Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीमहाकुंभमध्ये पतीचे रूप पाहून पत्नीला धक्का, २७ वर्षांपूर्वी पाटणामधून झाले होते गायब

महाकुंभमध्ये पतीचे रूप पाहून पत्नीला धक्का, २७ वर्षांपूर्वी पाटणामधून झाले होते गायब

प्रयागराज: तुम्ही अनेकदा मजामस्करीमध्ये काहींच्या तोंडून ऐकले असेल की, अरे कुंभमेळ्यात हरवले होतात काय? ठीक अशीच कहाणी झारखंड येथून समोर आली आहे. झारखंडमधील एका कुटुंबाने प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यामध्ये २७ वर्षांपूर्वी आपल्या गमावलेल्या सदस्याला शोधल्याचा दावा केला आहे.

१९९८मध्ये झाले होते बेपत्ता

कुटुंबाचे म्हणणे आहे १९९८मध्ये हरवलेले गंगासागर आता अघोरी साधू बनले आहेत. त्यांना आता बाबा राजकुमार या नावाने ओळखतात. त्यांचे वय ६५ वर्षे आहे. गंगासागर १९९८मध्ये पाटणामध्ये गेल्यानंतर अचानक बेपत्ता झाले होते. त्यांची कोणतीच बातमी मिळाली नव्हती. त्यांची पत्नी धनवा देवीने एकटीनेच आपली दोन मुले कमलेश आणि विमलेश यांचा सांभाळ केला.

गंगासागरचा छोटा भाऊ मुरली यादवने सांगितले, आम्ही भाऊ सापडेल अशी आशाच सोडली होती. मात्र नुकतेच आमच्या एका नातेवाईकाने कुंभ मेळ्यामध्ये एका साधूला पाहिले जे गंगासागरसारखे दिसत होते. त्यांचा फोटोही नातेवाईकांनी पाठवला होता. फोटो पाहून धनवा देवी आणि त्यांची दोन मुले कुंभमेळ्यात पोहोचली.

Mahakumbh Stampede: महाकुंभमधील चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू, ६० जखमी

बाबा राजकुमार यांनी दावा नाकारला

कुटुंबाचे म्हणणे आहे की त्यांनी बाबा राजकुमार यांच्या रूपात गंगासागर यादव यांना ओळखले आहे. मात्र साधूंनी यास नकार दिला आहे. बाबा राजकुमार स्वत:ला वाराणसीचे साधू मानतात. त्यांचा गंगासागरशी काहीही संबंध नाही.

निशाण पाहून कुटुंबाने केला दावा

दरम्यान, कुटुंबाने त्यांच्या शरीरावरल निशाण ओळखून असा दावा केला आहे की तेच गंगासागर आहेत. त्यांचे लांब दात, डोक्यावर जखमेचे निशाण तसेच गुडघ्यावरील जुनी जखम दाखवताना तीच व्यक्ती असल्याचा दावा गंगासागर यांच्या कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबाने पोलिसांकडे याबाबत मदत मागितली आहे. तसेच डीएनए चाचणीची मागणी केली आहे.

गंगासागर यांचे भाऊ मुरली यादव म्हणाले, आम्ही कुंभ मेळा संपण्याची वाट पाहत आहोत. जर गरज पडली तर डीएनए टेस्टही करू. जर चाचणीत आमचा दावा खोटा ठरला तर आम्ही बाबा राजकुमार यांची माफी मागू. दरम्यान, कुटुंबातील काही सदस्य घरी परतले आहेत तर काही अजूनही कुंभ मेळ्यात आहेत आणि ते बाबा राजकुमार यांच्यावर नजर ठेवून आहेत.

गंगासागर बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. गंगासागर बेपत्ता झाले त्यावेळेस त्यांच्या मोठ्या मुलाचे वय केवळ २ वर्षे होते. दरम्यान, डीएनए चाचणीतून सत्य समोर येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -