मायभाषा – डॉ. वीणा सानेकर
भाषा हा समाज आणि संस्कृतीच्या प्रगतीचा आधार आहे. कोणत्याही भाषेत निर्माण होणारे ज्ञान त्या-त्या समाजाचे संचित पुढील पिढीकडे सोपवत असते. जगात वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात असणे हे सांस्कृतिक विविधतेचे द्योतक आहे आणि या दृष्टीने भारत हा अतिशय समृद्ध देश आहे. भारतीय भाषांच्या इतिहासाचे पुनरावलोकन, सद्यस्थिती, भविष्यातील आव्हाने आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी भाषिक नियोजन याची आज नितांत गरज आहे. या पार्श्वभूमीवर सोमैया विद्याविहार विद्यापीठाने ज्ञानभाषा विमर्श ही परिषद आयोजित केली होती. परिषदेतील पहिल्या सत्राचे शीर्षक ‘अभिजात का?’ असे होते, प्रातिनिधिक स्वरूपात अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी, कन्नड, तेलुगू, उडिया या भाषांतील साहित्यिक व अभ्यासकांना या सत्रात आमंत्रित करण्यात आले होते.
मराठी – रंगनाथ पठारे (नामवंत लेखक)
उडिया – डॉ. प्रितीश आचार्य (प्रोफेसर, रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, अजमेर)
कन्नड – डॉ. राजेंद्र छेन्नी, संचालक, ‘मनसा सेंटर फॉर कल्चरल स्टडीज.’
तेलुगू – डॉ. चिनाविरा भद्रूदू (माजी प्रशासकीय अधिकारी आणि लेखक, अनुवादक)
हे विविध राज्यातील साहित्यिक एका मंचावर पाहणे त्यांना ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. वक्त्यांच्या मनोगतानंतर डॉ. करुणा जाधव यांनी ‘पाली’ भाषेबद्दलचे विचार मांडले. खरंतर जवळपास ११ भाषांना अभिजात भाषांचा दर्जा प्राप्त झाला आहे. ही चर्चा प्रातिनिधिक स्वरूपाची होती पण एकूणच भाषांसमोर असलेले प्रश्न नि आव्हाने यानिमित्ताने समोर आले. आज सर्वच भाषांसमोर शिक्षणाचे माध्यम, उच्च शिक्षण, रोजगाराची भाषा या सर्वांबाबतचे प्रश्न उभे आहेत. आपली भाषा ही नुसती घरात बोलण्याची असू नये. तर ती तंत्रज्ञानाची, संगणकाची, रोजगाराची, उच्च शिक्षणाची भाषा व्हावी या अंगाने या परिषदेत विस्ताराने चर्चा झाली.
परिषदेतील दुसऱ्या सत्राचे शीर्षक ‘ज्ञानसेतू-अनुवादातून ज्ञान संक्रमण’ असे आहे. सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या ‘सोमैया स्कूल ऑफ सिव्हिलायजेशन स्टडीज’ने हाती घेतलेल्या ज्ञानग्रंथांच्या अनुवाद अभियानात सहभागी अनुवादकांची सादरीकरणे आणि चर्चा या सत्रामध्ये झाली.
गेल्या दोन शतकात इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन अशा विविध भाषांमध्ये आधुनिक शस्त्रे, मानव्यविद्या आणि समाजशास्त्र शाखेशी निगडित विद्वान अभ्यासकांनी अनेक मूलगामी विषयांवर अत्यंत सखोल चिंतन केले. मात्र सदर भाषांमधील अनेक महत्त्वाचे ज्ञानग्रंथ मराठी भाषेत अनुवादित न झाल्यामुळे मराठी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी व एक खूप मोठा वाचक वर्ग त्यातील ज्ञानापासून वंचित राहिला होता. ही पोकळी भरून काढण्यासाठी ज्ञानसेतू हे अभियान हाती घेण्यात आले.
राज्यभरातले विविध अनुवादक यासाठी एकत्र येत आहेत. तसेच सोमैया विद्याविहार विद्यापीठाने या अभियानाकरिता आपले बहुमूल्य योगदान देऊन राजभाषा मराठीसाठी जबाबदारी घेणे ही खूप मोलाची गोष्ट आहे.
परिषदेतील दुसऱ्या सत्रात विविध ज्ञानग्रंथांवर अनुवादकांनी आपली मांडणी केली. या सर्व अनुवादकांना जगातील विविध मूलभूत ज्ञानग्रंथ मराठीत अनुवादित यावे ही आस्था वाटते आहे आणि त्यातूनच हे सर्व या अभियानाशी जोडले गेले आहेत. दुसऱ्या सत्रात प्रकाशक अभिषेक जाखडे आणि अनुवादक, लेखक गणेश विसपुते सहभागी झाले. त्यांची मार्मिक निरीक्षणे लक्षवेधी होती.
सोमैया विद्यापीठाच्या ज्ञानसेतू शृंखलेतील हे अनुवाद प्रकाशित करण्याकरिता पद्मगंधा प्रकाशनाचे अभ्यासू प्रकाशक अभिषेक जाखडे पुढे आले आहेत. अशाप्रकारे मराठी ज्ञानभाषा म्हणून सक्षम करण्याकरिता पद्मगंधाचे योगदान मौलिक आहे. अनेक अंगानी ज्ञानसेतूचे पैलू उलगडता येतील. ज्ञानसेतू सोबत भाषाविमर्श हा बहुभाषिक संवाद आज जोडला गेला.
भाषाविषयक आस्था असणारे विविध क्षेत्रांतील भाषाप्रेमी, अनुवादक, प्राध्यापक, भाषाविषयक काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित राहिले. ‘ज्ञानभाषा विमर्श’ हे भारतीय भाषांच्या सक्षमीकरणाच्या वाटचालीतील एक आश्वासक पाऊल ठरेल.