मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईकरांना प्रशस्त आणि परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मोठे पाऊल उचलत आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. मुंबईतील अनेक रहिवासी घरांच्या समस्येमुळे शहराबाहेर गेले आहेत, मात्र शासन त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
शिंदे यांनी स्पष्ट केले की काही विकासकांनी प्रकल्प हाती घेतल्यानंतर रहिवाशांना भाडे न देता काम थांबवले आहे. अशा विकासकांना हटवून नवीन नियोजन केले जाईल. जर गरज पडली, तर नियम आणि कायद्यात बदल करूनही सामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातील. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून मंत्रिमंडळात निर्णय घेतले जातील.
सामूहिक पुनर्विकास योजनेला गती देण्यासाठी एसआरए, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको आणि बीएमसी यांसारख्या सर्व यंत्रणांचा समन्वय साधला जाणार आहे. ठाण्यात अशा प्रकारची योजना यशस्वी ठरली असून, त्याच धर्तीवर मुंबईतही ही योजना राबवली जाईल.
आदित्य ठाकरेंनी मारली दांडी, शासकीय बैठकीत उद्धव सेनेची कोंडी
शासन नवीन गृहनिर्माण धोरण आणत असून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला कामगार आणि गिरणी कामगारांसाठी परवडणाऱ्या घरांची उपलब्धता सुनिश्चित केली जाणार आहे. तसेच, सामूहिक पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बाग, आरोग्य सुविधा आणि खुले मैदाने यांसारख्या प्राथमिक सुविधाही पुरवल्या जातील.
याशिवाय, श्री सिद्धिविनायक मंदिरासाठी ५०० कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून गणेश भक्तांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होतील.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन प्रभादेवी येथील सहा सामूहिक पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी केली. त्यानंतर दादर, माहीम आणि प्रभादेवी येथील प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभादेवी येथील सहा समुह पुनर्विकास प्रकल्पांची पाहणी केली. पाहणीनंतर दादर, माहिम तसेच प्रभादेवी विभागातील प्रलंबित पुनर्विकास संदर्भात आढावा कार्यक्रम उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर येथे पार पडला. व्यासपीठावर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर, उपाध्यक्ष जैस्वाल, एसआरएचे मिलिंद शंभरकर, कल्याणकर आदीसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष सरवणकर यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला प्रभादेवी, माहीम, दादर भागातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.