Monday, February 10, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यRambhau Joshi : शतकोत्तर आयुष्य लाभलेले रामभाऊ जोशी

Rambhau Joshi : शतकोत्तर आयुष्य लाभलेले रामभाऊ जोशी

सुमारे सहा दशके महाराष्ट्रातील पत्रकारितेमध्ये आपल्या लेखणीद्वारे स्वतःचे स्थान निर्माण केलेले रामभाऊ जोशी हे सहा दशकांतील पत्रकारितेचे आदर्श स्थान ठरले. रामभाऊ जोशी यांनी केवळ पत्रकारिता केली नाही तर सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य आणि संगीत क्षेत्रातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यामध्ये सुद्धा ते अनेकांना आदर्श वाटले. रामभाऊ जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे चार वर्षे अध्यक्ष पदही त्यांनी भूषविले. असे हे ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी ऊर्फ रामभाऊ जोशी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय १०१ वर्षे होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

अनिल जोशी

रामचंद्र अण्णाजी तथा रामभाऊ जोशी यांनी वयाच्या विसाव्या वर्षीच आपल्या पत्रकारितेच्या वाटचालीस सुरुवात केली, ही त्यांची पत्रकारिता म्हणजे एक अष्टपैलू पत्रकारिता होती. लेखणी हातात घेणे आणि तिच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे लेखन करणे हा त्यांचा सुरुवातीस आवडता छंद होता. तो छंद जोपासताना रामभाऊंना राजकारण, समाजकारण, शैक्षणिक वातावरण आणि संगीत क्षेत्रातील असंख्य मित्र भेटत गेले आणि विशेष म्हणजे त्यांचे हे मिळवलेले मित्र अखेरपर्यंत जीवाभावाचे स्नेही बनले. मग तेथे यशवंतराव चव्हाण असोत किंवा भीमसेन जोशी असोत. वसंतराव देशपांडे किंवा पु. ल. देशपांडे असोत किंवा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी असोत. ही सारीच मंडळी रामभाऊंच्या समोर सातत्याने येत राहिली. सर्वांच्या प्रसंगी मुलाखती घेणे त्यांच्या जीवन कार्यावर स्वतंत्र लेखन करणे, त्यांच्या आदर्श गुणांचे वर्णन करताना त्यांच्याशी सातत्याने बोलत राहणे या सर्व गोष्टी रामभाऊंच्या लिखाणाचे विषय ठरले. सुरुवातीस रामभाऊ जोशी हे वसंत काणे यांच्या संध्या दैनिकात लेखन करू लागले. वसंत काणे यांनी सुरू केलेल्या रोहिणी मासिकात व्यक्तिचित्रे आणि प्रबोधनात्मक लेख रामभाऊ लिहीत राहिले. लिखाणाच्या या गतिशील वाटचालीत रामभाऊ काव्य लेखन करत राहिले हे तर खरेच, त्यापुढे जाऊन रामभाऊ पोवाडे लिहीत राहिले आवाजाची देणगी त्यांना सुरुवातीसच लाभल्याने सांगली येथील शाहीर दीक्षित यांच्याबरोबर ते पोवाडे म्हणत राहिले. त्यांना संगीत क्षेत्रातील रागदारीची सुरुवातीपासून ओळख होतीच पण पोवाडे म्हणताना त्यांना तालाचे देखील ज्ञान मिळत राहिले. त्याचा परिणाम म्हणजे शाहिरांबरोबर पोवाडे म्हणणे, त्यांना साथ देणे आणि एखादे भारुड किंवा गौळण म्हणण्याचा त्यांना छंद जडला.

रामभाऊंचा हा उमेदीचा काळ होता. पुण्यासारख्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे वास्तव्य राहिल्याने पुणे आकाशवाणीवर श्रुतिका लेखन करण्याची संधी त्यांना लाभली. गाण्याची आवड असल्याने रामभाऊंची अनेक गीते हीज मास्टर्स व्हॉईस, कोलंबिया क्वीन आणि यंग इंडिया कंपनीने ध्वनिमुद्रित केली. जवाहरलाल नेहरू यांच्यावर रामभाऊंनी लिहिलेले पोवाडे कोलंबिया यांनी ध्वनिमुद्रित करून प्रसारित केले. मुंबई आकाशवाणीवरून रामभाऊंच्या असंख्य ललित कथा प्रक्षेपित झाल्या एवढेच नव्हे तर त्यांनी लेखनाच्या क्षेत्रात जे कार्य केले त्याच धर्तीवर त्यांनी वक्तृत्व क्षेत्रातही काम केले. त्यांची अनेक विषयांवरील भाषणे पुणे, मुंबई, सांगली या आकाशवाणी केंद्रातून प्रसारित झाली. रामभाऊंनी या लहान वयात अनेक वैचारिक ग्रंथांचे वाचन केल्याने त्या ग्रंथांचे समीक्षण देखील आकाशवाणीच्या माध्यमातून प्रसारित झाले. १९६२ मध्ये पुणे येथील केसरी हे दैनिक स्वरूपात प्रकाशित होत राहिले. त्यावेळी त्या केसरीचे प्रमुख संपादक होते जयंतराव टिळक. जयंतराव टिळकांनी केसरीमध्ये नवीन पिढीतील पत्रकार समाविष्ट केले. त्यामध्ये भा. द. खरे, वि. स. वाळिंबे, रामभाऊ जोशी, बाबुराव राशिंगकर यांना समाविष्ट केले. केसरीच्या लेखनास नवे रूप येऊ लागले. विचारांबरोबर लालित्य येत राहिले. रविवारच्या पुरवण्या प्रकाशित होत राहिल्या. देश-विदेशातील घटनांचे लेखन होत राहिले. त्यामध्ये मुख्य सहभाग होता नरुभाऊ लिमये यांचा. बदलत्या काळानुसार केसरीने आपली ध्येय-धोरणे बदलली. त्यामध्ये वाचकांच्या अभिरुचीची जाणीवपूर्वक दखल घेण्यात आली.

केसरीतील राजकीय लेखनाची जबाबदारी रामभाऊ जोशी यांच्याकडे आली, महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेण्याची संधी रामभाऊ जोशी यांना मिळाली. त्याबरोबर राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे भाष्यकार देखील रामभाऊंच्या नजरे समोर येऊ लागले. त्यामध्ये ना. ग. गोरे होते, एस. एम. जोशी होते, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते आणि ग. प्र. प्रधान होते. केसरी आणि मराठा यांचे दिवाळी अंक प्रसारित होत राहिले. या अंकाच्या माध्यमातून रामभाऊ जोशी यांनी यशवंतराव चव्हाण, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, यांच्या विविध विषयांवर आधारित घेतलेल्या मुलाखती प्रसिद्ध होत राहिल्या. रामभाऊ जोशी यांच्या लेखणीतील स्वतंत्र विचारांवर आधारित लेखन करण्याकडे झुकावे लागले. सामाजिक भूमिका, सहकार क्षेत्रात त्यांनी प्रचंड काम केले. त्या बाबुराव शेटे यांचे पहिले चरित्र रामभाऊ यांनी लिहिले. त्याचे नाव होते ‘सार्वजनिक बाबुराव’ आणि यातील लेखनास प्रस्तावना आहे ती तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची. यशवंतराव चव्हाण आणि मोहन धारिया यांच्याशी घनिष्ठ स्नेह जोपासण्याची संधी रामभाऊंना मिळाली. यशवंतराव चव्हाण यांच्याशी रामभाऊंनी जे नाते जोडले ते बंधुत्वाचे होते, मैत्री हे मूल्य या उभयतांनी मनापासून जोपासले, त्यामुळे राजकारणापासून दूर राहून यांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा लोभस असा गुण जोपासला. यशवंतराव चव्हाण केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर त्यांनी रामभाऊ जोशी यांना दिल्लीत येण्यास सांगितले आणि सहा महिन्यांच्या वास्तव्यात रामभाऊ जोशी यांनी ‘यशवंतराव इतिहासाचे पान’ या ग्रंथाचे लेखन केले. हा ग्रंथ म्हणजे रामभाऊ जोशी यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील असंख्य घटनांना शब्दबद्ध केले आहे. मुख्य म्हणजे या ग्रंथात प्रस्तावना आहे ती तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची.

यशवंतराव आणि त्यांच्याशी नात्याने जोडलेल्या अनेक व्यक्तींच्या जीवन कार्यावर आधारित लेखन रामभाऊंनी केले. त्यामध्ये ‘ओव्या विठाईच्या’ ‘ही ज्योत अनंताची’ यासारखे ग्रंथ आहेतच पण यशवंतराव चव्हाण परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी त्यांच्या पत्नी वेणूताई यांना लिहिलेली अनेक पत्रे रामभाऊंच्या हाती आल्याने ‘विदेश दर्शन’ हा ग्रंथ आकारास आला. त्या काळात यशवंतरावांनी लिहिलेली पत्रे म्हणजे देशातील आणि परदेशातील अनेक राजकीय आणि सामाजिक नेत्यांची करून दिलेली ओळख आहे. एका सामान्य पत्रकाराच्या हाती असे पत्रलेखन यशवंतरावांनी का व कसे दिले हा सामान्य वाचकांसमोर येणारा प्रश्न आहे, पण त्याचे उत्तर म्हणजे रामभाऊ जोशी यांनी अखेरपर्यंत जतन केलेली विश्वासार्हता हा गुण होय. त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात पदे भूषविली ती फारच उल्लेखनीय ठरली. त्यांनी उपसंपादक, प्रमुख वार्ताहर, सहसंपादक, कार्यकारी संपादक व अखेरीस कमर्शियल एडिटर म्हणून काम पाहिले.

पत्रकारिता, ग्रंथ लेखन, काव्य लेखन, मुलाखती, श्रुतिका लेखन या सर्व गोष्टी रामभाऊंना साध्य झाल्या याचे कारण त्यांना लाभलेली प्रतिभा शक्ती होय. या प्रतिभा गुणाबरोबरच रामभाऊ जोशी यांच्या स्वभावात एक अध्यात्म वृत्तीचा कोपरा होता. पुणे येथील न्यायरत्न धुंडिराज शास्त्री विनोद हे तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक. त्यातही त्यांचा हिंदू तत्त्वज्ञानावर विशेष अधिकार होता. त्यांच्या सहवासात राहण्याची संधी रामभाऊंना लाभली. न्यायरत्न विनोद यांचा गीता या ग्रंथाबाबत विशेष अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी जे लेखन केले आहे ते बहुतांशी श्लोक आणि अभंग या स्वरूपातील आहे. हे लेखन साकार करताना न्यायरत्न विनोद रामभाऊंना पाचारण करायचे आणि ते सारे श्लोक मुखाने म्हणायचे आणि त्यांना रामभाऊंनी लिखित स्वरूपात आणायचे असा प्रकार अनेक वर्षे चालत राहिला. त्याचा परिणाम म्हणजे रामभाऊंना अध्यात्माची गोडी लागत राहिली. त्याचप्रमाणे गोंदवलेकर महाराजांची अध्यात्मवाणी रामभाऊच्या मुखी अखेरपर्यंत येत राहिली. पत्रकारितेच्या क्षेत्रात रामभाऊंनी केलेले कार्य जसे उल्लेखनीय आहे तसेच त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्यही आहे. पुण्यामध्ये पत्रकारांना स्वतंत्र निवासस्थान हवे ही बाब लक्षात येताच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी संपर्क साधून सेनापती बापट मार्गानजीक ‘पत्रकार नगर’ तयार करण्यामध्ये रामभाऊंचा सिंहाचा वाटा होता. तसाच भाग गांजवे चौकातील ‘पत्रकार भवन’ निर्माण करण्यातही होता. पुणे येथील गेली असंख्य वर्षे सुरू असणारे ‘सवाई गंधर्व’ हे संगीत क्षेत्रातील कार्य म्हणजे रामभाऊ जोशी यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याची महत्त्वाची आठवण आहे. रामभाऊंना पत्रकारितेच्या क्षेत्रातील समर्थ कार्याबद्दल यशवंत भूषण पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे पुरस्कार, सकाळकर्ते ना. भि, परुळेकर स्मृती पुरस्कार, केसरी मराठा संस्थेचा जयंतराव टिळक पुरस्कार, दैनिक पुण्यनगरीचा पुण्यभूषण पुरस्कार, अशा विविध पुरस्कारांनी रामभाऊंच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. अशा विविध गुणांनी समृद्ध असणारे रामभाऊ जोशी यांचे जीवनकार्य म्हणजे नवीन पिढीतील पत्रकारांच्या समोरील दीपस्तंभ ठरलेले आहे. १०२ वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले रामभाऊ जोशी यांच्या सर्व कार्यापुढे नतमस्तक व्हावे असेच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -