दी लेडी बॉस – अर्चना सोंडे
तिने आपल्या रसिक प्रेक्षकांना एक पुस्तक वाचण्याचं आवाहन केलं आणि काही दिवसांत त्या पुस्तकाच्या ७,५०,००० प्रती विकल्या गेल्या. २००७ मध्ये तिने पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेल्या उमेदवाराकरिता मते मागितली आणि त्या उमेदवाराला तब्बल १६ लाख मते मिळाली. जगातील शक्तिशाली देशाच्या राष्ट्राध्यक्षांना निवडून आणणारी ती शक्तिशाली महिला म्हणजे ओप्रा विन्फ्रे आणि ते राष्ट्राध्यक्ष म्हणजेच बराक ओबामा.
ओप्रा विन्फ्रेचा जन्म २९ जानेवारी १९५४ रोजी मिसिसिपी येथे एका बाजूला अविवाहित किशोरवयीन आईच्या पोटी झाला. ओप्राचे वडील तिच्या जन्मानंतर लगेचच तिच्या आईला सोडून गेले. त्यावेळी तिची आई १८ वर्षांची होती. बेरोजगार त्यात अल्पवयीन माता झालेल्या तिला माहीत होते की, नोकरीशिवाय ती लहान बाळ ओप्राची काळजी घेऊ शकत नाही. म्हणून, ती ओप्राला आपल्या आईकडे ठेवून नोकरी शोधण्यासाठी मिलवॉकीला गेली. ओप्रा तिच्या आयुष्याची पहिली सहा वर्षे तिच्या आजीसोबत राहिली, जिथे तिने अत्यंत टोकाची गरिबी अनुभवली. ते इतके गरीब होते की, ओप्राला बटाट्याच्या पोत्यांपासून बनवलेले कपडे घालावे लागले.
गरीब कुटुंबात जन्माला आली असली तरी ओप्रा ही हुशार मुलगी होती. आजीने ओप्राला फक्त अडीच वर्षांची असताना वाचायला शिकवले. लवकरच, ओप्राला वाचनाची इच्छा निर्माण झाली. अवघ्या तीन वर्षांची झाल्यावर ती चर्चसाठी बायबलमधील वचने वाचू लागली. चर्चमध्ये येणारे लोक तिला ‘प्रचारक’ म्हणू लागले. चर्चमध्ये वाचन केल्यामुळे तिचे वक्तृत्व कौशल्य सुधारले. तिला एकदा भाषणासाठी ५०० डॉलर्स मिळाले. आपल्या कौशल्याची तिला ताकद समजली आणि तिने ठरवले की, तिला बोलण्यासाठी पैसे हवे आहेत.
ओप्रा आईसोबत राहत होती. मात्र तिच्या आईकडे मुलांची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. म्हणून, तिने ओप्राच्या चुलत भावाला त्यांची काळजी घेण्यास सांगितले. ओप्राचा चुलत भाऊ, जो १९ वर्षांचा होता. बाळांची काळजी घेण्यासाठी आणि संरक्षण देण्यासाठी तो आला होता. त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याने ओप्राला आईस्क्रीम दिले आणि गुप्त ठेवण्यास सांगितले. त्यावेळी ओप्रा फक्त नऊ वर्षांची होती.
ओप्रासाठी, लैंगिक शोषण तिथेच संपले नाही. त्यानंतरच्या काळात, एका कौटुंबिक मित्राने आणि तिच्या काकांनीही तिच्यावर बलात्कार केला. तरीही, ती तिच्या आईला तिच्या लैंगिक शोषणाबद्दल सांगू शकली नाही. कारण त्यांचे पालक-मुलाचे इतके चांगले संबंध नव्हते. हे सर्व सहन करण्यापलीकडे गेल्याने ओप्रा घरातून पळून गेली. तेव्हा ती १३ वर्षांची होती.
या काळात, ओप्रा एका शाळेत शिकत होती. त्या शाळेत श्रीमंतांची मुले शिकत. ती मुले खूप पैसे खर्च करत. आपल्या मैत्रिणींसोबत आपल्याला राहता यावे म्हणून त्यांना प्रभावित करण्यासाठी, ओप्राने तिच्या आईकडून पैसे चोरायला सुरुवात केली. खरंतर आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल आईशी बोलू न शकल्याने बंडखोरी करण्याचा तो एक मार्ग होता. तिच्या आईला तिच्या चोरीविषयी समजले. तिने ओप्राला तिच्या वडिलांकडे पाठवले. दरम्यान झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे ती गर्भवती राहिली. तिचा मुलगा अकाली जन्मला आणि लगेच मरण देखील पावला.
ओप्राचे वडील खूप कडक होते. त्यांनी ओप्राला दुर्दैवी घटना विसरून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत केली. त्यांनी ओप्राला मार्गदर्शन केले. आधार दिला. पुस्तके दिली जेणेकरून ती सुधारू शकेल. ते तिला जेवणापूर्वी दररोज पाच नवीन शब्द शिकायला लावत असे. दर आठवड्याला पुस्तकांचे वाचन करून घेत असत. म्हणून, ओप्रा खूप हुशार झाली. परिणामी, ती तिच्या शाळेत अव्वल विद्यार्थी बनली आणि उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्यासाठी प्रसिद्ध झाली. ती बोलण्यात इतकी कुशल झाली की, तिने भाषण स्पर्धा जिंकून टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी पूर्ण शिष्यवृत्ती मिळवली.
जेव्हा ती १६ वर्षांची होती, तेव्हा ओप्राने नॅशव्हिलच्या स्थानिक रेडिओ स्टेशनने आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. प्रचंड स्पर्धा असूनही, ओप्राने ही स्पर्धा जिंकली आणि तिला मिस फायर प्रिव्हेन्शनचा किताब देण्यात आला. जेव्हा ती बक्षीस घेण्यासाठी स्थानिक रेडिओ स्टेशनवर गेली तेव्हा रेडिओ स्टेशनवर काम करणाऱ्या लोकांनी तिला विचारले की, तिला रेडिओवर तिचा आवाज ऐकायला आवडेल का? उत्साहित होऊन, ओप्राने होकार दिला आणि एक पटकथा वाचली. तिचे वाचन ऐकून रेडिओ स्टेशनवरील सर्वजण प्रभावित झाले. म्हणून त्यांनी तिला न्यूज अँकर म्हणून नोकरी देऊ केली. ओप्राने नोकरी स्वीकारली आणि ती हायस्कूलमध्ये असतानाच नॅशव्हिल रेडिओ स्टेशनवर अर्धवेळ काम करू लागली.
दोन वर्षांनंतर, तिला मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे, ओप्राने टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये स्पीच कम्युनिकेशन्स आणि परफॉर्मिंग आर्ट्समध्ये पदवीचा अभ्यास सुरू केला. तिच्या पहिल्या वर्षात, ओप्राने मिस ब्लॅक नॅशव्हिल आणि मिस टेनेसी या दोन सौंदर्य स्पर्धा जिंकल्या. त्यावेळी ओप्रा १८ वर्षांची होती. या सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर, तिला नॅशव्हिल कोलंबिया ब्रॉडकास्टिंग सिस्टम (ज्याला थोडक्यात सीबीएस असेही म्हणतात) नावाच्या टीव्ही स्टेशनकडून नोकरीचा प्रस्ताव आला. अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, तिने नोकरीची ऑफर दोनदा नाकारली. तिच्या शिक्षकांना हे कळले. लोकं कॉलेजमध्ये जाण्याचे मुख्य कारण म्हणजे अशा नोकऱ्या मिळवणे असते हे त्यांनी तिला समजावले. त्यांच्या सल्ल्याने तिचे डोळे उघडले. जेव्हा सीबीएसने तिला तिसऱ्यांदा फोन केला तेव्हा तिने नोकरी स्वीकारली. अशाप्रकारे, ती १९ वर्षांची असताना, ती सीबीएस संध्याकाळच्या बातम्यांची पहिली आफ्रिकन अमेरिकन महिला सह-अँकर बनली.
तीन वर्षांनंतर, ती सिक्स ०’ क्लॉक न्यूजचे सह-अँकरिंग करण्यासाठी बाल्टिमोरला गेली. त्यावेळी ती २२ वर्षांची होती आणि तिला २२,००० डॉलर्स पगार मिळत होता. ओप्रा ही लोकांबद्दल मनापासून सहानुभूती दाखवणारी व्यक्ती होती. पण एक वार्ताहर म्हणून तिला अनेकदा तिच्या भावना न दाखवता आगीच्या अपघातांसारख्या दुःखद घटनांचे वृत्तांकन करावे लागत असे. अनेकदा असे वाटायचे की, हे तिच्यासाठी योग्य काम नाही, कारण ती तिच्या भावना प्रदर्शित करू शकत नव्हती.
एकदा, ती अंत्यसंस्काराचे वृत्तांकन करत होती. तिला मृत मुलाच्या कुटुंबाला या विषयावर भाष्य करण्यास सांगावे लागले. पण ती स्वतःला असे करण्यास भाग पाडू शकली नाही, कारण तिला कुटुंबाला किती वेदना होत आहेत हे समजत होते. तथापि, जेव्हा या घटना तिच्या बॉसच्या लक्षात आल्या तेव्हा त्याला समजले की, ओप्रा बातमीदार म्हणून काम करण्यास अयोग्य आहे. कारण ती तिच्या बातम्यांमध्ये खूप भावनिकपणे गुंतलेली असते. त्यामुळे तो तिला काढून टाकू इच्छित होता. पण ओप्रा एका वर्षासाठी नोकरीच्या करारावर होती. त्याने तिला करार संपण्यापूर्वी काढून टाकले तर कंपनीला तिला पूर्ण पगार द्यावा लागला असता. त्यामुळे तिला काढता येत नव्हते. म्हणून, त्याने तिला ‘पीपल आर टॉकिंग’ नावाच्या एका नवीन टॉक शोमध्ये सह-अँकर म्हणून कामावर ठेवले.
सात वर्षे टॉक शोमध्ये काम केल्यानंतर, ओप्राला अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनी नावाच्या दुसऱ्या टीव्ही ब्रॉडकास्टिंग कंपनीने तिच्या मॉर्निंग टॉक शोचे रेटिंग सुधारण्यासाठी नियुक्त केले. तो शो बहुतेक पारंपरिक महिलांच्या समस्यांवर केंद्रित होता. परिणामी, टॉक शोला ओप्रा विन्फ्रे शो असे नाव देण्यात आले. हा शो १९८६ ते २०११ पर्यंत २५ वर्षे प्रसारित झाला आणि काही वाद वगळता तो प्रचंड यशस्वी झाला. २००४ ते २००६ पर्यंत ती जगातील एकमेव कृष्णवर्णीय अब्जाधीश आणि अमेरिकेतील सर्वाधिक कमाई करणारी टेलिव्हिजन कलाकार होती. २०१४ मध्ये तिची एकूण संपत्ती २.९ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होती आणि तेव्हापासून ती वाढतच आहे. सीएनएन आणि टाइम मासिकाने तिला “जगातील सर्वात शक्तिशाली महिला” आणि २० व्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून संबोधले. २००५ मध्ये तिला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महान महिला म्हणूनही निवडण्यात आले.
ओप्रा ही अमेरिकेतील सर्वात मोठ्या परोपकारी व्यक्तींपैकी एक आहे. तिने आजपर्यंत शैक्षणिक कार्यांसाठी ४०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त देणगी दिली आहे आणि राष्ट्रीय आफ्रिकन अमेरिकन इतिहास आणि संस्कृती संग्रहालयाला सुमारे १२ दशलक्ष डॉलर्स दान केले आहेत. ती तिच्या कर्मचाऱ्यांशी खूप चांगले वागते. २००६ मध्ये, ती तिच्या कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय अशा हजार लोकांना हवाईला सुट्टीसाठी घेऊन गेली होती. २०१३ मध्ये राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी तिला “प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम” हा सर्वोच्च सन्मान बहाल केला. लेडी बॉस ही बिरुदावली ओप्रा विन्फ्रे खऱ्या अर्थाने
जगत आहे.