Friday, February 7, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखMahakumbh 2025 : योगींच्या दक्षतेने अमृतस्नान सुरक्षित

Mahakumbh 2025 : योगींच्या दक्षतेने अमृतस्नान सुरक्षित

प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात अग्निकांड झाल्यावर आणि त्यात ३० लोक ठार झाल्यानंतर आता प्रशासन आणि मुख्यतः योगी आदित्यनाथ सरकार अत्यंत सजग झाले आहे. योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीची समीक्षा केल्यावर तेथील देखरेख व्यवस्थेवर नव्याने पाहणी केली. योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनावर संपूर्ण देखरेख ठेवतानाच अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, जेथे श्रद्धा असते तेथेच सनातन धर्म असतो. वसंत पंचमीच्या दिवशी कोट्यवधी भाविक स्नान करण्यासाठी जमणार असून यावेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वसंत पंचमी ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि प्रयागराज येथे तर हा सण अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे हे पर्व साजरे करण्याचा दुर्मीळ योग जुळून आला आहे. उत्तर प्रदेश प्रशासन आणि स्वतः योगी आदित्यनाथ व्यवस्थेवर देखरेख करत आहेत ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. रेल्वेबरोबर समन्वय साधून भाविकांच्या येण्या-जाण्याच्या वेळेला विशेष ट्रेन्सची व्यवस्था तसेच त्यांचे आगमन वगैरे सुनिश्चित केले जावे. वास्तविक जेथे प्रचंड संख्येने भाविक येत असतात तेथे अशा घटना घडतात हे गृहीत धरून तेथे तशी काळजी घ्यावी लागते.

महाकुंभ हा १२ वर्षांनी एकदा येणारा पवित्र स्नानाचा मुहूर्त असल्याने येथे अफाट गर्दी होणार हे गृहीतच आहे. तशी व्यवस्था मोदी आणि योगी सरकारने केली होती यात काही शंकाच नाही. म्हणून तर कोट्यवधी लोक स्नानासाठी जमूनही केवळ ३० लोक मृत्युमुखी पडले. अर्थात एवढेही मृत्यू व्हायला नकोतच. पण लोकांची भक्ती आणि व्यवस्थेची दुर्बलता येथे उघड झाली हे दिसते. १९५४ आणि २०१३ मध्येही अशाच दुर्दैवी घटना घडल्या होत्या आणि त्यात कित्येक लोकांचे जीव गेले होते. त्यांची पुनरावृत्ती टाळण्याचे अनेक उपाय योजले गेले. या घटनांनी गर्दीचे व्यवस्थापन आणि प्रशासकीय बेपर्वाई यांना उघड केले गेले. यामागे भारतातच होणाऱ्या धार्मिक आयोजनांमध्ये अशा चेंगराचेंगरीच्या घटना घडतात. देशात नेहमी यात्रा असोत की कुंभ यांसारखे धार्मिक कार्यक्रम आणि त्यात होणारी लोकांची प्रचंड गर्दी हे समीकरण असतेच. त्यात या गर्दीचे व्यवस्थापन करण्याची यंत्रणा अद्याप तितकीशी सुधारलेली नाही. त्यामुळे अशा घटना नेहमीच घडलेल्या दिसतात. यात सत्ताधारी पक्षांचा काही दोष नसतो. जो त्या वेळी सत्तेत नसतो तो त्यावेळी प्रशासनावर किंवा सरकारवर आरोप करतो. पण गर्दी इतकी अफाट असते की, कुणाचाच दोष काहीही नसतो. भारतीयांची अफवांवर विश्वास ठेवण्याची प्रचंड वृत्ती हीच कारण आहे.

नुकताच जळगावजवळ एक रेल्वे अपघात घडला आणि त्यात समोरून पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यात थांबलेल्या गाडीतून हजारो प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर धडाधड उड्या घेतल्या. त्यात पुष्पक एक्स्प्रेसखाली येऊन १५ प्रवाशांचा मृत्यू झाला. अशाच घटना अफवांवर विश्वास ठेवण्याच्या आपल्या वृत्तीमुळे घडतात. महाकुंभ यात्रेवर प्रचंड पैसा खर्च करण्यात आला आहे. पण सरकार आणि प्रशासन यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीच्या घटना रोखू शकले नाही. जेथे गर्दी असते तेथे अशाच घटना होत असतात असे सांगून प्रशासन आपली जबाबदारी टाळू शकत नाही. मुस्लीम देशांतही हज यात्रेच्या दरम्यान अशाच घटना घडत असतात, पण मोदी आणि योगी सरकारसाठी हे शोभादायक नाही. योगी खासकरून देखरेख करत आहेत आणि त्यांची महाकुंभमधील आगामी कार्यक्रमांवर प्रचंड देखरेख आहे. त्यामुळे एवढे होऊनही तेथे मनुष्यहानी तितकीशी नाही. तरीही झाली ती घटना वाईट आहे आणि भविष्यात तशी घडू नये म्हणून योगी प्रशासन शक्य तितकी काळजी घेत आहे. आता महाकुंभ यात्रेवर एवढा प्रचंड खर्च करण्यात येत असूनही जनमाणसांचे नुकसान झालेच असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. कारण एवढी गर्दी जेथे जमते तेथे अशा दुर्घटना घडतच असतात हे गृहीत धरायला हवे. पुढे अशी घटना घडू नये याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.

प्रयागराजमध्ये इतक्या वर्षांनंतर होणाऱ्या या महाकुंभ पर्वाला दुर्घटनांपासून वाचवू शकले नाही ही खंत आहे. एक तर १० कोटी लोक स्नानासाठी येतात आणि त्यांच्यासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती असे म्हणणे योग्य नाही, पण योगी आदित्यनाथ असोत की, उतर प्रदेश प्रशासन यांची इतक्या प्रचंड संख्येने गर्दीचे व्यवस्थापन करण्याची क्षमता होती की नाही असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. आता योगी सरकार काळजीपूर्वक लक्ष देऊन भविष्यात तरी अशा दुर्घटना घडू नयेत म्हणून प्रचंड लक्ष ठेवून आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. या आधीची जी चेंगराचेंगरी आणि अन्य दुर्घटना झाल्या त्यांचा अभ्यास करून प्रशासनाने परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे असे योगी म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच महाकुंभ क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केले. लोकांचे जीव जाणे हे कुणालाच आवडत नाही आणि त्यातील राजकारणाचा भाग सोडला तर केवळ पीडितांच्या वेदना समजून घेतल्या जातात, त्यामुळे भविष्यात अशा घटना घडूच नयेत म्हणून योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. या महाकुंभसाठी जगभरातील मुत्सद्दी नेत आले आहेत आणि जगासमोर भारताची नाचक्की होऊ नये म्हणून योगी सरकारची अग्निपरीक्षा आहे हे निश्चित आहे. त्यातून ते निश्चितपणे तरून जातील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -