एनसीसी नेवल विंगच्या मेनू-२०२५ स्पर्धेत अभूतपूर्व यश
रत्नागिरी : २ महाराष्ट्र नेवल युनिट, रत्नागिरी यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत एनसीसी नेवल विंग अंतर्गत मेनू-२०२५ स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
५ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान मेनू-२५ शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रत्नागिरी, वरवडे, जयगड, तवसाळ, वोरीया येथील पात्र कॅडेट्सनी सहभाग घेतला. संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेल्या ६० एनसीसी कॅडेट्स या शिबिराचा भाग होते.
या यशामागे कमांडर के. राजेश कुमार, समादेशक अधिकारी, २ महाराष्ट्र नेवल युनिट, रत्नागिरी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. गेल्या चार वर्षांत सलग तीन वेळा प्रथम आणि एकदा द्वितीय क्रमांक मिळवण्याचा मान या युनिटने मिळवला आहे.
पी.एम. रॅली, नवी दिल्ली येथे २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात २ महाराष्ट्र नेवल युनिट, रत्नागिरी यांना देशातील सर्वोत्कृष्ट एनसीसी नेवल युनिट म्हणून गौरवण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून या युनिटचे अभिनंदन केले जात आहे.