Saturday, February 8, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनहमने सनम को खत लिखा..

हमने सनम को खत लिखा..

माेरपीस – पूजा काळे

पत्र लिहिण्यास कारण की…

अंतकरणातल्या नर्मभावना, काळ्या अक्षरातून प्रतिबिंबित झाल्या की, पत्रास अमूक एका कारणाची गरज उरत नाही. समजून घेण्याचा भाव पुलकित झाला की, पलीकडच्या काठावर संथपणे पोहोचतात भावना. अंतर्मनात साठलेल्या गोष्टींचा निचरा करणं कठीण होत असेल तर, ते लिहून मोकळं होण्याचा प्रपंच साधावा. मनात उत्तम प्रतिमा सोबत असल्या की, चांगल्या-वाईट क्षणी प्रयत्नांना व्यक्त होण्याचं साधन मिळतं, ज्याने समाधान लाभतं. आताच्या आधुनिक जमान्यात उसळणाऱ्या गोष्टींनी संवादासारख्या वार्तालापाला केव्हाच मागे टाकलंय. माझ्या एका ललित लेखात संवाद विषयावर मी बोलून जाते. “संवाद करावा मोकळा आवर्जून भेट घडता, रुखरुख लावून जाती व्यक्ती नजरेआड होता.” व्यक्ती नजरेआड होण्याआधी नजरबंद कैदेत तिला जखडून ठेवायला हवं. संवादाची माध्यम वेगळी असली तरी पत्र, प्रत्यक्ष भेट, संगीत याद्वारे होणारा संवाद व्यक्तिमत्त्वाला पोषक ठरतो. प्रेम वृद्धिंगत करणारा सहसंवाद जीवनाचं सार सांगतो. थोडक्यात प्रेमासाठी, प्रेमाने केलेला संवाद आयुष्याला बरंच काही देऊन जातो. यासाठी वेगळ्या हातखंड्याची गरज नसते. आपापल्या परीने संवादावर संस्कार होणं तेवढं गरजेचं आहे. मनामध्ये फक्त “दिल ए जान” आणली की एक कोरं पान सुद्धा भरून जातं. अशी बरीच कोरी पानं माझ्याकडच्या अडगळीत पडलीत. “पीपल का ये पत्ता नही, कागज का ये तुकडा नही. इस दिल के ये अरमान हैं, इसमें हमारी जान हैं! हे राजसा या पानावरील शब्द न् शब्द केवळ तुझ्यासाठी आहे. मी आले तुझ्याचंसाठी, मी मुरले तुझ्याचंसाठी. मी उरले तुझ्याचंसाठी, हे सारे तुझ्याचंसाठी. तुझ्यासोबत जोडलेला अनुबंध जगू देणार नाही मला. सख्या तुझ्यावर अविश्वास नसला तरी, या समस्त भवसागरात तू विसरशील मला याची जास्त चिंता सतावते.

विसरशील खास मला दृष्टी आड होता, वचने ही गोड-गोड देशी जरी आता… खरं आहे ना.! हे शामसुंदरा, मदन मोहना माघारी येण्याचं वचन देऊनही, तू मागे परतला नाहीस. भक्तांच्या रांगेत उभं राहूनही तुझी कृपादृष्टी मिळवण्याचं भाग्य माझ्या ललाटी नसावंॽ की माझं मनोबल वाढवण्यासाठी अपार शक्ती देत आहेस. राधेच्या कलात्मक गुणांनी मोहीत होतोस. गोपिकांसवे रममाण होताना, मिरेला पाठवतोस एकतारीचा संदेश. पण मला दूर ठेवण्याचा काय बरं इरादा असावा तुझा? या संदेशवाहक वाऱ्याला तुझ्याकडे धाडावं तर, डोंगरदऱ्यातं खुळ्यागतं वागून माझ्या पत्रालाचं वाऱ्यावर सोडेल की काय अशी भीती वाटते. हे कृष्णा बघ, मी विसरत चाललेयं सारं देहभान. देह इथचं आहे, पण भान हरपरल्यागत मन धावतयं तुझ्याकडे. सहस्त्र दिशांना असलेला तुझा वावर, पण या गूढ आवर्तनात कुठे शोध घ्यावा तुझा? बासरीची धून ऐकताचं मंतरल्यागत गाठते ते ठिकाण. कवी रोहित जगदाळे यांच्या भावगर्भित रचनेत तुला शोधायचा प्रयत्न करते. कवी म्हणतो, मनाच्या गाभाऱ्यातून साद घालते आहे. दाटलेल्या भावनांना वाट दावते आहे. तुझ्या आठवणीत आयुष्य सरावे माझे, सखया मनाच्या गाभाऱ्यास आवर घालते आहे. ओढ तुझी मज प्रेमालाप व्हावा. मनाच्या गाभाऱ्यात फक्त तूच असावा. दुःख दाटून आले मनात कधी, सुखद अनुभूती स्वरूपा तूच उरावा. आयुष्याला सुखद क्षणांचा आधार, मनगाभाऱ्यात तुज करते साकार. मनाच्या गाभाऱ्यातून साथ घालते आहे, दाटलेल्या भावनांना वाट दावते आहे. मलाही जपायची आहेत आपल्या नात्यामधील गुलाबपुष्प. तुला शोधण्याच्या प्रयत्नातला आजचा हा पत्ररूपी संवाद भारी वाटतोय.

