राज्याचे मुख्यमंत्री महापालिकेच्या अर्थसंकल्पात करणार
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मागील दोन अर्थसंकल्पांमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या महत्वाच्या योजना आणि उपक्रमांचा समावेश करून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीकोनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापालिका आयुक्त हे अतिरिक्त आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांसह हे रविवारी अथवा सोमवारी भेट घेण्याची शक्यता आहे. यात त्यांनी मांडलेल्या सूचनांद्वारे योजनांचा समावेश केला जावू शकतो. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या दृष्टीकोनातून कोणत्या योजना राबवण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासकांकडे करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे
मुंबई महापालिकेच्या सन २०२५२६चा आगामी अर्थसंकल्प येत्या मंगळवारी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर केला जाणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी हे सन २०२५ २६चा अर्थसंकल्प मांडणार असून या अर्थसंकल्पावर आयुक्तांनी शेवटचा हात फिरवण्यास सुरुवात केली आहे. चालू अर्थसंकल्पात राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्री संपूर्ण स्वच्छता मेहिम, मुंबई सुशोभिकरण प्रकल्प, मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन, मुख्यमंत्री शुन्य प्रिस्क्रिप्शन धोरण, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प, धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना आदी योजनांचा समावेश केला होता, तसेच रस्त्यांच्या सिमेंटीकरणावर भर दिला होता. परंतु मागील दोन अर्थसंकल्पांमध्ये तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत आपल्या योजना सुचनेद्वारे समाविष्ठ करत मुंबईकरांसाठी राबवण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तुलनेत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिकेतील हस्तक्षेप कमी मानला जात आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्पावर शेवटचा हात मारतानाच विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या सूचना प्रशासनाकडून जाणून घेतल्या जाणार आहे. यासाठी रविवार किंवा सोमवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना अर्थसंकल्पाची माहिती तसेच त्याच्या योजना तथा उपक्रमांबाबतच्या सूचनांचा अंतर्भाव केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा तथा महायुतीसाठी पुरक कोणत्या योजना राबवण्यासाठी सूचना करता याकडे सर्वांचे लक्ष आहे.