सहज तुला गुपित एक सांगते दुपारी
डोळियांत आली गडे प्रीत माझी लाजरी
बैसते ओटीवरी, नजर वळे अंगणी
अंगणात बहरते रानजाई देखणी
जाई खाली उभा असे हासरा शिकारी
सांजवेळी गोठ्यांतली गाय लागे हंबरू
सोडते गं धारेसाठी, ओढ घेई वासरू
गोठ्यामध्ये दिसे सखे, सावळा मुरारी
पहाटेला ओठावरी गीत एक जागले
अंतरात कोणसे, हळूच बाई बोलले
ओढाळले मन नेई माझिया सासरी
गीत : अशोक जी. परांजपे
स्वर : सुमन कल्याणपूर
लाजून हासणे अन्…
लाजून हासणे अन्
हासून हे पहाणे
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे
डोळ्यांस पापण्यांचा
का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन्
का चंद्रही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती
जिथे शहाणे
मी ओळखून आहे सारे
तुझे बहाणे
हाती धनुष्य ज्याच्या त्याला
कसे कळावे?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे!
तिरपा कटाक्ष भोळा,
आम्ही इथे दिवाणे
मी ओळखून आहे सारे
तुझे बहाणे
जाता समोरुनी तू उगवे
टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी
सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे सुचते
सुरेल गाणे
मी ओळखून आहे
सारे तुझे बहाणे
लाजून हासणे अन्
हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे
तुझे बहाणे