अनेकदा माणसाकडून चुका होतात आणि त्यातून त्याला अपराधीपणाची भावना येते. तुम्हाला अशी अपराधीपणाची भावना वारंवार येण्यासाठी, तुम्ही स्वतःला सतत दोषी समजावं यासाठी जेव्हा काही ठरावीक लोकं सातत्याने प्रयत्न करतात, मुद्दाम प्रयत्न करतात तेव्हा त्याला मानसशास्त्रीय भाषेत गिल्ट ट्रिप असे म्हणतात.
मीनाक्षी जगदाळे
‘स्वतःची चूक असून पण दुसऱ्याला अपराधीपणाची भावना देणे’. आपण स्वतः अनेकदा असा अनुभव घेतो की, आपल्याला प्रचंड अपराधी वाटते, आपलीच चूक झाली, आपण स्वतःला खूप खूप गिल्टी फील करतो, पच्छाताप करतो, रडतो, मनातल्या मनात स्वतःला सतत दोष देत राहतो. कोणतीही घटना, कोणतीही परिस्थिती अथवा कोणी व्यक्ती आपल्यात अशी भावना प्रकट होण्यास कारणीभूत असते. कधी काही बाबतीत आपण चुकलेलो असूही शकतो, आपल्यामुळे काहीतरी बिघडलेलं असूही शकतं, कुठेतरी आपलं वागणं, बोलणं, आपला निर्णय हा चुकीचा किंवा इतरांसाठी नक्कीच त्रासदायक झालेला असू शकतो. जर खरंच तसं असेल आणि त्याबद्दल कोणी आपल्याला दोष दिला, जबाबदार धरलं किंवा आपल्यालाच ती जाणीव होऊन आपण स्वतःवर नाराज झालो तर ते गृहीत असतं. अनेकदा माणसाकडून चुका होतात आणि त्यातून त्याला अपराधीपणाची भावना येते.
महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला अशी अपराधीपणाची भावना वारंवार येण्यासाठी, तुम्ही स्वतःला सतत दोषी समजावं यासाठी जेव्हा काही ठरावीक लोकं सातत्याने प्रयत्न करतात, मुद्दाम प्रयत्न करतात तेव्हा त्याला मानसशास्त्रीय भाषेत गिल्ट ट्रिप असे म्हणतात.घरात, कुटुंबात, समाजात सगळीकडेच अनेकदा काही लोकं इतरांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी, त्यांना स्वतःची लाज वाटावी, स्वतःच्याच मनातून स्वतःला उतरवण्यासाठी गिल्ट ट्रिपचा हेतूपूर्वक वापर करताना दिसतात. कोणत्याही वाईट गोष्टीला, घटनेला, परिस्थिती दुसरा कसा जबाबदार आहे, त्याच्यामुळेच हे सर्व झालं, त्यानेच केला हे ठासून ठासून परत परत सांगून त्याला मानसिक दृष्टीने पूर्ण उद्ध्वस्त केले जाते. शक्यतो हा प्रयत्न म्हणजेच गिल्ट ट्रिप प्रकार. जो खरा दोषी आहे त्याला झाकायला अथवा त्याची बाजू सुरक्षित करायला, त्याने जे चुकीचं केलं आहे ते उघडं पडू नये म्हणून लपवायला केला जातो. ज्याच्यामुळे नुकसान झालं आहे किंवा काही गोष्टी बिघडल्या आहेत त्या कोणाला समजू नयेत म्हणून ती व्यक्ती स्वतः अथवा तिच्या बाजूने असलेले इतर लोकं भलत्याच माणसाला जबाबदार धरून गिल्ट ट्रिपची म्हणजेच अपराधी पणाची भावना प्रकर्षाने देण्याचा प्रयत्न करतात.स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच दुषकृत्य झाकण्यासाठी इतरांना फक्त जबाबदार धरून हे लोकं थांबत नाहीत तर स्वतःच्या बाजूच्या लोकांची एकी करून, दुसऱ्याला एकटं पाडून टार्गेट करून सतत त्याला मानसिक दृष्टीने कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करतात. जो एकटा पडलेला असतो, जो खरा किंवा निरपराध असून पण ज्याच्या बाजूने बोलणारे, त्याची बाजू मांडणारे कोणी नसते अशा लोकांना गिल्ट ट्रिपचे शिकार झाल्यास खूप त्रास होतो. चुकीच्या लोकांची संख्या जास्त असून त्यांची एकी असल्याने खरा असलेला, सत्य असलेला, ज्याची काहीच चूक नाही असा माणूस सावज म्हणून अशा लोकांच्या तावडीत सापडतो.
