डॉ. सर्वेश – सुहास सोमण
मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजार मात्र अर्थसंकल्पानंतर नकारात्मक अंकांनी बंद झाला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गावर सर्वाधिक भर देण्यात आला. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. अर्थसंकल्पानिमित्त शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशन ठेवले होते. शनिवारी सेन्सेक्स ५.३९ अंकांच्या वाढीसह ७७,५०५.९६ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक २६.२५ अंकांनी घसरून २३,४८२.१५ अंकांवर बंद झाला.
अर्थसंकल्प सादर होत असताना बाजारात घसरण होत होती, त्यानंतर काही काळासाठी शेअर बाजारात पुन्हा चांगली वाढ झाली मात्र शेवटच्या टप्प्यात शेअर बाजारात घसरण होत तो नकारात्मक बंद झाला.
दिवसभरात बाजारात सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. शेवटी निफ्टी लाल चिन्हात बंद झाला, तर सेन्सेक्स सपाट राहिला.
शनिवारी सेन्सेक्समधील ३० पैकी १६ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर उर्वरित १४ कंपन्यांचे समभाग घसरणीसह लाल रंगात बंद झाले. त्याचप्रमाणे निफ्टी ५० मधील ५० पैकी २२ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या चिन्हात बंद झाले. तर उर्वरित २८ कंपन्यांचे समभाग लाल चिन्हात तोट्याने बंद झाले. शनिवारी सेन्सेक्स कंपन्यांमध्ये झोमॅटोचे समभाग सर्वाधिक ७.१७ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर पॉवर ग्रिडचे समभाग सर्वाधिक ३.७१ टक्क्यांच्या घसरणीसह
बंद झाले.
सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या इतर कंपन्यांचे शेअर्स ४.९८ टक्के, आयटीसी हॉटेल्स ४.७१ टक्के, आयटीसी ३.३३ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा २.९६ टक्के, एशियन पेंट्स २.१६ टक्के, टायटन १.८१ टक्के, इंडसइंड बँक १.७६ टक्के, बजाज फायनान्स १.५८ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग १.४५ टक्के, ॲक्सिस बँक १.२४ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.९८ टक्के, नेस्ले इंडिया ०.५० टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.३८ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.२४ टक्के आणि सन फार्मा ०.०५ टक्के वाढीसह बंद झाले.
या शेअर्समध्ये अर्थसंकल्पानंतर घसरण पहावयास मिळाली ज्यामध्ये लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स ३.३६ टक्के, एनटीपीसी २.०४ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट २.०३ टक्के, एचसीएल टेक १.८७ टक्के, टेक महिंद्रा १.६५ टक्के, इन्फोसिस १.५० टक्के, अदानी पोर्ट्स १.४७ टक्के, टाटा मोटर्स १.३८ टक्के, टाटा स्टील १.२६ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया ०.९१ टक्के, टीसीएस ०.८६ टक्के, एचडीएफसी बँक ०.५५ टक्के आणि भारती एअरटेल ०.२६ टक्क्यांनी घसरले.पुढील आठवड्याचा विचार करता निर्देशांकांची गती तेजीची असून जोपर्यंत निफ्टी २३२५०च्या वर
आहे तोपर्यंत ही तेजी कायम राहील.
(सुचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)