‘असे’ असतील पर्यायी मार्ग
पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येणार आहे. यामुळे या मार्गावर होणारी गर्दी पाहता तसेच भाविकांच्या सोईसाठी मध्य पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. पुणे वाहतूक विभागाने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला असून येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यातआली आहे. पोलिसांच्या या निर्णयामुळे मात्र, शिवाजीनगर ते स्वारगेटला जाणाऱ्या प्रवाशांची मात्र, मोठी गैरसोय होणार आहे.
श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात उद्या सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस, तसेच अन्य वाहनांनी स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे चौक), झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता, खंडोबीजाबाबा चौक, टिळक चौकमार्गे स्वारगेटकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
त्याचबरोबर स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी झाशीची राणी चौकातून महापालिका भवनकडे जावे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनांनी अप्पा बळवंत चैाकमार्गे इच्छितस्थळी जावे. गर्दी वाढल्यास लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून जाणारी वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.