अरविन्द दोडे
अथवा ज्ञान कीर आपू नोहे |
परी ते चाड एकी जरी वाहे |
तरी तेथ जिव्हाळा काही आहे |
प्राप्तीचा पै ॥४.१९५॥
अथवा ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली, पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्यानं बाळगली, तरी त्याला ज्ञान प्राप्त होण्याची काहीतरी आशा आहे. हा ज्ञानसंन्या सयोग गुरुगाथेच्या माध्यमातून समजून घेताना ज्यांना अमृत बेचव वाटतं, त्यांचं काय? अहंभावाची संगत असेल तर अभिलाषेची गाठ सुटता सुटत नाही. समदृष्टीचं वर्म कळता कळत नाही. मृगजळाच्या महापुरात माणूस जन्मोजन्मी गटांगळ्या खातो. मग ‘स्व’ स्वरूपाशी अनुसंधान साधणार कसा? आपल्यात हिरण्यगर्भाचा अंश आहे हे कळणार कधी? शांतिचक्राचा नियंता गुरू आहे हे पटणार केव्हा? क्षुधा आणि तृष्णेची लगलगी संपता संपत नाही. माणूस स्वप्नावस्थेचं बिढार घेऊन फिरतो. श्रवणाचं सौभाग्य त्याला लाभत नाही. विषयदरींचे वाघ त्याच्यावर झडप घालतात. वैराग्यगंगेच्या तीरावर जाण्याचं राहून जातं. आयुष्य होमाची समाप्ती होतं!
गुरूच नाही, तर जीवनमाहात्म्य कळत नाही. शवाशी तादात्म्य पावतो, पण शिवाशी नाही. गुरू आत्मबोध करतो. शिष्याची पात्रता बघून साधना करवून घेतो. विश्वात्मक देवाचं दर्शन घडवतो. त्या दर्शनानं साधकाला जाणवतं, गुरू तर सर्वव्यापी आहे. गुरुदेव चिन्मय झालेला असतो. तो भक्ताच्या मृण्मय स्वरूपाला चिन्मय करतो. परिसस्पर्शानं लोहाचं सुवर्ण होतं, परंतु गुरू हा स्वत: परिसापेक्षाही श्रेष्ठ असतो. तो शिष्याच्या आयुष्याचं सोनं करतो. एवढंच नाही, तर त्याला परिसच करून टाकतो! गुरू हा ईश्वररूप झालेला असतो. तो शिष्यालाही ईश्वररूप करतो, हीच गुरुकृपा. म्हणून गुरुनमन महत्त्वाचं आहे. त्याची शक्ती त्याच्या पावलात असते. त्याच्या चरणांवर मस्तक ठेवावं अन्पुस्तक विसरावं. वंदन करावं. ‘न-मन’ म्हणजे मनाचा लय करणं. मी पणाचं ओझं फार घातक. ते आधी उतरून ठेवावं, ‘अ-मन’ व्हावं. पुढे उन्मन होण्यास फार वेळ लागत नाही.
महादेव पार्वतीस उत्तर देतात,
‘ममरूपासि देवि त्वं ।
त्वत्प्रीत्यर्थं वदाम्यहम्|
लोकपकारक: प्रश्नो
न केनापि कृत: पुरा ॥’
‘हे देवी, तू माझंच दिव्य रूप आहेस. स्वरूप आहेस. तू प्रसन्न व्हावीस म्हणून सांगतो. सर्व लोकांना उपकारक असा हा प्रश्न पूर्वी कुणी विचारला नव्हता.’ शंकर म्हणतात, ‘रूप आणि स्वरूप लक्षात घे. नाम, रूप यांचा संबंध स्थूल देहाशी असतो. मर्त्यलोकात जड-जीव एकमेकांशी संबंध ठेवतात. व्यवहार करतात. ती सारी नातीगोती बाह्य कारणानं असतात. पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेद्रिये यांचा सर्व वापर केवळ जीवसृष्टीतच चालतो. इंद्रियांना जे दिसतं – ते रूप, पण जे दिसत नाही – ते स्वरूप…’
व्यक्तींच्या जगण्या-वागण्यात विविधता आहे. भेद आहे. भिन्नता आहे. आतील स्वरूप मात्र अभेद, अभिन्न आहे. साधक इतका पवित्र होतो, विनम्र होतो की त्याची गुरुशक्ती सर्वांत आधी त्याच्या डोळ्यांत येते. त्याची तेजस्विता नजरेत उतरते. त्याच्या जीवनरथाचं चाक कधी, कुठंही रुतत नाही. ही तेजस शक्ती इतर इंद्रियांमध्ये पसरते. मग त्याला पटतं, गुरुस्मरण हे एखाद्या चिलखताप्रमाणे आपलं रक्षण करतं! विवेक आणि वैराग्य यांचे हात धरावेत. आपल्या अध्यात्मविद्येचं रक्षण करावं. केव्हाही, कुठंही भरकटण्याची संभाव्य भीती असते. भौतिक सुखं पुकारतात. जादू करतात. भुरळ घालतात. निर्दोषत्व जपावं लागतं. अंतर्बाह्य निष्कलंक राहून शुद्धता राखणं म्हणजेच पवित्र गंगास्नान! ध्यानाच्या वेळी एकाग्रता साधताना ‘देह देवाचे मंदिर’ हा शुभ विचार करावा. जडतत्त्वं सूक्ष्म होत जातात. अंतरात दिव्य तेज पसरतं. मग दर्शन, स्पर्शन, संपादन, प्रसादन लाभतात. आपल्या भक्तीत ओसंडून वाहणारा उत्साह उक्तीतून दिसतो. कृतीतून प्रकट होतो.
