राजरंग : राज चिंचणकर
रंगमंचावर मुंबई आणि शिकागो या शहरांमधला दुवा साधण्याचे काम करणारे नाटक म्हणजे ‘अमेरिकन अल्बम’ आणि त्याच्या वेगळ्या धाटणीमुळे चर्चेचा विषय ठरलेल्या या ‘अल्बम’ने आता रंगभूमीवरचे त्याचे पन्नासावे पान उलटण्याचा मुहूर्त नक्की केला आहे. अनोख्या विषयामुळे रसिकांना मोहिनी घालणाऱ्या या ‘अल्बम’चा पन्नासावा महोत्सवी प्रयोग १६ फेब्रुवारी रोजी पुणे मुक्कामी रंगत आहे.
नात्यांमधल्या भावविश्वाचा ठेवा जतन करणारा हा ‘अल्बम’ असल्याचे या नाटकातून सूचित होत असून, त्याचे देखणे प्रतिबिंब या नाटकात पडले आहे. एक अनोखा विषय मनोरंजनाच्या माध्यमातून रंगमंचावर मांडण्याचे कार्य या नाटकाने केले आहे. गेल्या काही दशकांपासून भारतातून अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुले शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जात आहेत.
अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून ही मुले तिथे नोकरी मिळवतात, संसार थाटतात आणि अमेरिकेतच स्थायिक होतात. पण असे असले तरी त्यांची पाळेमुळे मात्र भारतीय असल्याने, त्यांना भारताविषयी सतत ओढ असते. पण त्यांची पुढची पिढी अमेरिकेतच जन्मलेली असल्याने, ही पिढी मात्र पूर्णतः अमेरिकन असते. या पुढच्या पिढीतली मुले भारतातल्या त्यांच्या नातेवाइकांबद्दल फक्त ऐकून असतात. या मुलांना त्यांच्याबद्दल निदान काही संवेदना तरी जाणवतात का, असा मुद्दा ‘अमेरिकन अल्बम’ या नाटकात प्रकर्षाने मांडला गेला आहे.
‘रसिक मोहिनी’ आणि ‘एफ.एफ.टी.जी.’ निर्मित या नाटकाचे लेखन राजन मोहाडीकर यांचे आहे. या नाटकाचे दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना आणि वेशभूषा अशी बहुरंगी जबाबदारी पुरुषोत्तम बेर्डे सांभाळत आहेत. भाग्यश्री देसाई यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. झरीर इराणी व मोहनदास प्रभू हे नाटकाचे सहनिर्माते आहेत. दीपक करंजीकर, आशुतोष नेर्लेकर, मोनिका जोशी, अमृता पटवर्धन व भाग्यश्री देसाई हे कलाकार या नाटकात भूमिका रंगवत आहेत. शेखर दाते हे या नाटकाचे व्यवस्थापन पाहत आहेत.
आतापर्यंत या नाटकाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रयोग झाले असून, नाटकाच्या वेगळ्या विषयामुळे रसिकांना या ‘अल्बम’चे आकर्षण वाटत आहे. पुण्यात या नाटकाच्या शुभारंभापूर्वी ज्येष्ठ रंगकर्मी आशा काळे यांनी या नाट्यसंहितेची पूजा करून या नाटकाचा मुहूर्त केला होता आणि आता पन्नासाव्या प्रयोगाच्याही त्या साक्षीदार होणार आहेत. त्यांच्यासोबत आजचा आघाडीचा अभिनेता गश्मीर महाजनी सुद्धा या ‘अल्बम’चा हा महोत्सवी प्रयोग आवर्जून पाहणार आहे.