Saturday, August 30, 2025

स्वामींच्या नामजपाचा हिशोब

स्वामींच्या नामजपाचा हिशोब

समर्थ कृपा - विलास खानोलकर

एके दिवशी बाळाप्पास श्री स्वामी म्हणाले, ‘जप करतो, परंतु हिशोब असू दे बरे.’ तेव्हा राणीसाहेबांस सुंदराबाईने सांगितले की. ‘बाळाप्पा महाराजांजवळ येऊन दंगा करतो.’ तेव्हा राणीसाहेबांकडून गंगुलाल जमादार येऊन त्याने बाळाप्पास ‘दर्शनास येऊ नये’, अशी ताकीद दिली. ते ऐकून बाळाप्पास अतिदुःख झाले. त्याला असे वाटले की, ‘बायको-पोरे सोडून सद्गुरू सेवेकरिता येथे आलो, पण येथे सेवा तर नाहीच, परंतु दर्शनही नाही. असे आपले काय प्राक्तन आहे कोण जाणे?’ असे म्हणून बाळाप्पा दूर उभे राहून श्री समर्थांची मोठ्याने रडत रडत प्रार्थना करीत आहे. तेच महाराज पुढे छातीवर हात ठेवून म्हणाले, ‘अगं, तुझी खबर घेतो बरे.’ असे त्रिवार म्हणाले, थोड्याच दिवसांत बाईच्या पायास इजा होऊन ती अगदी पराधीन झाली.

अर्थ सर्वसाक्षी श्री स्वामी बाळाप्पा आणि सुंदराबाईंचे वर्तन कसे होते हे जाणून होते. तिच्या पूर्व पुण्याईच्या बळावर हे सर्व चालले होते. हे श्री स्वामी जाणतही होते आणि तटस्थ वृत्तीने बघतही होते. माया-मोह, अनिवार इच्छा आकांक्षेत बुडालेल्या सुंदराबाईस सांगूनही काही उपयोग नव्हता; कारण तिच्या देहबुद्धीत हे सर्व दुर्गुण पक्के भिनले होते.

श्री स्वामी समर्थ रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर सान्निध्य-सेवा करण्याची संधी लाभूनही त्या दुर्गुणांचा हळूहळू का होईना निचरा करण्याचा प्रयत्न ती करीत नव्हती. तिचे दुर्भाग्य. दुसरे काय? पण, बाळाप्पाच्या बाबतीत श्री स्वामींनी काढलेले उद्‌गार, ‘जप करतो; परंतु हिशोब असू दे बरं.’ यातून श्री स्वामींचे बाळाप्पाच्या उपासनेवर बारीक लक्ष असल्याचे दिसते. येथे सद्‌गुरूरूपी विवेक हा सत्प्रवृत्त-विरक्त बाळाप्पाच्या साधनेस पुष्टीच देत होता. आपणसुद्धा येथे कोणाची प्रतिमा स्वीकारायची आणि आचरणात आणावयाची हे ठरवावयाचे आहे.

सुंदराबाई बाळाप्पाविषयी राणीसाहेबांकडे खोटा कांगावा करते. कोणताही सारासार विचार न करता खरे काय आणि खोटे काय याची शहानिशा न करता मायावी सुंदराबाईच्या प्रभावाखाली येऊन राणीसाहेब गंगुलाल जमादाराकरवी बाळाप्पास ‘श्री स्वामींच्या दर्शनास येऊ नये’ अशी ताकीद देतात. येथेही वरिष्ठांनी न्यायनिवाडा कसा करावा, हा प्रश्न आहे; परंतु, दुष्ट प्रवृत्तीने येथे सत्प्रवृत्ती, विरक्तीवर मात केलेली दिसते. म्हणून अनेकदा आपणही सहजच म्हणतो, ‘खऱ्याची दुनिया नाही’. पण, हे सदासर्वदा यशस्वी होऊ शकत नाही. विरक्ती, सत्प्रवृत्ती क्षणिक पराभूत होऊ शकते; परंतु कायमची कधीच पराजित होत नाही. अंतिमतः सत्याचा सत्प्रवृत्तीचा, विरक्तीचाच विजय होतो. हे सर्वमान्य सत्य येथे बाळाप्पाच्या रूपाने अधोरेखित होते.

