रिअल टाईम ड्रामा - दोन वाजून बावीस मिनिटांनी

भालचंद्र कुबल - पाचवा वेद


मराठीतच नव्हे तर भारतीय रंगभूमीवर रिअल टाईम प्ले म्हणजे प्रत्यक्ष वेळेनुरूप चालणारी नाटके जवळपास नाहीतच. साधारण पाच-सात वर्षांपूर्वी डॉ. अनिल बांदिवडेकर लिखित आणि राजू वेंगुर्लेकर दिग्दर्शित ‘‘द कॅरेक्टर्स प्ले’’ नावाचे नाटक पाहिल्याचे आठवते. लेखकाने मांडलेले कथासूत्र हे नेमके तेवढ्याच कालावधीत मांडून क्लायमॅक्सपर्यंत नेण्याच्या प्रवासास किंवा प्रक्रियेस ‘रिअल टाईम प्ले’ असे ढोबळमनाने म्हणावयास हरकत नाही. वेंगुर्लेकरांनी दिग्दर्शकिय ट्रीटमेंट म्हणून त्यात एकही ब्लॅक आऊट वापरला नव्हता. ब्लॅक आऊट केल्याने नाटकास येणारा विराम, रिअल टाईम या संकल्पनेस बाधा आणणारा ठरतो व प्रत्यक्ष काळाची पकड कथासूत्रापासून दुरावते. नाटकाच्या सादरीकरणाचा कालावधी आणि कथानकाचा कालावधी जर सारखाच असेल तर त्यास रिअल टाईम प्रेझेंटेशन म्हणायला हरकत नाही. त्यातही इंटरव्हलचा ब्रेक आला तर? तर त्याची देखील बाधा कथासूत्रास होऊ नये, अशा स्वरुपाच्या संहिता देखील लिहिल्या गेल्या आहेत. दिलीप जगतापानी फ्रेंच लेखक जाँ झने यांच्या ‘द मेड’ चे ‘काठपदर’ नावाने केलेले रुपांतरण एक प्रकारे रिअल टाईम प्ले होता. मात्र काही दिग्दर्शकांनी तो रिअल टाईम म्हणून वापरला तर काहींनी नाही. मध्यंतरी “ट्वेंटीफोर” नावाची अभिनय देव यांची वेबसिरीज अशीच चोवीस तासांची होती...!



हाच रिअल टाईम, कथानकाच्या चौकटीत बसवून नीरज शिरवईकरांनी ‘दोन वाजून बावीस मिनिटानी’ हा सेमी भयनाट्याचा एक अनोखा प्रयोग रचला आहे. नेपथ्य देखील त्यांचेच असल्याने त्यातील डिजिटल घड्याळास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नाटक सुरु होते तेव्हा घड्याळात दोन बावीस व्हायला काही मिनिटांचा अवधी बाकी आहे. त्याच सुमारास काही अतर्क्य घटना हृतिका अनुभवते.


तसेच काहीसे अनुभव सोनाली व दुर्गेश या पात्राना येत राहतात व नाट्य अधिकच गुंतागुंतीचे होत जाते. केतन या पात्राचा मात्र या भुताखेतांच्या भाकडकथांवर विश्वास नाही त्यामुळे तो या विरोधातच आपली भूमिका मांडत राहातो. शेवटी या घरात एका आत्म्याचा वावर आहे या ठाम निर्णयाप्रत सर्व पात्रे येतात आणि एका विलक्षण अनुभवास सामोरे जाताना, प्रेक्षकवर्गास एका अचंबा नाट्यास सामोरे जावे लागते.


