व्यक्तीच्या सौंदर्याचा आरसा म्हणजे आपला चेहरा. प्रत्येक महिलेची इच्छा असते की, आपली त्वचा चमकदार आणि निरोगी असावी. मात्र, आजकाल खराब जीवनशैली, सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे, प्रदूषण आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे चेहऱ्यावर काळे डाग आणि सुरकुत्या येण्याची समस्या जास्त प्रमाणात निर्माण होते. यामुळे केवळ आपल्या सौंदर्यावरच परिणाम होत नाही, तर आपण वयाच्या आधी म्हातारे दिसू लागतो. त्वचेची काळजी घेणारी अनेकजण बाजारातील महागडी उत्पादने आपल्या चेहऱ्यावर वापरतात; परंतु या उत्पादनाचा फारसा उपयोग होत नाही. काळानंतरने या महागड्या उत्पादनाचा देखील परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. त्यासाठी अनेकजण घरगुती उपाय करतात. त्यामुळे घरात असलेल्या काही गोष्टी त्वचेवरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करतात. तसेच हे उपाय तुमच्या त्वचेवर चमक आणण्यास देखील मदत करू शकतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की आयुर्वेदात अनेक नैसर्गिक उपायांमुळे या समस्यांपासून सुटका मिळू शकते? चला जाणून घेऊया असे काही आयुर्वेदिक उपाय ज्यामुळे तुम्हाला या समस्यांपासून नक्कीच सुटका मिळेल.
१. बदामाचे तेल

बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते. जे त्वचेला आर्द्रता देते आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर बदामाच तेल लावा किंवा मसाज करा. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होईल.
२. संत्र्यांच्या सालीची पावडर
त्वचा चमकदार करण्यासाठी संत्र्याची साल खूप उपयुक्त ठरू शकते. हे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करू शकते. आता येणाऱ्या हंगामात त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी या सालींपासून बनवलेल्या फेसपॅकचा वापर तुम्ही करू शकता. संत्र्याची साल वाळवून त्याची पावडर तयार करून त्यात थोडे गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावावे. याव्यतिरिक्त चंदन आणि बेसनचा सुद्धा वापर करू शकता. त्यांनतर १५ मिनिटांनी चेहरा धुऊन टाका.
३. व्हिटॅमिन ई कॅप्सूल

‘व्हिटॅमिन ई’ हे एक प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे, जे त्वचेच्या पेशींना हानी पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. चेहऱ्यासाठी ‘व्हिटॅमिन ई’ खूप फायदेशीर आहे. कारण यामुळे कोलेजेनचे उत्पादन वाढण्यास आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. ‘व्हिटॅमिन ई’ कॅप्सूलचे तेल चेहऱ्यावर लावू शकता. या तेलाचा त्वचेवर वापर केल्याने त्वचा उजळते आणि तिचा रंग सुधारतो. याव्यतिरिक्त कोरफड जेल किंवा खोबरेल तेलात ‘व्हिटॅमिन ई’ कॅप्सूल मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता.
४. आवळा

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. जे त्वचेमध्ये कोलेजन तयार करण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. आवळ्यात असणाऱ्या गुणधर्मांमुळे यकृत सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्याची त्वचा चमकण्यास मदत होते. तुम्ही आवळ्याचा रस चेहऱ्यावर २० मिनिटे लावा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचा सुधारेल आणि डाग कमी होतील.
५. कोरफड जेल

कोरफड जेलमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेला शांत करतात आणि सुरकुत्या कमी करतात. एलोवेरा जेल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते यामध्ये ह्युमेक्टंट्स असतात. म्हणूनच नियमित याचा वापर केल्यास दिवसभर त्वचेच्या पेशी हायड्रेट राहण्यास मदत होते. चेहऱ्यावर कोरफडीचे ताजे जेल लावा आणि २० मिनिटे राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
६. बेसन आणि दही

बेसन त्वचेला एक्सफोलिएट करते आणि दही त्वचेला आर्द्रता देते. दोन चमचे दही, एक चमचा बेसन पीठ, चिमूटभर हळद आणि एक चमचा टोमॅटोचा रस एकत्र मिसळून घ्या, त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. १५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि त्वचा चमकदार होते.
७. हळद आणि दूध
हळदीमध्ये जंतुनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे काळे डाग कमी करण्यास मदत करतात. दुधामुळे त्वचेला ओलावा येतो आणि सुरकुत्या कमी होतात. एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद पावडर मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा १५ ते २० मिनिटे कोरडे राहू द्या, नंतर थंड पाण्याने धुवा. त्याच्या नियमित वापराने त्वचा सुधारते आणि डाग कमी होतात.
८. चांगली झोप

चांगली झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. यामुळे केवळ आपले शरीर आणि मन निरोगी राहत नाही, तर आपल्या त्वचेची चमक आणि सौंदर्य देखील चांगले राहते. त्वचा सुंदर दिसण्यासाठी तिची तितकीच काळजी घेणे देखील गरजेचे असते. त्वचेवर हवा तसा ग्लो येण्यासाठी त्वचेची आतून – बाहेरून योग्य ती काळजी घ्यावी लागते. योग्य प्रमाणात झोप घेतल्यास एकूणच शरीर व त्वचेवर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.
(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. प्रहार माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)