मन माझे भगवंता तुझ्या चरणी लीन आता. किती जपलं जपलं लाख सोसली वेदना, धाव पाव माझ्या कृष्णा मन गुंतले जाण नां. आपल्यातला धागा सुटतोय, की काय? या संभ्रमावस्थेत जीव होतो बावरा. प्रीत केली तुझ्यावरी मनमंदिरा जपूनी, तू मात्र गेलास दूर दूर निघूनी. हृदयस्थ कोरलेल्या तुझ्या नावासहित भावगर्भित ओळींच्या सदृश लाटा उफाळत वर येतात. आसवांनी पूर ओसंडून वाहत नसला तरी, पापण्यांच्या काठावर रेंगाळलेल्या आठवणी दाटतात. तुझ्या शुभ्र, संगमरवरी मूर्तीवर नजर पडताचं कोलाहल माजतो उरी. स्थितप्रज्ञ अवस्थेतल्या चिऱ्यातून प्राणऊर्जा घेताना आपल्या भेटीचे मनसुबे आखते मी. आपल्या भेटीसमयी आनंदाला उधाण येईल. गगन चुंबण्यास सागर सरसावेल. घड्याळाचे काटे वेगाने सरकतील. त्यावेळी मी करेन साज शृंगार. तुझ्या वाटेवरचे क्षण न् क्षण मोजत बसेन. कापरासारखी वेळ उडून जाऊ लागली, तर तिचे खोपे बंद करेन. शब्दरूपी पत्र तुला मिळाल्याचा उत्सव साजरा करेन मी. आपल्या साखरभेटीची आस लावून बसलेल्या माझ्या मनातला भाव तुला कळतोय का? शब्दांनीच शिकवलंय मला पडता पडता सावरायला आणि शब्दांनीचं शिकवलंय रडता रडता हसायला. मी हृदयात जपलायं गोड आठवणींचा ठेवा. पापण्यांच्या आत लपण्याचा हट्ट पाहता फार अडवता नाही यायचं भरल्या डोळ्यांना. मोर पिसाऱ्यासारख्या फुलत येणाऱ्या आठवणी, अंधाऱ्या रातीला तुडवत जातील. मोरपिसाच्या प्रत्येक रंगाशी जुळले होते माझे नाते. ते प्रेम होतं की मैत्री कधी कळलचं नाही मला. प्रेमा तुझा रंग कसा विचारता, विचारता रंगाच्या प्रेमात पडले मी. सावळ्याची सावळबाधा स्पर्श करून गेली तेव्हा मनवणं, रागावणं, ओढ लावणं घडत होतं. तेव्हा ही ते प्रेम होतं की मैत्री कळलंच नव्हतं मला. यावेळेस अनुभवायचीयं मला असिम शांतता. तेव्हा न कळण्याइतपत आपुलकीची दरी मोठी होण्याआधीचं लिहायला हवं. कारण, या प्रियेने मनातल्या नव्याकोऱ्या मजकुरांचे गाभारे खरडवायला घेतलेत. अश्रूंना वाट करून देण्याआधी तुझ्या प्रतिमांची कोरीव लेणी स्पर्शून जागवायला, काळ्या रातीवर टाकलंय पांढऱ्या शुभ्र जागेपणाचं अस्तर, त्यासाठी हा प्रपंच. आपल्या सुंदर नात्यात प्राजक्ताला खुलण्याचे वेध लागण्याआधी पत्र मिळताचं जिथं कुठं असशील तिथून लवकर ये.

तुझीच… मित्रबिन्दा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -