Tuesday, February 11, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यस्पर्श... सुरक्षित - असुरक्षित

स्पर्श… सुरक्षित – असुरक्षित

डॉ. राणी खेडीकर

बालमनावर नाजूक घाव
व्यापून असतो मोठा कोपरा……
उदास वणवा पेटत राहतो
आवरण ओढून हसरा चेहरा……

नऊ वर्षांचा बालक समोर बसला होता. डोळ्यांत काठोकाठ काजळ भरल्यामुळे त्याचे डोळे अधिकच काळे दिसत होते. तो अतिशय अस्वस्थ हालचाली करत होता. बाहेर त्यांच्या सख्ख्या काकाची सहा वर्षांची मुलगी आपल्या आईला बिलगुन बसली होती. दोघेही बालक पीडित होते. दोघांनाही वडील नव्हते. घरची परिस्थिती हलाखीची होती. मुलाची आई शिवणकाम करत होती. मुलीची आई स्वयंपाकाचे काम करणारी होती. बालकास बाहेर पाठवून पोलिसांना हकीकत सांगायला सांगितलं. FIR वाचली तर डोकं सुन्न झालं…तो नऊ वर्षांचा बालक त्या सहा वर्षांच्या बालिकेला fingerling करताना त्याच्या आईने बघितलं आणि त्याला पायाला चटका दिला. मग त्या बालकाने जे सांगितलं ते ऐकून दोन्ही बालकांच्या आई खूप घाबरल्या आणि पोलीस स्टेशनकडे त्यांनी धाव घेतली. त्या बालकाने सांगितलं की, काही महिन्यांपासून त्याचा मामा त्याला घाण व्हीडिओ दाखवत असे आणि तसे करण्यात सांगत असे. त्या बालकास त्या लैंगिक कृत्यांची सवय झाली आणि मग त्याने तसे प्रयोग त्या बालिकेवर करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराची माहिती त्यांच्या आजोबांना होती पण ते देखील ही कृत्ये बघत असे आणि हसत असे. आजोबांना त्याचं गांभीर्य नव्हतं. मामा आणि आजोबा दोघांना अटक झाली होती.

“आई मला शाळेत जायची भीती वाटते…कुठे पण जायची भीती वाटते… कोणी खराब अंकल मला bad touch करतील का गं” माझ्या मैत्रिणीची शेजारीण आपल्या सहा वर्षांच्या मुलीचे हे वाक्य ऐकून हादरून गेली. तिने लगेच मला फोन लावला आणि तिची मुलगी सारखी घाबरते आणि घरी आजोबा, काका कधीतरी येणारे मामा यांच्या कोणाकडे जात नाही, त्यांच्याशी बोलणं पण तिने जवळपास बंद केलं आहे. तिच्या आईशी बोलताना जाणवलं की, बातम्या आणि शाळेत सतत सांगण्यात येणाऱ्या good touch, bad touch आणि दररोज घडणाऱ्या घटना यामुळे ती अशी वागू लागली असावी. नाती, प्रेम, सुरक्षा यावर बालकांचा विश्वास कमी कमी होत जातोय. नात्यातील ऊब, आपलेपणा या गोष्टी लोप पावल्यामुळे बालकाची भावनिक गरज भागात नाही. भावनिक, मानसिक आधार, प्रेम या गरजा कुटुंब, नातेवाईक, समाज यांच्याकडून पूर्ण होत नसल्यामुळे ही बालके अभासी विश्वात रमत आहेत. आपण कुठे कमी पडतोय याचा विचार करून तसे ठोस उपाय शोधायला हवेत. प्रत्येक बालक हे वेगळं असतं. त्याच्या बाल मनावर कुठल्या गोष्टीचा, घटनेचा आघात होईल सांगता येणं सोपं नाहीय. बाल कल्याण समिती अध्यक्ष म्हणून काम करताना काळजी सरक्षणातील अनेक बालक, बालिका समोर येतात. त्यांच्या प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात. प्रश्न वेगळे असतात. प्रत्येक बालकाचा वेगळा अभ्यास करणं आवश्यक असतं.

आज थोडं वेगळ्या पद्धतीने या विषयावर चर्चा करण्याची गरज वाटतेय. तो नऊ वर्षांचा बालक ज्याने आपल्या चुलत बहिणीला fingering केलं. ज्याला व्हीडिओ दाखवून तसे लैंगिक कृत्य करण्याची सवय लावणारा तो वीस वर्षांचा मामा आणि त्याच्या या कृत्यावर पांघरूण घालून स्वतः त्याचा विकृत आनंद घेणारा बावन, त्रेपन वर्षांचा त्यांचा आजोबा या तिघांचा अभ्यास करता आपल्याला एक मानसिक आजाराची लक्षणे लक्षात येतात. १०० पैकी ४० टक्के व्यक्तींना लहान मुलांबद्दलच्या (पिडोफिलिया) आकर्षणाचा विकार असू शकतो,’ असे निरीक्षण बायर यांनी नोंदविले. ज्यांना चाइल्ड सेक्स अट्रॅक्ट करतं त्यांच्यात जन्मतः हा आजार असण्याची शक्यता असू शकते किंवा अशी कोणी व्यक्ती संपर्कात आल्यास तसे व्हीडियो दाखवण्यात आले तसे कृत्य करून घेतले गेले तर हा आजार बळावत जातो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यावीशी वाटते ती म्हणजे बालकांमध्ये अशी काही लक्षणे दिसून येताच पालकांनी त्याची गंभीर दखल घ्यायला हवी.

वस्तीतील सात-आठ वर्षांची बालके काहीतरी लैंगिक कृती करताना सहज लक्षात येतं परंतु पालक ते हसण्यावर नेतात. तीच खरी धोक्याची घंटा असते. रेड फ्लॅग असतो. त्याचवेळी बालकांना योग्य समुपदेशन प्राप्त झालं तर पुढे असे विकृत लैंगिक अपराध करणारे अपराधी निर्माण होण्यास निश्चितच मज्जाव होईल. बालकांना बघण्यासाठी, त्यांचा सहवास प्राप्त करण्यासाठी अशा व्यक्ती मुद्दाम बालकांशी संबंध येईल, त्यांना सहज स्पर्श करता येईल असे काम निवडतात आणि अशा व्यक्ती बालकांना जवळच्या वाटतात. हळूहळू ते बालकांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टीसाठी तयार करतात. असे व्हीडियो वारंवार बालकांना दाखवले जातात. नंतर, हा एक दोघांना आनंद देणारा Game आहे आणि ते आपलं गुपित आहे असे बालकांना सांगतात. बालकांशी अशी व्यक्ती सुरुवातीला खूप प्रेमाने वागतात त्यांना आवडेल त्या वस्तू त्या गोष्टी त्यांना भेट म्हणून देतात बालकाच्या कुटुंबाशी पण नातं निर्माण करतात. म्हणून पालकांनी आपल्या बालकावर विशेष लक्ष देणं गरजेचे आहे. बालकांना good वाटणारा touch देखील unsafe असू शकतो हे नीट उकल करून समजावून सांगणं नितांत गरजेचं आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार एकूण बालकांपैकी २४% बालकांवर लैंगिक अत्याचार होतात. बदलापूर घटना असू देत किंवा आणखी कुठलीही याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर मार्ग शोधवाच लागणार. असे बालपणी झालेले आघात बालकांचे संपूर्ण आयुष्य पोळून काढू शकते. आपण सगळे सजग राहून बालकांचे संरक्षण करू या, त्यांना बळकट करू या आणि ही नाजूक फुले जपू या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -