नाशिक: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. या कुंभमेळ्याला जगभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. मात्र याच कुंभमेळ्यावरून परतत असताना नाशिकमध्ये काही भाविकांवर काळाने घाला घातला.
नाशिकच्या सिन्नरमध्ये कुंभमेळ्यावरून परतत असणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात रत्नागिरीतील तीन जणांचा मृत्यू झालाय. तर तिघे जण गंभीर जखमी आहेत.
रत्नागिरीतील हे भाविक प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेले होते. यावेळी समृद्धी महामार्गावरून ते रत्नागिरीच्या दिशेने परतत होते. यावेळेस नाशिकच्या जवळ पहाटेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती पुढच्या गाडीवर जाऊन आदळली.
या अपघातात रत्नागिरीतील डीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, अथर्व किरण निकम आणि चालक भाग्यवान झगडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर किरण निकम , रमाकांत पांचाळ, रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज आणि प्रांजल प्रकाश साळवी हे जखमी झाले. जखमींपैकी किरण निकम यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय.