विशेष – लता गुठे
शाळेमध्ये वेशभूषा स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा मुलं-मुली विविध प्रकारचे कपडे परिधान करतात. ते कपडे म्हणजे वेगवेगळ्या प्रांताच्या पोशाख संस्कृतीची ओळख असते. कारण त्या पोशाखपद्धतीचे एक विशिष्ट स्वरूप, वैशिष्ट्य असते. ही विशिष्ट पद्धती म्हणजे एकूण पेहेराव पद्धत असते. तिला हेतुपूर्वक दिलेला आकार असतो. या विशिष्ट वैशिष्ट्यांमध्ये शिरोभूषणे, कंठभूषणे, कटिभूषणे, कर्णभूषणे, तसेच पायातील, हातातील अलंकार, पादत्राणे, केशभूषा व विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने यांचा अवलंब केला जातो आणि त्या पेहरावला एक वेगळा आयाम प्राप्त होतो. समाजातील विविध वर्ग आणि त्या वर्गानुसार केलेली वेशभूषा ही त्या त्या वर्गाची ओळख असते. उदाहरणार्थ राजघराण्यातील लोकं वेगळा पेहराव करतात तर सर्वसामान्य तिसऱ्या, चौथ्या वर्गातील लोक वेगळ्या प्रकारचे कपडे घालतात. ही त्या त्या वर्गाची ओळख असते.
शाळेतल्या मुलांचा गणवेश वेगळा, लष्करी पोशाख वेगळा, धर्मगुरूंचा पोशाख वेगळा, तर कीर्तनकार, प्रवचनकार यांचेही पोशाख वेगळे असतात. ही ओळख त्यांच्या कार्याची जवळीक निर्माण करणारी असते. तसेच पोलिसांचा, वकिलांचा पोशाखही ठरलेला असतो. वकीलवर्गासारख्या व्यावसायिकांचे विशिष्ट कपडे, आद्यौगिक कामगारांचे तसेच कचेऱ्यांतील शिपाईवर्गाचे गणवेश, विविध खेळांतील खेळांडूची खास पोशाख पद्धती, रंगभूमीवरील पात्रांची वेशभूषा वेगळी प्रत्येक राष्ट्राने निश्चित केलेला राष्ट्रीय पोशाख, विद्यापीठातील पदवीदानप्रसंगी कुलगुरू आणि स्नातक यांनी वापरावयाचा विशिष्ट पोशाख यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण पोशाख-प्रकारांचा अंतर्भाव होतो. हे गटवार पोशाख-प्रकार प्राचीन व अर्वाचीन अशा दोन्ही काळात आढळून येतात. पण आधुनिक काळात कमी झालेला आहे व पोशाख-प्रकारांत एकसारखेपणा येऊ
लागलेला आहे.
तरीही भारतातच नव्हे तर परदेशातही जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्या लक्षात येते की, तिथल्या वातावरणानुसार पोशाख परिधान करता करता ते आपल्या संस्कृतीची ओळख होते. उष्ण प्रदेशात कमीत कमी कपडे वापरतात. थंडीच्या प्रदेशात अंग भरून कपडे घातले जातात. भारतामध्ये अनेक संस्कृतीच्या जाती-धर्माचे लोक राहतात. त्यानुसार भारतीय वेशभूषा म्हणजे भारतातील पारंपरिक वेशभूषा ही सांस्कृतिक, धार्मिक किंवा राष्ट्रीय आपली ओळख आहे.
भारतीय वेशभूषेत वेगवेगळ्या प्रांतातील भरतकाम, प्रिंट्स, हँडवर्क, अलंकार आणि कपडे घालण्याच्या शैलींचा समावेश होतो. तसेच आपले सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लग्नसमारंभ असेल तर त्या त्या जमातीतील, प्रदेशातील लोक पारंपरिक कपडे घालतात. त्याबरोबरच काही विधींसाठी कपड्याचे रंगही ठरावीकच असतात. भारत देशावर अनेक संस्कृतीचा समावेश झाल्यामुळे भारतीय वेशभूषेत पारंपरिक कपडे आणि पाश्चात्त्य शैली यांचे मिश्रण झालेले दिसून येते. आर्य, द्रविड, मुस्लीम, इंग्रज यांनी अनेक वर्षे राज्य केल्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये त्यांच्याही वेशभूषेची सरमिसळ झाली; परंतु भारतीय महिलांनी परिधान केलेला लोकप्रिय पोशाख म्हणजे साडी हा चालत आलेला भारतीय पोशाख सर्व प्रांतांमध्ये पाहायला मिळतो; परंतु घालण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. काही डावीकडे पदर घेतात, तर काही उजवीकडून, काहींचा पदर मागे सकाळी पुढे असतो. बंगाली साडी वेगळ्या पद्धतीने घालतात तर महाराष्ट्राची नऊवारी साडी घालण्याची पद्धत वेगळी. साडीचा इतिहास पाहिल्यास साडीचं आगमन पाच हजार वर्षांपूर्वी झालं असं मानलं जातं. काळाबरोबर वेशभूषेचे वेगवेगळे प्रकार उदयाला आले. जोपर्यंत स्त्रिया घराच्या आत होत्या तोपर्यंत दिवसभर साडी परिधान करत असत; परंतु कामाच्या निमित्ताने स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या आणि त्यांच्या सोयीने कपड्यांचे प्रकार बदलत गेले. काॅर्पोरेट क्षेत्रांमध्ये पॅन्ट-शर्ट, वेळप्रसंगी सलवार कुर्ता दुपट्टा, काही प्रोग्राम असेल तर साडी अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे स्त्रिया घालू लागल्या. त्याचबरोबर शेतात काम करताना सोयीनुसार कमीत कमी कपडे घालून काम करणे सोपे जाई असा पोशाख साधारण पाहायला मिळतो. उदाहरणार्थ कोकणामध्ये स्त्रिया साडी कमरेभोवती जास्त गुंडाळून घेतात. त्यांचा पदरही कमरेला खोचलेला असतो. पुरुष लुंगी आणि टी-शर्ट घालतात. तसेच काश्मिरी भागांमध्ये थंडी जास्त असल्यामुळे अंगाभोवती शाल लपेटलेली असते. दक्षिणेकडे ऊन जास्त असल्यामुळे पांढरे सुती सैल कपडे वापरले जातात, त्यामध्ये पुरुष सफेद रंगाची लुंगी आणि त्यावर पांढरा शर्ट घालतात, तर स्त्रिया पांढऱ्या साड्या नेसतात. पंजाबमध्ये स्त्रिया पंजाबी ड्रेस घालतात तर पुरुष पगडी, लुंगी, कुर्ता परिधान करतात. महाराष्ट्रामध्ये पूर्वी शेतात उन्हात काम करायला लागायचे त्यामुळे शेतकरी डोक्यावर मुंडासे किंवा फेटा बांधायचे धोतर आणि त्यावर पांढरा शर्ट घालायचे, तर काही स्त्रिया नऊवारी साडीचोळी घालायच्या. हे कपडे आवरायला फारसे लागत नसल्यामुळे काम करणे सोयीचे व्हायचे.
आता आपल्याकडे प्रसंगानुसार कपडे घातले जातात. यामध्ये भारतीय वेशभूषेतील काही पोशाखांची नावे – धोती, कुर्ता, शेरवानी, दुपट्टा, सलवार, लेहंगा, पॅण्ट शर्ट, जॅकेट, कोट लग्नामध्ये घागरा, साडी अशाप्रकारे कपडे वापरतात. कपड्यावरील वेगवेगळ्या प्रकारचे विणकाम वेगळेच आकर्षक निर्माण करते. जरी बॉर्डरच्या साड्या किंवा रेशीमवर केलेल्या साड्या औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारच्या असतात. अशाप्रकारे पोशाखामध्ये विविधता जाणवते आणि ही विविधता म्हणजे त्या त्या संस्कृतीची ओळख असते म्हणूनच पोशाखला अनन्यसाधारण महत्त्व आहे.