क्राइम – अॅड. रिया करंजकर
घटना या आपल्या आयुष्यात अचानकपणे घडतच असतात. पण याच घटना आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणाऱ्या ठरतात. ही कलाटणी काही लोकांच्या आयुष्यामध्ये चांगलं घडून आणते तर काही लोकांचे आयुष्य बरबादही करते. काही लोकांना आपण जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य याची कल्पना नसते आणि सोबत कायद्याचे ज्ञान नसते.
शिवा चाळीमधील रहिवाशांची घरे समोरासमोर होती. चाळीमधल्या कोणाच्या घरांचे दरवाजा लावलेले नसायचे. त्यामुळे कोणीही, कधीही, केव्हाही, कोणाच्या घरात ये-जा करत असायचा. चाळ म्हटली की असंच वातावरण असतं.
राधेलाल हा आपल्या भावाच्या कुटुंबासह या चाळीमध्ये राहत होता. नोकरी करून आपल्या भावाला मदतही करत होता. चाळीतील लोक राधेलालला चांगला मुलगा म्हणून ओळखत होते. राधेलालला आपलं घर आणि नोकरीशिवाय कोणत्या गोष्टीचा छंद नव्हता.
राधेलालच्या आयुष्यात एक दिवस असं घडलं की, त्याचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. समोरील घरातील छकुली खेळत खेळत राधेलालच्या घरात आली. घरात टीव्ही चालू असल्यामुळे ती बसून बघायला लागली. छकुली चार वर्षांची मुलगी होती. थोड्या वेळापूर्वीच राधेलाल कामावरून घरी आला होता. त्याला आंघोळ करून थोडा आराम करायचा होता. मुलगी टीव्ही बघत असल्यामुळे राधेलालच्या मनात विचार आला की, दरवाजा उघडा ठेवला तर ही मुलगी कुठेतरी जाईल. त्याने दरवाजा आतून बंद करून घेतला. अंघोळ करून आल्यावर लहान मुलीला घरी न पाठवता तो झोपी गेला.
ती मुलगी मात्र टीव्हीवरचे कार्टून बघतच होती. इकडे मुलगी मिळत नाही म्हणून तिच्या घरच्यांची शोधाशोध सुरू झाली होती.
समोर रूम असलेल्या बाईने छकुलीला राधेलालच्या घरी जाताना बघितले होते. त्या बाईने तिच्या पालकांना सांगितले. चाळीतील सर्वांनी येऊन राधेलालचा दरवाजा ठोकावला. राधेलाल झोपेतून गडबडून उठला आणि दरवाजा उघडायला गेला. सर्वजण आत येताच मुलगी त्यांना घरात दिसली. चाळीतील लोकांनी राधेलालचा कोणताही विचार न करता त्याला बेदम मारले. पोलिसांनीही त्याचं काहीच एेकून न घेता त्याला मारायला सुरुवात केली.
शेवटी छकुलीला विचारले असता राधेलालने मला काहीही केले नाही. पण तिचं कुणीही ऐकत नव्हते. त्याच दिवशी नेमके राधेलालचा भाऊ आणि वहिणी बाहेर गेले होते. ज्यावेळी छकुलीची शोधाशोध सुरू झाली त्यावेळीच समोरच्या बाईने तिच्या घरच्यांना सांगायला पाहिजे होते. चाळीतील लोकांनी आणि पोलिसांनी त्याला एवढं मारलं होतं की, नंतर सर्वांनी निर्णय घेतला की राधेलालने मुंबई सोडून गावाला जायचं. राधेलाल शेवटी सर्व सोडून गावी निघून गेला. त्या मुलीची मेडिकल चेकअप केली असता कोणतीही गोष्ट मेडिकल चेकअपमध्ये आढळली नाही. राधेलालची एवढीच चूक होती की त्याने फक्त दरवाजाची कडी आतमधून लावून घेतली. राधेलालने दरवाजाची कडी लावली नसती तर मुलगी बाहेर गेली असती. दरवाजाला आतून लावलेली कडी त्याच्या आयुष्यात मात्र भारी पडली. (सत्यघटनेवर आधारित)