Friday, February 7, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यभजनी रंगते, रमते कोकण...!

भजनी रंगते, रमते कोकण…!

कोकणातला भजनप्रेमी मुंबईत अगदी रेल्वे प्रवासातही दिसतो. अभंग, गौळण आणि गजराचा नाद सहज कानी पडतो. तेव्हा रेल्वेतील गर्दीच्या प्रवासातही कर्णानंदानी घेतलेला आनंद सहज मनापर्यंत पोहोचतो. या अशा अभंगाचा आनंद घेत मुंबईच्या लोकल रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नसलेल्या गर्दीत आनंद घेत कोकणवासीय आणि महाराष्ट्रभरातील मराठी माणूस अंतर्मनातून कमालीचा सुखावणारा असतो.

संतोष वायंगणकर

महाराष्ट्रातील कोकण प्रांत हा नाट्यवेडा म्हणून ओळखला जातो. कोणत्याही सांस्कृतिक कला कार्यक्रमात अवघं कोकण नेहमीच रंगतं आणि रमतं देखील… भजनांमध्ये असाच भजनप्रेमी रात्र-रात्र जागवतो. आजही म्हणूनच मुंबई आणि कोकणात भजनांच्या डबलबारीला तुफान गर्दी होते. या भजनांमध्ये नवीन अनेक बदलही आपणाला पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळातील भजन आणि सध्याची भजन यामध्ये साहजिकच फरक तर असणारच आहे. गावोगावी आजही भजनांचे मेळे आपणाला पाहायला मिळतात. हे भजनी मेळे विशेषत: गणेशोत्सवाच्या काळात अधिक दिसून येतात. प्रत्येक वाडी-वस्तीत भजनमेळे असतात. वर्षभरात अनेक भजनांचे मेळे कुठे दिसत नाहीत; परंतु गणपती उत्सवात मात्र गावो-गावी रात्र जागवून गावात भजन करणारे भजनीबुवा आणि त्यांना साथ करणारे असतात. गणेशोत्सवाच्या काळात रात्री किती भजन केली हे सांगणारे सकाळी उजाडापर्यंत भजनच करत होतो आणि मग त्यातल्या रात्रीच्या भजनांमधील गमती-जमतींमध्ये रमणारे आपण सारे त्या पूर्वीच्या कंदिलाच्या प्रकाशात आणि घरातील दिव्यांच्या दिसण्यात अभंग, गौळणी आणि गजरातील शब्दांनी वातावरण भारलेलं असायच.

भजनांच्या बाबतीत थोडसं मागे वळून पाहिल्यावर गावो-गावचे हौशी बुवा आणि त्यांची भजनी मंडळ ही कला केवळ छंद आणि आवड यामुळेच जोपासत होते. या भजनांना डबलबारीला खऱ्या अर्थाने कोकणभूषण परशुराम पांचाळ आणि चंद्रकांत कदम, फुलाजीबुवा, नारायण वाळवे, वामन खोपकर, काशिराम परब या जोडीने खऱ्या अर्थाने भजनांमध्ये मुंबईकरांना खेचून आणलं. भजनाला ग्लॅमर प्राप्त करून दिलं. भजनसम्राटांच्या या जोडीने मुंबईतील कोकणवासीयांवर अशी काही भुरळ घातली की त्यामुळे कोकणातील मुंबईकर चाकरमान्यांची भजनी मंडळे तयार झाली. त्यांनी गायलेले सुश्राव्य अभंग, भारूड आणि गजर यांचा भजनप्रेतींवर चांगलाच प्रभाव होता. विलास पाटील हे देखील समकालीन भजनसम्राट होते. त्यानंतर देखील भजनांच्या डबलबारीत एक नवीनच पिढी तयार झाली. बुवा भगवान लोकरे, रामदास कासले, श्रीधर मुणगेकर, लक्ष्मण गुरव, भालचंद्र केळुसकर, विजय परब, प्रमोद धुरी, प्रमोद हर्याण अशी आणखीही बरीच लांबलचक यादी भजनातील बुवांची सांगता येईल इतकी प्रामाणिक भजनसेवा करणारे भजनीबुवा आहेत. भजनी बुवांचे संघटन होणं आवश्यक होते. त्यासाठी पुढाकारही घेण्याची आवश्यकता होती. यातूनच अखिल भारतीय भजन संमेलनाची कल्पना पुढे आली आणि मुंबईत माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये हे अखिल भारतीय भजनांचं संमेलन पार पडलं.

