मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एन विभाग कार्यालयाच्या वतीने घाटकोपर (पश्चिम) रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुनझुनवाला महाविद्यालय ते रामरहिम मंत्र मंडळ दरम्यानचे रस्ते व पदपथावरील ४३ अनधिकृत शेड आणि अतिक्रमणांवर मंगळवारी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी कारवाई करण्यात आली. त्यामुळे झुनझुनवाला परिसर अतिक्रमण मुक्त झाल्याने या परिसरातील नागरिकांनी तसेच रेल्वे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्यात येत आहे.
Bandra Bhabha Hospital : वांद्रे भाभा रुग्णालयात आता सुपरस्पेशालिटी आरोग्य सुविधा
एन विभागातील घाटकोपर (पश्चिम) रेल्वे स्थानकाला समांतर असलेल्या झुनझुनवाला महाविद्यालय ते रामरहिम मित्र मंडळ या परिसरात अनेक वर्षांपासून असलेला नाईलाजाने देहविक्रय करणाऱ्यांचा परिसर (रेड लाईट एरिया) हटविण्याबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर, उप आयुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनात आणि सहायक आयुक्त (एन विभाग) गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात दिनांक ३ आणि ४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीदरम्यान तोडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार, या परिसरातील रस्ते व पदपथावर असलेले ४३ अतिक्रमण आणि अनधिकृत शेड्सवर कारवाई करून रस्ता व पदपथ मोकळा करण्यात आला. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.