ऋतुराज – ऋतुजा केळकर
बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणारा हा ‘कुंभमेळा’. प्रत्येक भारतीयांकरिताच नव्हे तर परदेशी पर्यटकांचे देखील आकर्षणाचे केंद्र म्हणजे महाकुंभ मेळा. सर्वप्रथम काय आहे महाकुंभ मेळा हे समजून घेणे गरजेचे आहे. मत्स्य पुराणानुसार सागर मंथनाच्या वेळी अमृताचे चार थेंब हरीद्वार, उज्जैन तसेच नाशिक आणि प्रयागराज म्हणजे पूर्वीचे इलाहाबाद येथे पडले. हरीद्वार, उज्जेन तसेच नाशिक येथे दर सहा वर्षांनी अर्धकुंभ मेळा भरतो. पण प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हा मेळा बारा वर्षांनी भरतो. गंगा नदीच्या तीरावर स्थित हरिद्वारमध्ये कुंभमेळा प्रत्येक बारा वर्षांनी होतो. तसेच गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर नाशिकमध्ये देखील कुंभमेळा आयोजित केला जातो आणि शेवटचे तीर्थस्थळ म्हणजे उज्जैन. क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैनमध्ये देखील कुंभमेळा भरतो.
कसं आहे ना, दर सहा वर्षांनी येतो तो अर्धकुंभ, बारा वर्षांनी येतो तो पूर्णकुंभ आणि बारा पूर्ण कुंभानंतर येतो तो महाकुंभ मेळा की जो, यावर्षी म्हणजे २०२५ साली ‘एकशे चव्वेचाळीस वर्षांनी’ आलेला आहे. त्यामुळे यावर्षीच्या या महाकुंभ मेळ्याला संपूर्ण जगतात विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. येथे स्नान केल्याने पापक्षालन होते. तसेच मुक्तीची कवाडे उघडतात अशी धारणा आहे. खरं तर पहिला कुंभमेळा नक्की कधी सुरू झाला याचे काही ठोस पुरावे नाहीत पण आदि शंकराचार्यांनी याची सुरुवात केली असावी असे म्हटले जाते. म्हणूनच असेल पण यात नागा साधू इतर संत तसेच साधू आणि पीठाधिपती यात आपली हजेरी लावतात. त्याचे अजून एक कारण म्हणजे यात घडले जाणारे ‘शाही स्नान’ की ज्याचे कुंभमेळ्यात प्रचंड महत्त्व आहे त्याची सुरुवात चौदा किंवा सोळाव्या शतकात झाली असावी. अाध्यात्मिक, पौराणिक, खगोलीय महत्त्व असलेला हा महाकुंभमेळा हा राजा हर्षवर्धन यांनी सुरू केला असेही म्हटले जाते. मुघलकालीन दस्तऐवजामध्ये देखील कुंभ मेळ्याचा उल्लेख सापडतो.
प्रयागराज येथील असलेल्या संगम तटावरील सनातन धर्माचे सर्व आखाडे हे देखील यातील प्रमुख वैशिष्ट आहे. याचा आता प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटला तो आपल्या प्रसारमाध्यमाने आरंभलेल्या टीआरपीकरिताच्या काही बातम्यांमुळे. त्यात प्रामुख्याने अभिनेत्री ममता कुलकर्णी यांचे नाव सर्वप्रथम येतेच येते. कारण त्यांना देण्यात आलेले ‘महामंडलेश्वर’ हे पद पुन्हा नियमांचे उल्लंघन केले म्हणून काढून घेतले. त्यानंतर येते ती माळा विकणारी मोनालिसा भोसले, त्यानंतर पुन्हा येते ती एक तुर्की हवाईसुंदरी आयीफिन ही घेत असलेला संन्यास.