आजही लंडन स्थित नाट्यगहात टू ट्वेंटी टू नामक हेच नाटक पहाता येऊ शकते. डॅनी रॉबिन्सन यानी लिहिलेल्या संहितेच नीरज शिरवईकरांनी केलेले भारतीय रुप प्रेक्षकांना धरुन ठेवते आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शकीय क्लृप्त्या तर ती पकड घट्ट करत जातात. मूळ इंग्रजी नाटकात अनेक थिएट्रीकल गिमिक्स वापरली असल्याचे वाचनात आले होते. बाथरुममधे टर्पेंटाईनमुळे पेट घेणारा टेडी बेअर, प्लँचेट करताना आपोआप सरकणारे टेबल, आत्म्याचा वावर आहे हे दिसावे म्हणून भिंतीवरुन पडणाऱ्या फ्रेम्स आदी अनेक गिमिक्स त्या इंग्रजी नाटकात वापरल्या गेल्या आहेत. एवढेच नाहीतर नाटक अंगावर येण्यासाठी नेपथ्यात उभारलेला मजलाच प्रेक्षकांच्या अंगावर येतो आणि प्रेक्षक दचकतात. या मराठी आवृत्तीत असे काही होत नाही. कारण यातील चारही पात्रे आपल्या अभिनय सामर्थ्याने प्रेक्षकांना दचकवतात. गौतमी देशपांडे यांनी ‘गालिब’मधे दचकवले होते इथेही त्या दचकवतातच, रसिका सुनील यांनी डाएट लग्नमधे दचकवले होते इथे त्या कमाल स्वरुपात पेश होतात.


गौतमी आणि रसिका या दोघीही मालिकेतून नाटकाकडे वळलेल्या सरप्राईज एलिमेंट्स आहेत. मालिकातील अभिनय एलिमेंटला हरताळ फासला जाण्याचा अनुभव प्रेक्षकवर्ग घेत असताना, या दोघींचा नाटकातील वावर नाटक समृद्ध करणारा आहे. बाकी अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव यांच्या मागे अनुभवाची प्रचंड भिंत उभी आहे. प्रियदर्शनने साकारलेला ग्रामीण दुर्गेश तो स्वीकारायला लावतो. त्याच्याजवळ स्वतःचा असा दिग्दर्शकीय विचार आहे. आपल्या कॅरेक्टरच्या विकासासाठी तो विचार वापरण्याचे धाडस, त्याला सहजगती प्राप्त करुन देते. मी त्याचे बरेच प्रयत्न पाहिलेत, अगदी सुसाटपासून ते नवा गडी नवा राज्यपर्यंत त्याची तळमळ पाहिलीय. बाकी नायकांपेक्षा सर्वच बाबतीत काकणभर सरस असताना त्यामानाने प्रियदर्शन मागे राहिलाय. दुर्गेश या भूमिकेमुळे मात्र तो इथेही उजवा ठरलाय. अजित परब आणि शीतल तळपदे अनुक्रमे संगीत आणि प्रकाश योजनेसाठी चपखल बसलेत. आपले महत्त्व दोघेही अधोरेखित करण्याचे कसब सोडत नाहीत.


सुरुवातीच्या अनाउन्समेंटने आपण थोडे रिलॅक्स होतो, ती म्हणजे “नाटक सुरू असताना मोबाईल वाजल्यास भूत मागे लागते असे म्हणतात, आमचा यावर विश्वास नाही, परंतु तसा अनुभव घ्यायचा की नाही, हे तुमचं तुम्ही ठरवा...! आणि दृष्यात्मक आघाताने नाटक तुम्हाला कसे बांधून ठेवते हे अनुभवायला मिळते.

Comments
Add Comment

महाराष्ट्राची सुपरस्टार या कार्यक्रमासाठी निवड...

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल धनश्री काडगावकरने विविध भूमिका साकारून स्वतःची अशी अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळख

प्रेम करावं नाटकावर... शंभरीच्या उंबरठ्यावर...!

राजरंग : राज चिंचणकर रंगभूमीवर एखाद्या नाटकाचे शंभर प्रयोग होणे, ही नाट्यसृष्टीच्या दृष्टीने नवीन गोष्ट नाही.

पारदर्शक दुधारी तलवारीचा वापर

पाचवा वेद : भालचंद्र कुबल गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या शासन पुरस्कृत राज्य नाट्य स्पर्धा आणि त्यासाठी

रेणुका शहाणेची 'धावपट्टी' ऑस्करला

अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी तयार केलेला 'धावपट्टी' हा अॅनिमेटेड लघुपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला असून ही

तपोवनमधील वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध

नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळा होणार आहे. मात्र याच कुंभमेळ्यात साधुग्राम बांधण्यासाठी इथल्या तपोवन परिसरातील अनेक

विनय धुमाळ यांच्याकडून अभिनयासोबतच तंत्रज्ञानाविषयी बऱ्याच गोष्टी शिकलो

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  कोणत्याही यशस्वी डॉक्टरची ओळख केवळ त्याच्या कौशल्यातून होत नाही, तर त्याच्या