‘श्रीगुरुभ्यो नम:|’ हा मंत्र कार्यारंभी म्हणतात. शुभकार्य करताना सात्त्विक भाव निर्माण होतो. गुरू आपली शक्ती मंत्रात ओततो. गुरुमंत्राचा जप केल्यानं ती शक्ती साधाकास प्राप्त होते. मंत्र देण्याचा अधिकार कुणाला असतो? सतत सर्वांचं कल्याण करण्याचं सामर्थ्य तोच गुरू, मंत्र देऊन शिष्याला सिद्धी देतो. ऋषितुल्य गुरू सर्वसिद्धीप्राप्त असतो. कोणत्याही शुभ कार्यास ईश्वराचे अधिष्ठान हवे. इष्ट देवता हवी. तेव्हा सारे परिश्रम सुफल, संपूर्ण होतात. श्रीगुरू हाच परमात्मा असतो, आहे. तोच खरा आश्रय, आधार.
‘श्रीगुरुप्रसाद सिद्ध्यर्थे जपे विनियोग:|’ गुरुप्रसाद लाभावा म्हणून गुरुजप करतात. प्रसाद हा साद देण्याचा प्रकार आहे! शिष्याचे प्रामाणिक प्रयत्न हे गुरू पाहतो अन्साद घालतो. यश देतो. गुरुप्रेम, त्याची दया, क्षमा, शांती, कारुण्यभावना, त्याचा अनुग्रह हवा असेल तर गुरुसेवा हा मार्ग आहे. गुरू नसेल तर काय करायचं? एका साधुसंताला आपला गुरू मानावं. त्याच्या मूर्तीची वा प्रतिमेची मनोमन पूजाअर्चा करावी. त्याचे चरण किंवा पादुका हृदयी ठसवावी. निर्विकल्प होऊन त्याला सर्वस्वानं शरण जावं.
गुरुपादांबुजं स्मृत्वा
जलं शिरसि धारयेत्|
सर्वतार्थावगाहस्य
संप्राप्नोति फलं नर: ॥
श्रीगुरुचरणांचं स्मरण करावं. त्याचं चरणतीर्थ मस्तकावर दोन थेंब टाकावं. त्याचं नाव घेऊन स्नान करावं. सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्यफल मिळतं, अशी श्रद्धा आहे. सद्गुरूचरणतीर्थ हे सकल तीर्थांचं माहेर! सागरात स्नान केल्यानं सर्व नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं, तसं हे भक्तितत्त्व! गुरुस्मरण म्हणजे गुरुसंगत. आधी भाव. मग सद्भाव. नंतर अभाव, निर्विकार! गुरुचरण हे शक्तिपीठ समजून साधना करणारे मुक्तीची प्रतीती आल्यावर असामान्यत्व, गुरुत्व आणि देवत्व पावणारे काही भक्त झालेत. एकलव्य हा एक असाच आदर्श शिष्य होता. ‘दळिता कांडिता| तुज गाईन अनंता॥’ अशी जनाबाईसारखी निष्ठा हवी. हीच प्रामाणिक साधना. यामुळेच दु:ख जातं. दैन्य जातं. मन:स्वास्थ्य कायम राहतं. म्हणून गुरुचरणांचा शिष्यानं आश्रय घ्यावा, हे पार्वतीला शंभू महादेव सांगताहेत. भवाब्धीचं भय घालवण्यासाठी गुरुप्राप्तीचा जिव्हाळा महत्त्वाचा. अंतरीचा ओलावाच ध्यानकमळ फुलवतो!
([email protected])