पुणे : रोल बॉल या खेळाला महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे. परंतु हा खेळ छत्रपती पुरस्कार यादी मध्ये नाही तसेच ५% आरक्षण यादीमध्ये देखील या खेळाचा समावेश नाही, ह्या दोन्ही गोष्टी घडाव्यात या साठी मी प्रयत्न करणार आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.तसेच बाणेर येथील रोल बॉल स्टेडीयमला कवर/शेड करून देण्यासाठी देखील मी प्रयत्न करेन म्हणजे खेळाडूंना उन्हाळ्यात आणि पावसाळा दरम्यान सरावासाठी काही अडचण येणार नाही आणि ते चांगली पदकं जिंकू शकतील, असेही चंद्रकांतदादा म्हणाले.
रोलबॉल ह्या खेळाच्या बावीसाव्या वर्धापनदिना निमित्त चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. यावेळी ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे सर, रोलबॉल असोसिएशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), पुणे जिल्हा अध्यक्ष गजानन थरकुडे, जिल्हा रोल बॉल संघटना उत्कर्ष तरटे- मेजर भारतीय सैन्यदल, जनक टेकाळे माजी क्रीडा सहसंचालक, चैत्राली दहिवाल मुख्य कार्यकारी संचालक,इंफ्राटेक कंपनी यांची प्रमुख उपस्थिती होती व मोठ्या प्रमाणावर खेळाडू व प्रशिक्षक उपस्थित होते.
पुण्यातील तरुण स्केटिंग प्रशिक्षक राजू दाभाडे यांनी ह्या खेळाची निर्मिती केली आणि आज हा खेळ जागतिक स्तरावर पोहोचला आहे याचा अभिमान वाटतो, असे संदीप खर्डेकर म्हणाले. हा खेळ सातासमुद्रापार पोहोचला असून लवकरच याचा समावेश ऑलम्पिक मध्ये होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही संदीप खर्डेकर म्हणाले.