प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ
भिंतीलाही कान असतात’, असे आपल्याकडे म्हटले जाते. मग आपण जेव्हा एकमेकांशी संवाद साधतो तेव्हा तिथे आसपास असणाऱ्या माणसांनाही ते ऐकू जाते, त्याच्यातून ते काही अर्थ काढतात, हे भान संवादादरम्यान आपल्याला असण्याची आवश्यकता आहे. याबाबतीतली एक गंमत सांगते. -
प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ एखादा आकार जेव्हा साकार होतो तेव्हा निराकार अशा परमेश्वराचे दर्शन होते. ज्याला हे दर्शन होते तो त्याला साक्षात्कार ...
मी आणि माझी मैत्रीण मुंबईपासून दूर असणाऱ्या एका मोठ्या शहरात कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेव्हा दिवसभर आम्ही एका टॅक्सीतून फिरलो. उन्हाळ्याचा दिवस म्हणून मी जास्तीच्या पाण्याच्या बाटल्या घेतलेली एक बॅग, आम्हा दोघांमध्ये जिथे पाय लागणार नाही अशा ठिकाणी गाडीतच खाली टाकून ठेवलेली होती. एका ठिकाणी आम्ही चहासाठी उतरलो तेव्हा मी तिला म्हटले की, या भागात खूप माकडं आहेत, क्षणात झेपावतात आणि पटकन काहीही घेऊन जातात. तुझा चष्मा गेला तर आपण दोन दिवस कसे काढणार आणि चहा पिताना काय तुला चष्मा लागतो काय? ठेव तो चष्मा बॅगेत.
तिने हसून स्वतःचा चष्मा व्यवस्थित चष्म्याच्या बॉक्समध्ये टाकून खाली ठेवलेल्या बॅगेत टाकला. आम्ही उतरलो. असंख्य माकडे जणू काही आमच्याकडेच पाहत होती जणू... तर ती म्हणाली की बरे झाले चष्मा तरी ठेवून आलो.
चहा पिऊन झाल्यावर गाडीत बसलो आणि निघालो. गप्पांच्या नादात तिने काही डोळ्यांवर चष्मा लावला नाही. ज्या ठिकाणी उतरायचे होते तिथे उतरलो. ड्रायव्हरनेच आमचे सामान हॉटेलच्या त्या खोलीपर्यंत नेऊन ठेवले. माझ्या मैत्रिणीने तोंडावर पाणी मारले आणि बाहेर आली, चष्मा शोधू लागली आणि तिच्या लक्षात आले की, तो चष्मा आमच्या पायापाशी ठेवलेल्या बॅगेत ठेवलेला आहे. दिवसभराचा प्रवास होता. आम्ही जितके थकलो आहोत तितकाच आमचा ड्रायव्हरही थकला असेल या समजुतीने आम्ही त्याला फोन केला नाही. विचार केला की सकाळी तो चष्मा घेऊ या.
सकाळी गाडीत चढण्याआधी तिने त्या बॅगेत चष्मा शोधला, तर तो सापडला नाही. मी ड्रायव्हरला म्हटले की, प्लीज तुम्ही पण शोधा ना, याच बॅगेत आम्ही ठेवला होता. तो म्हणाला, “सकाळी उठून मी संपूर्ण गाडी आतून- बाहेरून पुसली आहे. मला कुठेही काही दिसले नाही. पण तो नंबरचा चष्मा होता का?”
आम्ही दोघेही एकदमच उत्तरलो - होय.
परंतु त्याच्या या वाक्याने माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, ‘नंबरचा चष्मा होता का?, असे त्याने विचारले. याचा अर्थ कदाचित त्याला तो गॉगल वाटला असेल! आम्ही परतीच्या प्रवासात होतो. मी मैत्रिणीला म्हटले, काहीही झाले तरी तू उलटसुलट बोलू नकोस, मी काय जे म्हणते त्याला ‘होय’ म्हण. नवीनच चष्मा केलेला होता. त्यात तो महागडा होता त्यामुळे मैत्रीण खूपच अस्वस्थ होती. आम्ही आपापसात बोलायला सुरुवात केली. मी ड्रायव्हरला म्हटले की ही खूप वेंधळी आहे. मी हिला म्हटले की तुझी बॅग पूर्ण सर्व सामान काढून परत एकदा नीट बघ. चष्मा नक्कीच बॅगेच्या तळाशी कुठेतरी असेल. पण ही इतकी आळशी की तिने या मोठ्या बॅगेला हातच लावला नाही. चष्मा कुठे जाणार आहे हो, कोणाला त्याचा काय उपयोग? तो असेलच बॅगेच्या आत कुठेतरी. मग मैत्रीण म्हणाली, “जाऊ दे. आता आपण ट्रेनमध्ये चढलो की मी शोधते. नाहीतर तू सोबत आहेसच. घरी गेल्यावर शोधते.”
त्यानंतर एका ठिकाणी काही कामानिमित्त आम्ही तास-दीड तास उतरणार होतो तसे उतरलो आणि मी मैत्रिणीला खात्री दिली की तिचा चष्मा त्या मोठ्या बॅगेत १०० टक्के कसा जातो बघ.
ती म्हणाली, “अगं आपण दोघींनीही माझी बॅग कमीत कमी पाच वेळा संपूर्ण रिकामी करून भरली. तुला कुठेतरी दिसला का? चष्मा १०० टक्के गाडीत असलेल्या बॅगेतच होता, हे तुला आणि मला दोघींनाही माहीत आहे. मी म्हटले की ठीक आहे पण आता मात्र तो तुला नक्की बॅगेत मिळणार!
दीड तासांनी आम्ही परतलो आणि गाडीत बसून रेल्वे स्टेशनला उतरलो. ट्रेन लागलेलीच होती. आम्ही तासभर आधी पोहोचल्यामुळे ट्रेनमध्ये तुरळक माणसे होती. आम्ही तिच्या बॅगेतले सामान काढायला सुरुवात केली आणि चक्क आम्हाला तो चष्मा त्या बॅगेत सापडला.
तर नेमके झाले काय? ही एक साधी बोलायची पद्धत असते म्हणजे आम्ही त्या ड्रायव्हरवर आरोप केला असता, त्याला काही उलटे-सुलटे बोललो असतो, तर तो चष्मा मिळाला नसता पण जेव्हा त्याला कळले की तो गॉगल नसून चष्मा आहे, ज्याचा त्याला काहीही उपयोग नाही, शिवाय मैत्रिणींने व्यवस्थित बॅग शोधलेली नाही, तेव्हा त्याने तो आमच्या बॅगेत परत ठेवून दिला, याबद्दल आम्ही दोघीही अजिबात साशंक नाही आहोत.
त्या चष्म्याचे कव्हर गॉगलचे कव्हर असते त्या आकाराचे होते. चष्म्याची काच गॉगलसारखी मोठ्या आकाराची होती. त्यामुळे त्याचा गैरसमज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वस्तू मिळाली हे महत्त्वाचे!
म्हणजे त्या ड्रायव्हरला चोर ठरवण्यापेक्षा किंवा अप्रत्यक्ष त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप करण्यापेक्षा मैत्रिणीला वेंधळी, आळशी असे संबोधले, ज्याचा नक्कीच आम्हाला फायदा झाला.
आपण कोणाशी किती नम्रपणे बोलतो किंवा आपसात काय बोलतो, यावरूनही समोरचा माणूस काही अंदाज बांधत असतो, हे आपण संवादादरम्यान सातत्याने लक्षात ठेवण्याची गरज आहे. मग तो माणूस आपल्या रोजच्या संपर्कातील असो वा आयुष्यात कधीतरी काही तासांसाठी भेटणारा असो!
pratibha.saraph@gmail.com