मुंबई : ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने क्रिकेट आणि साहित्य क्षेत्राला मोठी हानी झाली असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देत अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा आवाज निमाला – मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा व मिरवणारा आवाज या खेळातील संज्ञेप्रमाणेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे आज निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राचे क्रिकेट प्रेम सर्वश्रृत आहे. पण या प्रेमाची जगभर ख्याती मिरवण्याची किमया संझगिरी यांनी साधली. क्रिकेट सामन्यांचे ओघवत्या शैलीतील त्यांच्या वृत्तांकनांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचे क्रिकेट समीक्षण रसरशीत आणि तितकेच रोमांचक असे. क्रिकेट शिवाय नाटक, चित्रपटांचे लेखन यांसह अनेकविध क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. क्रिकेट या खेळावर त्यांनी अखेरपर्यंत निस्सीम प्रेम केले.
त्यांच्या निधनाने एक उत्कट क्रीडाप्रेमी, क्रिकेट विषयीच्या लेखन-समीक्षणाने मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचे चाहते, कुटुंबियांच्या आम्ही दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Dwarkanath Sanzgiri : क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन
द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
क्रीडा समीक्षणात साहित्यविश्वाचे सौंदर्य ओतून आपल्या ओघवत्या कथनशैलीमुळे क्रीडाक्षेत्राची आवड मनामनांत पेरणारे प्रसिद्ध समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे मराठीच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
आपल्या शोक संदेशात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, द्वारकानाथ संझगिरी हे साक्षेपी साहित्यिक, पत्रकार, स्तंभलेखक आणि चित्रवाणी कार्यक्रमांचे निर्माते अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने एका मिश्किल आणि खुमासदार शैलीच्या क्रीडा पत्रकाराला महाराष्ट्र मुकला आहे.
उत्कृष्ट पत्रकारिता, लेखनशैली, समीक्षा अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या संझगिरी यांनी मराठी, इंग्रजी आदी भाषांतील लेखनातून वाचकांशी साधलेल्या संवादाचा धागा तुटला आहे. त्यांच्या असंख्य पुस्तकांनी मराठी वाचकांना आनंद दिला आणि त्यांचे अनुभवविश्व समृद्ध केले. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला आहे. प्रदीर्घ काळ क्रीडा पत्रकारिता केलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांच्याकडे क्रिकेटसह क्रीडा विश्वातील रंजक गोष्टींचा खजिना होता. रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला अवगत होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातलं त्यांचं स्थान अढळ आणि योगदान अविस्मरणीय आहे. संझगिरी यांनी पत्रकारितेच्या पलिकडे जावून क्रिकेट, क्रीडाक्षेत्राची खेळाची सेवा केली. खेळांचा आत्मा समजून घेत खेळ आणि खेळाडूंना जोडण्याचं काम केलं. क्रीडाक्षेत्रातील घटना, त्या घटनेचं विश्लेषण खुमासदार लेखनशैली, जिवंत समालोचनाद्वारे रसिकांपर्यंत पोहचवण्याचं काम केलं.
क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारांबद्दल त्यांना सखोल ज्ञान होतं. खेळांमधले बारकावे समजावून सांगण्याची शैली अद्वितीय होती. त्यांच्याकडे बघत क्रीडा पत्रकार, क्रीडारसिकांच्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेतील दीपस्तंभ ढासळला आहे. क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडाक्षेत्राच्या इतिहासात त्यांचं नाव अजरामर राहणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.