खरंतर या भजन संमेलनात अनेक भजनीबुवा, पखवाजवादक, चकीवादक धरकरी, वारकरी भजन करणारे असे सगळेच सहभागी झाले होते. भजनातील डबलबारीच्या निमित्ताने एक-दुसऱ्यासमोर बसून भजनांची स्पर्धा करणारे भजन या एका विषयासाठी सारे एकवटले होते. भजनकलेशी संबंधित असणाऱ्यांनी यापूर्वीच्या काळात फारच संघर्ष करीत आपली कला जोपासलेली असायची. आजही भजनीबुवांचा जीवन संघर्ष तसाच आहे. मुंबईकर चाकरमान्यांनीच भजनाला आणि भजनीबुवांना लोकाश्रय दिला. रात्रभर भजनातील डबलबारीचा आनंद घेत सकाळी आपल्या कामावर जाणारा चाकरमानी कधीच कंटाळला नाही, थकला नाही. चाकरमान्यांच्याच पाठबळावर मुंबापुरीत भजनकला आपोआप वळत गेली. मुंबईतही रहाणाऱ्या भजनीबुवांनी आप-आपली कंपनीतील नोकरी सांभाळत भजनकला नेहमी पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कोकणातला भजनप्रेमी मुंबईत अगदी रेल्वे प्रवासातही दिसतो. अभंग, गौळण आणि गजराचा नाद सहज कानी पडतो. तेव्हा रेल्वेतील गर्दीच्या प्रवासातही कर्णानंदानी घेतलेला आनंद सहज मनापर्यंत पोहोचतो. या अशा अभंगाचा आनंद घेत मुंबईच्या लोकल रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नसलेल्या गर्दीत आनंद घेत कोकणवासीय आणि महाराष्ट्रभरातील मराठी माणूस अंत:मनातून कमालीचा सुखावणारा असतो. पूर्वी फक्त जुने-जाणतेच या रेल्वे प्रवासातील भजनी मेळ्यात दिसायचे. आतातर सोशल मीडियाच्या जमान्यात या रेल्वे प्रवासातील सुश्राव्य भजनांचे व्हीडिओ पाहाताना आणि गौळण, अभंग ऐकताना खूपच सुखावायला होतं. काही महिलाही भजन गाताना दिसतात हे पुढचं पाऊल. दोन दिवसांच्या मुंबईतील अखिल भारतीय भजन संमेलनात अनेक गोष्टी पाहायला ऐकायला मिळाल्या.

महाराष्ट्रातील आणि देशातील काही राज्यातूनही या महोत्सवात हजेरी लावली होती. या अखिल भारतीय भजन संमेलन निमित्ताने एकवटणाऱ्या या सर्व भजनकलेशी सर्वांना एकत्र करण्याचे काम बुवा भगवान लोकरे बुवांनी केले होते. खरंतर एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र करणे आणि संमेलन यशस्वी करणे तसं म्हटलं तर फार अवघडच होतं; परंतु तरीही एक खूप छान संवाद आणि भजनकलेवर परिसंवादही पार पडला. या भजनकला क्षेत्रात डबलबारी भजनीबुवांची पुढची पिढीही यामध्ये दिसते. रामदास कासले बुवांचा मुलगा दुर्गेश कासले, बुवा प्रमोद धुरी बुवांचा मुलगा प्रणव धुरी उत्तम पखवाजवादक आहे. तसेच रायगडमधील बुवा संतोष शितप बुवांचा मुलगा भावेश शितप आणखीही अनेकांची नाव सांगता येतील. शास्त्रीय संगीतावर आधारित ही भजनकला संगीतातील शास्त्रोक्तपणा जोपासत अधिक पुढे जाण्याचा प्रयत्न होताना दिसतो. कोकणातील लोकांवर आजही भजनाचे गारूड आहेच. म्हणूनच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातही डबलबारी भजन घेतच असतात. संगीत भजनबारी, वारकरी भजन, ट्वेंटी-ट्वेंटी भजन स्पर्धा अशा नानाविध प्रकारात ही भजनकला जोपासली जात आहे. भजनकलेतील बदलही भजनकला रसिकांनी स्वीकारला आहे. यामध्ये फक्त कोणताही अतिरेकीपणा न करता भजनात उपस्थित असणारे रसिक प्रेक्षक त्या कलेचा अधिक आस्वाद कसा घेऊ शकतील हाच प्रयत्न भजनकलेतील सर्वांचाच असतो. या भजनकलेला आज लोकाश्रय आहेच; परंतु या भजनकलेला राजाश्रय देखील आवश्यक आहे आणि अपेक्षितही आहे.

कोकणाशी संबंधित उदय सामंत, नितेश राणे, भरत गोगावले, योगेश कदम असे मंत्री आहेत. या सर्वांनीच कोकणातील भजनकलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य सरकारस्तरावर अधिक प्रोत्साहित करावे. मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी तर या भजन संमेलनात उपस्थित राहून आश्वासितही केले आहे. यापुढच्या काळातही भजनकला अधिक मोठ्या प्रमाणावर लोकाश्रय आणि राजाश्रय प्राप्त करेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -