संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संपूर्ण देशाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची प्रतीक्षा असते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून देशाची वाटचाल, प्रगतीची सद्यस्थिती, देशापुढील वाटचाल, अडचणी, आर्थिक घडामोडी यांचे चित्र स्पष्ट होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून विद्यमान पंतप्रधानांच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला जातो. तसा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. मागील अर्थसंकल्प आणि मोदी सरकारच्या कृती योजनांचा फायदा झाला. समाजातील प्रत्येक घटकाला याचा फायदा झाला. हा एक असा लेखाजोखा होता जो केवळ नेत्रदीपक होता, याबाबतचे प्रशंसोद्गारही राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या भाषणातून काढले. विरोधकांनीही मुर्मू यांनी सादर केलेल्या अभिभाषणाची एकतर प्रशंसा करणे आवश्यक होते अथवा अभिभाषणामध्ये विकासकामांची करण्यात आलेली प्रशंसा कशा प्रकारे चुकीची आहे, विकासकामांची गती कशी मंदावली आहे, हे सभागृहात मांडत अभिभाषणाचा पंचनामा करणे आवश्यक होते. एक सक्षम विरोधी पक्षाकडून जनतेची हीच अपेक्षा असते; परंतु सत्ताधाऱ्यांच्या कामाची प्रशंसा करण्याइतपत औदार्य अजूनही आपल्या भारतीय लोकशाहीत कार्यरत असणाऱ्या राजकारण्यांमध्ये रुजलेले नाही, ही एक प्रकारची शोकांतिकाच आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सभागृहात १०० खासदारांचे संख्याबळ असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींकडून मुक्ताफळे उधळण्यात आली, त्यावरून देशवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसच्या नेत्या व राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख पुअर लेडी असा केला. तर त्यांचेच सुपुत्र खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे भाषण कंटाळवाणे असल्याचे म्हटले. यावरून काँग्रेसी नेत्यांची मानसिकता उघडपणे पाहावयास मिळते. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर विविध स्तरातून टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली आहे. यावरून राजकारणही तापण्यास सुरुवात झाली. यावर भाजपानेही जोरदार पलटवार केला आहे. विकसित भारत हे आपले ध्येय असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी संसदेत आपले अभिभाषण केले होते. आदिवासी समाजाच्या महिलेला देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान करून भाजपाने देशातील आदिवासी समाजाचा केवळ उक्तीतून नव्हे तर कृतीतून खऱ्या अर्थांने गौरव केला आहे. सोनिया गांधी यांनी अभिभाषणानंतर त्याच राष्ट्रपती मुर्मू यांचा ‘पुअर लेडी’ असा जाहिररीत्या उल्लेख करत एकप्रकारे आदिवासी समाजाचाच अपमान केल्याचा सूर आता देशाच्या कानाकोपऱ्यांतून आळविला जात आहे. एकीकडे भाजपाकडून गौरवाची भूमिका आणि सोनिया गांधी व राहुल गांधींकडून काढले जाणारे अपमानास्पद वक्तव्य हा विरोधाभास यानिमित्ताने देशवासीयांपुढे आला आहे. यानिमित्ताने काँग्रेसचा दुटप्पी चेहरा पुन्हा एकवार समोर आला असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसच्या घोषणा या केवळ निवडणूक काळापुरत्याच सीमित असतात, निवडणुका संपल्यावर वास्तवामध्ये त्या घोषणांशी काँग्रेसचा काडीमात्रही संबंध नसतो.
१९५२ पासून चालत आलेल्या देशाच्या संसदीय कारभारात पाहावयास मिळालेले आहे. काँग्रेसने आजवर केवळ घोषणा देऊन देशवासीयांची दिशाभूल करत केंद्रातील सत्ता अमर्याद काळ उपभोगलेली आहे. २०१४ पर्यंत हेच चित्र कायम होते. केवळ गरिबी हटाव या एकमेव घोषणेवर काँग्रेसने एक लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवित देशाची पाच वर्षे सत्ता उपभोगली होती. काँग्रेसला सत्ता मिळाली, परंतु या देशातून गरिबी काही हटली नाही आणि ती हटविण्यासाठी काँग्रेसकडूनही काही विशेष प्रयत्न केले गेले नाहीत. मात्र सतत देशाची सत्ता उपभोगताना काँग्रेसच्या नेत्यांची मात्र गरिबी हटली, ती इतकी हटली की सुखराम नामक केंद्रीय मंत्र्यांच्या बेडरूममधील गादीमध्ये तब्बल सहा कोटींची रोकड सापडावी, इतकी श्रीमंती काँग्रेसच्या नेतेमंडळींकडे सतत देशाची सत्ता उपभोगून आली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींवर अभिभाषणानंतर टीका करणाऱ्या काँग्रेसी नेत्यांचे डोके फिरले आहे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.भिभाषणानंतर राष्ट्रपती मुर्मू यांच्याबाबत काँग्रेसच्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी अपमानास्पद वक्तव्य काढताना देशातील आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. यातून काँग्रेसी नेत्यांची आदिवासी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही व्यक्त झाला. २०१४ साली केंद्रातून सत्ता गेल्यानंतर आणि २०१९ आणि २०२४ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही भारतीय मतदारांनी भाजपालाच सत्तेवर विराजमान केल्याने सत्ता मिळत नसल्याने कदाचित काँग्रेसच्या नेत्यांचे मानसिक संतुलन ढासळले असावे, असाही सूर आता देशातील जनतेकडून आळविला जात आहे. भाजपाने सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळविली.
२०१४ पासून देशाचा कारभार पाहताना मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला प्रगतिपथावर नेत असताना भाजपाप्रणीत केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचे कोणतेही उदाहरण आजवर आढळून आले नाही. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची कोणतीही संधी मिळत नसल्याने काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली. चर्चेच्या प्रकाशझोतात राहण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून बालिश वक्तव्य करण्याचा पायंडा २०१४ पासून पडलेला आहे. विचित्र वक्तव्य करून जनतेत चर्चेमध्ये राहण्याचा केविलवाणा उद्योग काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून नेहमीच केला जातो. खासदार राहुल गांधी तर यात आघाडीवर आहेत. राहुल गांधी हे संसदेत, देशामध्ये, अगदी परदेशात फिरायला गेल्यावरही देशाबाबत उलटसुलट वक्तव्य करतात. यामुळे त्यांना काही काळ प्रसिद्धी मिळत असली तरी जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलीन हात असल्याचेही भान राहुल गांधींना राहू नये हे आपल्या देशाचे दुर्दैवं आहे. देशवासीयांनीच आता काँग्रेस नेत्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असतात. काँग्रेसने टीका करण्याच्या नादात अनेकदा मर्यादांचे उल्लंघन केले आहे. देशाच्या राष्ट्रपती म्हणजे कोणतेही राजकीय नेते नाहीत, तर देशाचे ते सर्वोच्च घटनात्मक पद आहे. त्यांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे काँग्रेसी नेत्यांचा निषेध करून त्यांना जाब विचारणे आवश्यक आहे. भारतीयांनी असे केले तर पुन्हा अशी वक्तव्ये करण्याचे धाडस काँग्रेसी नेत्यांकडून दाखविले जाणार नाही.