यावेळी मनाच्या त्या एकरूपतेलाच म्हणतात ‌‘समाधी.’ मनाला एखाद्या स्थानावर केंद्रित करता आले तर ती एक धारणा. ही बारापट झाली की एक ध्यान आणि ध्यान बारापट झालं की एक समाधी!

शंकर भगवान पार्वतीला गुरूची लक्षणं सांगतात. गुरू साधकाचे तामस, राजस आणि सात्त्विक गुण पाहतो. गुणशुद्धी करवून घेतो. स्थूलभक्तीकडून सूक्ष्म साधनेकडे नेतो. बौद्धिक पातळीकडून तो आत्मिक पातळीवर नेतो. जो गुरू आत्मबोध करतो, पण साधना, उपासना करवून घेत नाही, तो गुरू ‌‘कच्चा’ समजला जातो. साक्षात्काराच्या अंतिम शिखरावर घेऊन जातो तो ‌‘सच्चा’ गुरू!
जय गुरुदेव!

([email protected])

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -