धुळे : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेत धुळ्याचा उभरता मल्लयोध्दा चंद्रशेखर गवळी (Chandrashekhar Gawli) याने पहिल्यांदाच वरीष्ठ ८६ किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावले. (Chandrashekhar Gawli from Dhule wins gold medal in Maharashtra Kesari) हा क्षण तमाम धुळेकरांसाठी सुवर्णाक्षराने नोंदविणारा ठरला आहे. धुळ्याच्या क्रीडा इतिहासाच्या शिरपेचात आणखी एक ’सुवर्ण तुरा’ खोवला गेला आहे. चंद्रशेखर गवळी यांच्या या सुवर्ण कामगिरीमुळे धुळ्यातील कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचे उधाण आले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रचंड क्षमता निर्माण केलेल्या चंद्रशेखर गवळीचे आता लक्ष्य हवे महाराष्ट्र केसरीचे. तो भविष्यात ’महाराष्ट्र केसरी’ही ओढून आणेल अशी अपेक्षा आणि सर्वशक्तिमान बजरंग यांना प्रार्थना करूयात. यापुर्वी जिल्ह्यातील अनेक पहेलवानांनी माती विभागातल्या विविध वजनी गटात सुवर्ण, रौप्य आणि रजत पदके मिळवली आहेत, त्या त्या क्षणांची आज चंद्रशेखर गवळी यांच्या यशामुळे आठवण ताजी झाली आहे.
सलग दुसऱ्यांदा भारतीय मुलींचा संघ १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
धुळे शहर हे तसे खिलाडू आणि खेळाडूंच्या बाबतीत तसे नशीबवान आहे. कुस्ती आणि खो-खोची पंढरी म्हणून अवघ्या महाराष्ट्रात आणि अख्या भारतात प्रसिद्धीला आलेलं धुळे शहर आता चंद्रशेखर गवळी याने ८६ किलो वजन गटाच्या माती विभागात सुवर्ण पदक पटकावून पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या धुळे शहर आणि जिल्ह्यातील तमाम उमद्या कुस्तीगीरांना चंद्रशेखरच्या यशाने साहजिकच नवसंजीवनी मिळाली आहे.
धुळे जिल्ह्यातील अनेक मातब्बर पहेलवानांनी त्यांच्या कारकिर्दीत राज्यातल्या कुस्ती आखाड्यांमध्ये धूम केली आहे. राज्यातल्या नामवंत व्यायाम शाळेत सराव करणार्या भल्याभल्या मल्लांना माती चारून हे मल्ल धुळ्यात परतत असत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत माती विभागात सुवर्ण पदके मिळविली आहेत. अशा मान्यवर सगळ्याच कुस्तीपटूंची नावे येथे उल्लेख करणे शक्त नसले तरी कुस्ती क्षेत्रात नवलौकिक केले ते राष्ट्रीय कुस्तीगीर संजय गिरी यांनी. राज्यातल्या नामांकित कुस्ती प्रशिक्षण केंद्रात कयेक वर्षे खुराक खाऊन गावरानी तूप पिणार्या मल्लांची कुस्ती संजय गिरी सोबत होणार म्हटलं,की अवघे स्टेडियम सुन्न. टाचणी पडली तर आवाज व्हावा एवढं शांत. सार्या हजार पाच हजार कुस्ती प्रेमी,रसिकांच्या आणि कॅमेर्यांच्या नजरा संजय गिरी यांच्या कुस्तीचे क्षण टिपण्या साठी सज्ज असायच्या.
तरीही अनेकदा अनेकांना संजय गिरीचा डाव कळण्याच्या आत प्रतिस्पर्धी मल्लाने आकाश पाहिलेले असायचे. अपवाद सोडला तर संजय गिरीने कधीही आपल्या पाठीला माती लागू दिली नाही. असेच शिवानंद (छोटू) सोनार, संजय कुटे, महेश बोरसे आणि अन्य काही गिनेचुने मल्लही धुळ्यातले लखलखते तारे ठरले होते. त्यांनी कुस्ती क्षेत्रातल्या काही वजन गटातली पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी मोडून काढली आणि त्या त्या काळात नवा इतिहास रचला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला पहिले सुवर्ण मिळवून देणारे संजय गिरी आजही उमद्या कुस्तीगिरांसाठी कुशल प्रशिक्षकाच्या भूमिकेत असतात. संजय गिरी किंवा छोटू सोनार यांच्या सोबत ज्यांची कुणाची कुस्ती असायची त्यापैकी अनेक प्रतिस्पर्धी आपल्याला मिळालेली फीत पायांना बांधतांनाच थरथरत.त्यांच्या हाताची बोटे थरथरली,की काही क्षणातच कुस्ती होईल असा अंदाज कुस्ती पाहणार्यांना येत असे. चंद्रशेखर गवळी असाच एक मल्ल आता धुळ्यात उदयाला आला आहे. त्याने अहिल्यानगर येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आपल्या ८६ किलो वजन गट माती विभागात दैदीप्यमान यश मिळविले आहे. आपल्या वजन गटातल्या प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्ध्याला लोळवून चंद्रशेखरने सुवर्ण पदक मिळविले आहे. यामुळे धुळ्यातील पेठ भागातली एकनाथ व्यायाम शाळा चर्चेत आली आहे.