हृदयसिंहासनावर स्थापित केलेल्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास प्रतिबंध केल्याचे बाळाप्पास फार दुःख होते. त्याचे हे उन्मयी दुःख ‘बायको-पोरे सोडून सद्गुरू सेवेकरिता येथे आलो, पण येथे सेवा तर नाहीच, परंतु दर्शनही नाही. असे आपले काय प्राक्तन आहे कोण जाणे?’ या उद्‌गारांतून स्पष्टच दिसते. बाळाप्पाचे आर्त रडणे, कळवळा श्री स्वामींना समजल्याशिवाय कसे राहील? निष्ठावान भक्ताच्या पायाला काटा जरी टोचला, तरी सद्‌गुरूंच्या डोळ्यांत टचकन पाणी येते, असे भक्तिमार्गात मानतात. त्यामुळेच तर महाराज छातीवर हात ठेवून सुंदराबाईच्या अंतर्यामी देहबुद्धीला आवर घालण्यासाठीच त्रिवार म्हणाले, ‘अगं, तुझी खबर घेतो बरे.’ म्हणजे राणीसाहेबांस तुझे बाळाप्पाविषयीचे लबाडीचे सांगणे आमच्या लक्षात आले बरे; पण तिला हे कळले नाही.

थोड्याच दिवसांत श्री स्वार्मीच्या या ब्रह्मवाक्याची प्रचिती सुंदराबाईस आली. तिच्या पायास इजा होऊन ती परावलंबी झाली. यावरून ‘सत्य पलभरके लिए पराजित हो सकता है, लेकिन हमेशा के लिए नहीं.’ अखेरीस सत्याचाच विजय झाला. सुंदराबाईच्या हकालपट्टीची चिन्हे सर्वांनाच दिसू लागली. बाळाप्पास श्री स्वामींचा उत्तराधिकारी म्हणून सन्मान मिळाला. कुप्रवृत्तीचा विजय क्षणिक असतो; सत्प्रवृत्तीचा-विरक्तीचा विजय कायम असतो, हाच इथला अर्थबोध आहे.

स्वामींनी भक्तांना दिलेले भाग्य

स्वामी काय देऊ मी तुला भाग्य दिलेस तू मला नामात रंगलो मी भक्तिभावाने सेवेत रमलो मी मुक्त मनाने मन झाले प्रसन्न अन्नदानाने गिळीयली आसवं भुकेल्या जीवाने नव्हते कुणी नात्याचे तरी नाते जुळले नव्हते ते रक्ताचे परि रेशमाने गाठविले एकच एक नाते स्वामी भक्तीत बांधले स्वामी वचनाच्या धाग्यांनी होते विणले भक्त म्हणतो स्वामींसी स्वामी माऊली भक्ताच्या डोईवर स्वामींची सावली स्वामी माऊलीला अंतःकरणी जपली अन् संसार दुःखे मज सहज वाटली स्वामी सेवेत सदा तल्लीन राहावे स्वामी कथांचे नित्य श्रवण करावे स्वामी तिन्ही त्रिकाल हृदयी स्मरावे स्वामी चरणी सदा नतमस्तक राहावे स्वामींशी तुळशी बिल्व पत्रीने पूजावे हीना सुगंधी अत्तर दोन्ही करांसी लावावे चंपक मोगरा स्वामी समर्था चरणी अर्पावे ‘श्रीस्वामी समर्थ’ षडाक्षरात अंतर्मुख व्हावे हम गये नही हम जिंदा है भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे ही स्वामी वचने सदैव एक सत्य आहे एकदा तरी स्वामींचे होऊनी तूची पाहे vilaskhanolkarkardo@gmail.com
Comments
Add Comment