मुंबई : राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने निकाल दिला आहे. करुणा शर्मा ही धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आणि राजश्री ही त्यांची दुसरी पत्नी आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे ९ जानेवारी १९९८ रोजी लग्न झाले होते, ही बाब सिद्ध झाल्याचे कौटुंबिक न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचे वैवाहिक आयुष्य २०१८ पर्यंत सुरळीत होते. पण नंतर धनंजय मुंडे यांनी करुणा यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली; असेही कौटुंबिक न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
राजश्री यांच्याशी विवाह केल्यानंतर करुणा यांना धनंजय मुंडे यांनी ज्या प्रकराची वागणूक दिली ती अन्यायकारक आहे. करुणा शर्मा पोटगीसाठी पात्र आहेत. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दरमहा एक लाख २५ हजार रुपये पोटगी म्हणून द्यावेत. तसेच मुलगी शिवानीला लग्न होईपर्यंत दरमहा ७५ हजार रुपये द्यावे, असा आदेश वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला. अर्जदार करुणा शर्मा यांनी अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून पोटगी द्यावी, असाही आदेश कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना दिला आहे. न्यायालयीन कारवाईसाठी झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना २५ हजार रुपये द्यावे, असाही आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे.
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे ९ जानेवारी १९९८ रोजी लग्न झाले. हा प्रेमविवाह होता. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांनी सहमतीने आंतरजातीय विवाह केला होता. धनंजय मुंडेंनी १८ जुलै २०१७ रोजी एका मालमत्तेच्या मालकी हक्काबाबतच्या कागदपत्रांमध्ये या संदर्भात उल्लेख केला आहे. ही बाब तसेच करुणा शर्मा यांनी सादर केलेले साक्षी – पुरावे यांची दखल घेऊन कौटुंबिक न्यायालयाने निकाल दिला आहे.
करुणा मुंडे या फैमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी
करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च… pic.twitter.com/URrKRw6B7V
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 6, 2025
कौटुंबिक न्यायालयाचा निकाल ‘एक्स’वर पोस्ट करुन अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन तासांत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.