खूप दिवस लिहिण्याचे मनात होते पण काही केल्या लेखणी कागदावर उतरतच नव्हती. गेल्या ३५ वर्षांचा कॅन्सरच्या क्षेत्रातील माझाही प्रवास इतका मला अनुभव संपन्न करून गेला. हे मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा लक्षात येते एवढ्या वर्षांत ज्या भारतभरातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचता आले त्याचे श्रेय मी ज्या संस्थेत कार्यरत आहे त्या माझ्या कॅन्सर पेशन्ट एड असोसिएशनला देते. माझ्या संस्थेद्वारे मी देशातील विविध प्रकारच्या लोकांच्या संपर्कात येऊन त्यांच्याशी संपर्क सांधण्याचे भाग्य मला मिळाले आणि त्यांच्यामुळेच मला थोडा फार जीवनाचा अर्थ समजला. याचा उपयोग मला लोकांशी तसेच माझ्या पेशन्टबरोबर वागताना झाला. त्याचाशी त्यांच्या त्रासाबद्दल बोलताना त्यांचे दुःख मला माझेही वाटू लागले त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल याचा सतत विचार माझ्या मनात येत राहिला आणि त्यानुसार माझे प्रयन्त राहिले. जेव्हा संस्थेत पाऊल ठेवले तेव्हाच दृढ निश्चय केला की, जे काम मला दिले जाईल ते प्रामाणिकपणे करीन आणि त्याला न्याय देईन.
नीता मोरे
कर्करोगाचे सर्वांगीण व्यवस्थापन कॅन्सर पेशन्ट एड असोसिएशनद्वारे गेली ५५ वर्षे होत आहे. त्यामध्ये जनजागृती, पूर्वप्राथमिक चिकित्सा ते कर्करोगाच्या आजारातून बरे होत असलेल्या रूग्णांचे पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी करण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत संस्थेच्या माध्यमातून केली जाते. १९६९ पासून कॅन्सरग्रस्थांना मदत देण्याच्या उद्देशाने सुरू झालेले सी.पी.ए.चे कार्य आज विविध स्थरावर होत आहे, त्यातील पुनर्वसन व प्रतिबंधात्मक उपाय या महत्त्वाच्या बाबींचा विचार करून जनजागृती व पूर्वप्राथमिक चिकित्सा यावर काम केले आहे आणि त्या माध्यमातून आमचा भारतभर प्रवास होत आहे. जी प्रिंसिपल्स, जे संस्कार माझ्या आई-वडिलांनी आणि माझ्या पतीच्या पाठिंब्यामुळे आणि त्याचबरोबर ज्या पुस्तकांनी मला समृद्ध केले त्याचा मी माझ्या वैयक्तिक जीवनात पुरेपूर वापर केला. तसेच कॅन्सर पेशन्ट एड असोसिएशनचे चेअरमन वा. के. सप्रू आणि सध्या संस्थेचा कार्यभार सांभाळणाऱ्या श्रीमती अल्का बीसेन यांच्या सहकार्यामुळे मी आज हे काम समाजासाठी करू शकले.
कर्करोग पीडित हा शब्द कानावर पडला तरी आपल्या नजरेमध्ये किंवा चेहऱ्यावर दयेचा भाव निर्माण होतो. असे वाटते की, ही व्यक्ती याला कशी सामोरे जाणार किंवा ही व्यक्ती आता थोड्याच दिवसाची सोबती आहे, पण ह्या व्यक्तींना किंवा स्त्रियांना तुमच्या दयेची किंवा सहानुभूतेची गरज नसते. तर तुमचा मदतीचा हात हा त्यांना त्यांच्या या कष्टमय प्रवासात एक फार मोठा आधार बनू शकतो आणि त्यांचा पुढील प्रवास सुखकर होऊ शकतो. कर्करोगग्रस्थ रुग्ण हा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अडचणीत सापडलेला आढळतो. या त्याच्या अडचणीच्या काळात त्याला नेहमीच मदतीची गरज असते. मग ती मानसिक असो किंवा आर्थिक यासाठी कॅन्सर पेशंट एड असोसिएशन नेहमीच पेशंटची गरज लक्षात घेऊन मदतीचा हात पुरवीत असते. जेव्हा ते संस्थेमध्ये येतात त्यावेळेला त्यांच्याकडे पाहताना त्यांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण झालेले आढळते. पण समुपदेशानंतर तर त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला जातो त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर तो रुग्ण व त्याचे नातेवाईक पुढील गोष्टींबद्दल दिशा मिळाल्यामुळे खूपच सकारात्मक दृष्टिकोनाने आजाराकडे पाहू लागतात आणि उत्तमपणे त्याला सामोरे जातात.
आतापर्यंत जवळजवळ ३,८५,००० लोकांचा तपास केला गेला आहे. सध्या स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त दिसत आहे. विशेषतः स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याचे प्रमाण वाढले आहे. या धर्तीवर संस्थेच्या माध्यमातून निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे व त्यांच्या निर्मूलनासाठी अभ्यासही केला जात आहे. हे कार्य संस्थेच्या इतर शाखांमध्ये म्हणजे दिल्ली व पुणे येथूनही तेवढ्याच जोमाने केले जात आहे. संस्थेमार्फत मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की, कॅन्सर म्हणजे कॅन्सल नाही तर वेळीच या आजाराचे निदान झाले तर ती व्यक्ती किंवा स्त्री अतिशय चांगल्या पद्धतीने आपले पुढील आयुष्य चांगल्या रीतीने व्यतीत करू शकते. माझे सर्वांना एवढेच सांगणे राहील की, स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्ही तुमच्या घराचा कणा आहात.
तुमचे आरोग्य हे तुमच्या कुटुंबाच्या एकूण जडणघडणीत खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. तेव्हा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की, कुठल्याही व्यसनांपासून दूर राहा आणि नियमित स्वतःची शारीरिक तपासणी करून घ्या. व्यायाम आणि उत्तम आहार यांचा समावेश रोजच्या जीवनशैलीत करा आणि त्यातून काही त्रास असेल तर वेळीच त्यावर उपचार करा. त्यामुळे अतिशय चांगले आणि व सुंदर जीवन व्यतीत करण्यास तुम्हाला मदत होईल.