विद्यमान मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातील हस्तक्षेप टाळला
आजवर दोन्ही अर्थसंकल्पात दिसली होती मुख्यमंत्र्यांची छाप
मुंबई : मुंबई महापालिकेच्या मागील दोन अर्थसंकल्पांमध्ये (BMC Budget) तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या महत्वाच्या योजना आणि उपक्रमांचा समावेश करून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पातील आपला हस्तक्षेप टाळला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांनी बनवलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही सूचना न करता आयुक्त म्हणून त्यांनी बनवलेला अर्थसंकल्प मांडण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या तुलनेत विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांनी केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही योजना तथा उपक्रम न रेटता प्रशासकांनाच फ्री हँड दिल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची छाप नसेल असे बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेच्या सन २०२५-२६चा आगामी अर्थसंकल्प येत्या मंगळवारी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर केला जाणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी हे सन २०२५-२६चा अर्थसंकल्प मांडणार असून या अर्थसंकल्पावर आयुक्तांनी शेवटचा हात फिरवण्यास सुरुवात केली आहे.
चालू अर्थसंकल्पात राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्री संपूर्ण स्वच्छता मेहिम, मुंबई सुशोभिकरण प्रकल्प, मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन, मुख्यमंत्री शुन्य प्रिस्क्रिप्शन धोरण, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प, धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना आदी योजनांचा समावेश केला होता, तसेच रस्त्यांच्या सिमेंटीकरणावर भर दिला होता.
शिक्षण, आरोग्याच्या धर्तीवर पर्यावरणासाठी स्वतंत्र विभागाची मागणी
मागील दोन अर्थसंकल्पांमध्ये तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला असला तरी विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांची शनिवारी भेट महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी घेतल्यानंतर अर्थसंकल्प कधी मांडला जाणार याची माहिती घेतली. परंतु यामध्ये कोणत्या कामांसाठी किती निधींचा तरतूद केली किंवा कसे, याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून न घेता आपण जसा बनवला तसा मांडा अशाच सूचना गगराणी यांना केल्याची माहिती मिळत आहे. तसेच स्वत:च्या कोणत्याही योजना तथा उपक्रम यांचा अंतर्भाव केला जावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या नसल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळे शिंदे यांनी यापूर्वीच्या दोन अर्थसंकल्पात सूचना केल्याने मागील दोन्ही अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची छाप पहायला मिळाली होती. परंतु आगामी अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची कोणतीही छाप नसेल तर तो अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तथा प्रशासकांचाच असेल असे बोलले जात आहे.