एकंदरच प्रसार माध्यमातून येणाऱ्या या बातम्या कुठेतरी व्यथित करीत आहेत. अशाकरिता की आम्ही किती सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवण्याच्या खोट्या प्रयत्नात आपली कौशल्ये न वापरता, आपल्या समाजातील प्रसार माध्यमे म्हणजे एक शस्त्र या योगदानाची पूर्तता न करता फक्त सनसनाटी बातम्या देणे या अंतर्गत आपल्याकडे काय आहे हे पाहण्यापेक्षा आपण काय विकतो यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या माध्यमांना फक्त अशाच चित्रविचित्र बातम्या का बरं दिसाव्यात आणि त्या देखील आपण सारे अगदी चवीचवीने पाहतो, असे का?
खरं तर प्रसारमाध्यमे ही एक प्रकारे अतिशय चांगल्या पद्धतीने वापरता येऊ शकतील. पण बरेचदा असे दिसून येते की, आपल्याला आपले श्रेष्ठत्वच माहिती नसते. कुठल्याही उत्तम प्रसारमाध्यमाची जाहिरात कधीच करावी लागत नाही, कारण हिरा हा कुठेही ठेवला तरी त्याचे तेज हे लपत नाही जसे की संन्याशाची पोरं म्हणून हिणवलेल्या भावंडांना ज्या समाजाने जगणे मुश्कील केले. त्याच संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेल्या भगवत गीतेचे मराठी भाषांतर म्हणजेच ‘श्रीमद ज्ञानेश्वरी’ आज मराठीच नव्हे तर अखिल सृष्टीस मार्गदर्शक ठरेल असा ग्रंथ साहित्य म्हणून जगतात मान्य आहे. संत सखुबाई, संत तुकाराम या आणि यांसारख्या संत संप्रदायातील कित्येकांना किती छळ सहन करावा लागला हे काही पुन्हा एकदा सांगावे लागणार आहे का? गुरु गोविंद सिंग असोत अगर मेल्यावरही हालहाल केलेले भगवान येशू असोत त्याचे महत्त्व आणि त्यांची मौलिकता ही लपून राहिलेली नाही. मी तर म्हणेन की, प्रसार माध्यमांनी ‘माझंच कसं योग्य आहे’ या ‘वादात’ वेळ घालवण्यापेक्षा ‘काय योग्य आहे’ याकडे जर विषेश वेळ आणि लक्ष दिले ना तर त्यांना आपल्या टीआरपीकरिता अशा महाकुंभ मेळ्यासारख्या अध्यात्मिक ठिकाणी स्त्रियांच्या पदरापाठी लपण्याची अजिबात गरज पडणार नाही.
आणि म्हणूनच याचा विचार करणे आज कालानुरूप अत्यंत गरजेचे नाही का? म्हणूनच कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व बाजूला पडून हे जे काही विचित्र चालले आहे ते फारच घाणेरडे चाललेले आहे असे नाही का वाटत आपणास? कुठे खगोलीय, अाध्यात्मिक आणि पौराणिक धरतीवर चालू असलेले शाही स्नान आणि कुठे ‘शाहरुख खान याने या कुंभमेळ्यात हजेरी लाऊन हे शाही स्नान केले की नाही?” यातील व्हायरल सत्य शोधात भटकणारी ही प्रसारमाध्यमे !
तुमच्याकडे काय आहे, काय नाही यापेक्षा तुम्ही ते कसं मांडता ते महत्त्वाचे आहे. शिवाय मला वाटतं की, सर्वात महत्त्वाचा आहे तो, ‘प्रेक्षक’ म्हणजे वाचक म्हणजेच जनता जनार्दन´. कारण प्रतिक्रियेपेक्षा प्रतिसादाला जास्त महत्त्व असते. त्यामुळे आयुष्यात प्रतिसाद हा कसा द्यायचा, कधी द्यायचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुठल्यावेळी द्यायचा ते आधी नागरिकांनी ठरवायला हवे तर आणि तरच खऱ्या अर्थाने प्रसारमाध्यमे आपली कामे योग्य त्या पद्धतीने करतील नाहीतर आपल्याला म्हणावं लागेल.
‘देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही…
सांग कुठं ठेऊ माथा कळनाचं काही…’