गिल्ट ट्रिप देण्यात येत असलेल्या व्यक्तीला तो प्रत्येक बाबतीत कसा चुकीचा आहे, खोटा आहे, तोच कसा वाईट आहे, कमी आहे हे दाखवण्यासाठी अनेक मार्ग आणि संधी शोधल्या जातात. सातत्याने अनेक लोकांनी एकत्र येऊन एका व्यक्तीवर आरोपांचा भडीमार केला, त्याला त्रासून सोडला, त्याला सतत हिणवत राहिलं की तो पण स्वतःला त्याच नजरेने पाहायला लागतो. त्याला स्वतःला पण वाटायला लागतं की मीच चुकीचा आहे, माझ्यात दोष आहे, काहीही वाईट घडण्याला मीच जबाबदार आहे. त्याची मानसिकता इतक्या प्रमाणात बिघडते की तो स्वतःला सतत कोसत राहतो आणि त्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी पण पर्याय शिल्लक राहत नाही. ज्याला गिल्ट ट्रिप करायचं त्याची सार्वजनिक बदनामी करणे, त्याच्यावर विनाकारण टीका करणे, त्याला एकटं पाडणे, सतत त्याला टोमणे मारणे असे प्रकार केले जातात. जी व्यक्ती गिल्ट ट्रिप होते तिला अक्षरशः स्वतःचा जीव नकोसा होईल इतकं मानसिक दृष्टीने छळलं जातं. ही व्यक्ती चोवीस तास त्याच विचारात स्वतःला गुरफटून घेते. खरं-खोटं, चूक-बरोबर याचा विचार करण्याइतपत पण त्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास राहत नाही. स्वतःबद्दलचे अनेक प्रश्न आणि शंका या व्यक्तीच्या मनात प्रकर्षाने येऊ लागतात. जे लोकं या व्यक्तीला गिल्ट ट्रिप करतात त्यांच्याबद्दल मनात खूप भीती, दहशत, दडपण तयार होते. त्यांना आपली बाजू अनेकदा समजावून सांगून पण समजत का नाही ही भावना या व्यक्तीला आतून कमजोर करत राहते. माझं बोलणं, माझं सांगणं, माझी बाजू कोणीच का ऐकून घेत नाही म्हणून ही व्यक्ती अधिकाधिक नैराश्यग्रस्त होत जाते, सर्व प्रयत्न करून थकून जाते पण त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
वास्तविक जो चुकला आहे, ज्याच्यामुळे सर्व काही बिघडलं आहे त्याची बाजू घेऊन ती भक्कम करणे हा गिल्ट ट्रिप करणाऱ्या लोकांचा हेतू असतो. दुसऱ्याला दोष देऊन आपल्या चुका झाकणे या मानसिकतेमधून काही लोकं असं वागतात. आपण त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे ते आपल्या मनावर आहे. जे कोणी आपल्याला गिल्ट ट्रिप करत आहेत त्या लोकांना पहिले ओळखा. अशा लोकांना आपण काहीही केले तरी आपले विचार पचणार आणि पटणार नाहीत. कारण त्यांची तेवढी कुवत नाही. अशा लोकांशी भेटणे, बोलणे शक्यतो टाळणे, त्यांच्या कोणत्याही बोलण्यावर प्रतिक्रिया न देणे हा उत्तम पर्याय आहे. अशा लोकांना तुम्ही स्वतःच्या कोणत्याही वागण्या-बोलण्याचे समर्थन देऊ नका. या लोकांची तुमच्याबद्दल टोकाची नकारात्मक भूमिका असते. त्यामुळे तुम्ही कितीही जीव तोडून काहीही पटवून द्यायचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर परिणाम होणार नाही हे लक्षात घ्या.
स्वतःची चुकीची बाजू झाकण्यासाठी, लोकांना आपली चूक लक्षात येऊ नये म्हणून हे लोकं तुमचीच खूप बदनामी करतील त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. सारासार विचारशक्ती असलेल्या लोकांना, समाजाला चांगलं वाईट समजत असतं. त्यामुळे आपल्याबद्दल कोणी वाईट गोष्टी पसरवल्या तरी त्यामुळे दुःखी- कष्टी होऊ नका. इतरांना पण स्वतःच्या बाजूच स्पष्टीकरण देण्यात वेळ वाया घालवू नका. असे केल्यामुळे आपलीच किंमत कमी होते आणि आपला वेळ खूप वाया जातो. गिल्ट ट्रिप झाल्यामुळे अनेक लोकं मानसिकदृष्टीने उद्ध्वस्त होतात, त्यांचा आत्मविश्वास जातो, स्वतःच्या नजरेत ते स्वतःला खूप कमी लेखतात. त्यांचं स्वतःवर प्रेम राहत नाही. त्यांच्या मनात भीतीची, असुरक्षित असण्याची, एकटेपणाची, एकाकीपणाची भावना निर्माण होते. ज्यांनी त्यांना गिल्ट ट्रिप केलं आहे त्या लोकांची प्रचंड भीती, दहशत वाटून त्यांचा खूप कोंडमारा होतो. आपल्याकडे प्रत्येकजण संशय घेऊन बघतोय, आपल्या माघारी बोलतोय असं त्यांना वाटत राहतं. त्यामुळे आपल्याला हे समजणं खूप महत्त्वाचे आहे की, आपल्याला गिल्ट ट्रिप केलं जातं आहे. आपल्यासोबत असं होत असताना सुद्धा आपलं मानसिक संतुलन बिघडू न देणे, शांत आणि संयमी राहणे हे आव्हान आपल्याला पेलता आले पाहिजे. जेणेकरून असे करणाऱ्यांचे ध्येय कधीही पूर्ण होणार नाही. आपण देखील कोणासोबत असे कधीही करू नये, आपल्याकडून असे घडू नये याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे.
[email protected]