Thursday, March 27, 2025

परमेश्वराचे आकलन

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे तो म्हणजे परमेश्वराबद्दलचे अज्ञान. जे जगातल्या सर्व लोकांमध्ये आहे, ते अज्ञानच जगातल्या सर्व समस्यांचे मूळ आहे. जगात जेवढ्या समस्या आहेत, जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, जेवढ्या युद्ध लढाया होतात, जेवढा रक्तपात होतो किंबहुना माणसांकडून ज्या अनिष्ट गोष्टी घडतात त्या सर्वांचे एकमेव कारण म्हणजे परमेश्वराबद्दलचे अज्ञान. काही लोक परमेश्वर आहे म्हणतात तर काही लोक परमेश्वर नाही म्हणतात. आहे म्हणणाऱ्यांना परमेश्वर आहे म्हणजे काय ते ठाऊक नाही व नाही म्हणणाऱ्यांना ते नाही म्हणतात म्हणजे काय ते ठाऊक नाही. अशा परिस्थितीत परमेश्वराबद्दलचे ज्ञान, तो जसा आहे तसा समजणे कधीही शक्य नाही. पूर्वीही नाही, आजही नाही व यापुढेही ते शक्य नाही. तुम्ही म्हणाल का? कारण परमेश्वराला आदी नाही व अंतही नाही. तो अनंत आहे. सर्व दृष्टीने सर्वार्थाने सर्वांगाने तो अनंत आहे. त्याचे ज्ञान अनंत आहे, त्याचा आनंद अनंत आहे, त्याच्याकडून निर्माण झालेले त्याचे निसर्गनियम ते ही अनंत.

तुम्ही जर बारकाईने बघितले तर तुम्हाला असे दिसून येईल की परमेश्वर सर्व दृष्टीने अनंत आहे. त्याचा परिणाम असा की, आपल्याला परमेश्वराला तो आहे तसा आकळता येत नाही. त्याचा आपल्याला जो काही थोडाफार अनुभव आहे त्यावरून तो आपल्याला कळू शकतो. तुम्ही म्हणाल वामनराव तुम्ही हे काय सांगता? उदाहरण देवून सांगतो. घरात बायका भात शिजवतात तेव्हा त्या भात शिजला की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक तांदूळ काढून बघत नाहीत. दोनचार शिते काढली की त्यावरून भात शिजला की नाही हे आपल्याला कळू शकते. तसे परमेश्वर जसा आहे तसा आपल्याला आकळता येणार नाही हे खरेच, पण त्याचे स्वरूप आणि रूप मगाशी म्हटल्याप्रमाणे भात शिजला की नाही हे कळते त्याप्रमाणे समजू शकते. हे कसे ते उदाहरण देऊन सांगतो. सागर म्हणजे महासागर आहे. पृथ्वीच्या सर्व बाजूंनी हा महासागर आहे. पाण्यांत पृथ्वी आहे असे म्हटले तरी चालेल. हा महासागर संपूर्णपणे पहायला झाला तर आपल्याला तो पाहाता येईल का? त्याची खोली आपल्याला पाहता येत नाही. त्याची लांबीरुंदी सुद्धा आपल्याला पाहता येत नाही. पण त्याचे पाणी हातात घेतले व थोडेसे तोंडात टाकले तर त्याची चव खारट आहे हे कळते, त्याला वजन आहे हे कळते अशा तऱ्हेने समुद्राबद्दल अनेक गोष्टी आपल्याला कळतात अगदी थोडेसे पाणी हातात घेऊनही त्यासाठी सगळा समुद्र बघण्याची गरज नाही आणि तसा तो बघताही येणार नाही. तसेच परमेश्वराचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -