मुंबई : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल सेवा मंगळवारी विस्कळीत झाली होती. दोन ते तीन तास ही सेवा खंडित झाली असल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून समजली आहे. तसेच वेग मर्यादा कमी झाल्याने सर्व लोकल धीम्या गतीने चालत होत्या. परिणामी संपूर्ण वेळापत्रक कोलमडले असून ऐन गर्दीच्या वेळीच ही समस्या उद्भवली असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
एका रेल्वे प्रवाशाने याबद्दल ट्वीटरवर तक्रार केली आहे. गेल्या अर्धा तासांपासून अनेक लोकल गाड्या या बोरिवली, विरार, वसई, वांद्रे, जोगेश्वरी, दादर यांसह विविध ठिकाणी थांबल्या आहेत. या ट्रेन साधारण ३० ते ३५ मिनिटे उशीराने धावत आहेत. विशेष म्हणजे अनेक एसी लोकलही उशीराने सुरु आहेत.
देवनारमधील डम्पिंग ग्राऊंडवरील वीज निर्मिती प्रकल्प ऑक्टोबर २०२५ला होणार सुरु
गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे लोकल उशिराने धावत आहेत. किती वाईट सेवा आहे, असा प्रश्न एका प्रवाशाने विचारला आहे. त्यावर पश्चिम रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ट्रॅक देखभालीचे काम सुरु आहे. त्यामुळे ट्रेनच्या वेगावर निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे अनेक ट्रेन या उशीराने धावत आहे. तुम्हाला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करत आहोत, असे पश्चिम रेल्वे सांगितले आहे.