पुणे : प्रसिद्ध गायक सोनू निगम अलिकडेच पुण्यात कॉन्सर्ट केला. या कॉन्सर्टच्या आधी सोनूची तब्येत बिघडली. त्याला पायात तीव्र वेदना जाणवू लागल्या. कॉन्सर्ट सुरू होण्याआधी मदतनीसांच्या सहकार्याने सोनूने प्राथमिक उपचार करुन घेतले. थोडा वेळा स्ट्रेचिंग केले. थोडे बरे वाटू लागल्यावर सोनूने कॉन्सर्ट केला. कार्यक्रम सुरू असताना सोनू निगमला वेदना जाणवत होत्या. पण तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकांचा विचार करुन सोनू निगमने कॉन्सर्ट रद्द करायचा नाही, असा निर्णय घेतला. कॉन्सर्ट सुरू असताना प्रेक्षकांना आपल्या वेदनांची जाणीव होणार नाही, याची खबरदारी सोनू निगमने घेतली.
कॉन्सर्ट सुरू होण्याआधी उपचार करुन घेतानाचे आणि स्ट्रेचिंग करतानाचे सोनू निगमचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे व्हिडीओ सोनू निगमने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत.
देवी सरस्वतीने रात्री माझा हात धरला होता असे सांगत सोनूने वेदना होत असूनही कार्यक्रम सादर करणे जमले यासाठी आभार मानले. आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता पण परिस्थिती सावरुन घेण्यात यशस्वी ठरलो. कार्यक्रम चांगला झाला. शो छान झाला याचा मला आनंद आहे. जेव्हा लोकांना तुमच्याकडून अपेक्षा असतात तेव्हा तुम्हाला त्यांना निराश करायला आवडत नाही; असेही सोनू निगमने इन्स्टा पोस्टमध्ये नमूद केले आहे.
पाठीच्या कण्यात सुई घुसल्यासारखे वाटले. थोडं हललो तरी असह्य वेदना होत होत होत्या. सुई एकदम मणक्यात घुसेल असं वाटत होतं; असे सोनूने स्वतःला होणाऱ्या वेदनांविषयी इन्स्टाच्या माध्यमातून माहिती देताना नमूद केले आहे. चाहत्यांनी सोनूचे व्हिडीओ बघून त्याला तब्येत जपण्याचा सल्ला दिला आहे. देवाचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असेल तर कोणत्याही संकटातून पार होता येते, भगवान शंकराचा आशीर्वाद आपल्यावर सदैव आहे आणि राहू दे अशा स्वरुपाची प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली. अनेकांनी सोनू निगमच्या तब्येतीला लवकर आराम पडावा यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.